विठोबाराया पावेल कसा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
पंढरीचा विठोबा इतकी वर्षे तिथे उभा आहे तो स्वबळावरच. आता त्याच्याकडे जाऊन स्वबळाची भाषा सोडणाऱ्यांना तो पावेल कसा?
 

अवगुणांचे हाती आहे अवघी फजिती

नाही पात्रासवे चाड प्रमाण ते फिके गोड

 

तुकाराम महाराजांचा हा अभंग. माणसाची फजिती त्याच्यातल्या अवगुणांमुळे होते. त्यामुळे जे काही घडते ते त्याच्यातल्या दुर्गणांमुळे, हेच हा अभंग विशद करतो. फार रसाळ पद्धतीने तुकाराम महाराजांनी मानवी स्वभावातल्या या गुणवैशिष्ट्यावर भाष्य केले आहे. आता हा संदर्भ ताजा होण्याचे कारण म्हणजे उद्धव ठाकरेंची पंढरपूरला झालेली सभा. शिवसेना पडला हिंदुत्ववादी पक्ष. त्यामुळे हिंदू देवीदेवतांना साकडे घालणे काही शिवसेनेला वर्ज्य नाही. तसे करायला कोणाची हरकत असण्याचे कारणही नाही. परवा शिवसेनेने पंढरपूरला जी सभा केली त्यात माहौल तर उत्तमच निर्माण केला गेला होता. माहौल करण्यात ठाकरे मंडळींचा हात कुणीच धरू शकत नाही. मात्र, माहौलात निर्माण झालेली धूळ खाली बसली की, समोर काय चित्र उभे राहाते, त्याचे जितेजागते उदाहरण असलेले राज ठाकरे सध्या महाराष्ट्रभर फिरतच आहेत. या दोन्ही भावांत उद्धव ठाकरे उजवे ठरले, ते त्यांनी शिवसेना वाढविण्यासाठी केलेल्या कष्टांमुळे. मोदी लाटेच्या दणक्यात स्वत:चे साठहून अधिक आमदार निवडून आणणे, त्यांना सत्तेत बसविणे, महापालिका स्वत:च्या ताब्यात ठेवणे या आणि अशा कितीतरी गोष्टी उद्धव ठाकरेंनी खरोखरच ‘करून दाखविल्या.’ खुद्द बाळासाहेबांना त्यांच्या हयातीत जे जमले नाही ते ‘करून दाखवत’ उद्धव ठाकरेंनी आपल्या सैनिकांना सत्तेचे पाणी चाखायला लावले. आता मुद्दा असा की, कर्तृत्व असले तरी ते काही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत. मुख्यमंत्री होण्याइतके त्यांचे संख्याबळही नाही. जरा नीट आठवले तर उद्धव ठाकरे असेच आपल्या आमदारांना घेऊन आई एकविरेच्या दर्शनाला गेले होते. पण, आई एकविरा काही त्यांना पावली नाही आणि शेवटी देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारावे लागणार, हे वास्तव पचवून शिवसेना गपगुमान सत्तेत सहभागी झाली.

 

शिवसेना सत्तेत आली तरी १९९५ नंतरच्या युती सरकारात शिवसेनेचा जो काही तोरा होता, तो मात्र पूर्णपणे तुटला. आता शिवसेना तो आव आणण्याचा कितीही प्रयत्न करीत असली तरी तो पूर्णपणे फसवा आहे, याची जाणीव झाल्याशिवाय राहात नाही. राजकारणाच्या खेळात आपल्या बेडकुळ्या फुगवूनच दाखवाव्या लागतात. त्याशिवाय त्या बाजारात भावच येत नाही. मात्र, बेंडकुळ्यांच्या बेडक्या झाल्या आणि बेडक्यांचे बैल करून दाखविण्याचे प्रयोग मात्र पूर्णपणे अंगाशी येऊ शकतात. शिवसेनेचेही काहीसे तसेच झाले आहे. आधी बोंबाबोंब करायची आणि नंतर चूपचाप सत्तेत राहायचे. उद्धव ठाकरे काय म्हणाले, त्याची चर्चा तर या दोन-तीन दिवसांमधल्या बातम्यांमध्ये झालेलीच आहे. माध्यमांना मसालेदार काहीतरी लागतेच आणि ते दैनंदिन स्वरूपात पुरविण्याचे काम शिवसेना आणि संजय राऊत करीतच असतात. उद्धव ठाकरे काल काय म्हणाले ते सगळीकडे छापून आले ते याचमुळे. मात्र, ते जे म्हणालेले नाहीत, त्याला आजघडीला महाराष्ट्रात चाललेल्या राजकारणात महत्त्व आहे. शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष आजच्या घडीला आपल्या बेंडकुळ्या एकमेकांना कितीही फुलवून दाखवित असले तरीही त्यांना आपली क्षमता पुरेपूर उमगलेली आहे. शिवसेनेची समस्या ही आहे की, त्यांना १९९५ चा तोरा परत हवाय, पण संख्याबळ नाही. ठाकरे- महाजन या दोन्ही मोठ्या नेत्यांचे काळाच्या पडद्याआड जाणे व नरेंद्र मोदींचा उदय यामुळे महाराष्ट्रातील युतीचे राजकारण पूर्णपणे बदलूनच गेले. देवेंद्र फडणवीसांना जी संधी मिळाली त्यांचे त्यांनी पूर्णपणे सोने करून दाखविले. आजही देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा त्या दृष्टीने अन्य कुणालाही धक्का न लावता येण्यासारखीच आहे.

 

राजकारणात थोडेसे वाढण्याची जागा मिळाली तरीही ती कुणीही सोडत नसते. शिवसेनाही ती सोडायला तयार नाही. शिवसेनेने तशी सोडूही नये. एकेकाळी एकटे लढण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे याच पंढरपूरच्या सभेत नेमका हा मुद्दा टाळत राहिले. राजकीय पक्षात आलेले लोक काही समाजसेवा करायला आलेले नसतात. पक्ष कुठलाही असला तरी व्यक्तिगत आशा-आकांक्षा असतातच. स्बबळाची भाषा सोडली की साहजिकच वाट्याच्या जागा कमी होतात आणि पक्षातून लोकांची पांगापाग व्हायला सुरुवात होते. शिवसेनेचा तर स्थायीभावच असा आहे की, नसली तरी आक्रमकता दाखवित तरी राहावी लागते. टोळीवाल्यांचा नेता आक्रमक नसला तर टोळी त्याला सोडून जाते. इतके असूनही उद्धव ठाकरे आता ‘स्वबळावर’ उभे राहण्याचे धाडस करायला तयार नाहीत. दोन-तीन राज्यांत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये उत्साहाचे भरते आले आहे, तसेच भरते अन्य लहान घटकपक्षांमध्येही आले आहे. बिहारमध्ये भाजपने मित्रपक्षांना अधिक जागा सोडल्यानंतर शिवसेनेच्या आशा पल्लवित होणे साहजिकच. मात्र, शिवसेनेची मूठ सव्वा लाखाची आहे. उद्या शिवसेनेने युतीतून बाहेर पडून लढायचे ठरविले तर सध्या सत्तेत असलेले कितीतरी शिवसेनेचे लोक तिथेच बसलेले असल्याचे चित्र उद्धव ठाकरेंना पाहायला मिळेल. उद्धव ठाकरेंना हे माहीत नाही, असे मुळीच नाही, मात्र आव आणण्याचा खेळ अनेकदा वास्तव झाकून टाकण्यासाठी मदतीचा ठरतो. मुद्दा एवढाच की, परमेश्वरही यश देतो ते आपल्या शुद्ध मनाने केलेल्या प्रयत्नांना, हे विसरून चालणार नाही.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@