मातीच्या गंधातला ‘महाराष्ट्र केसरी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
 
 
 
शिक्षण सांभाळत रफिकने कुस्तीचाही सराव सुरू ठेवला. मातीवरील कुस्तीत तो तरबेज होताच पण, समोर मॅटवरच्या कुस्तीचे आव्हान होते. रफिकने ते सहज पेलत ‘महाराष्ट्र केसरी’चा मानाचा तुरा शिरपेचात रोवला.
 

बाला रफिक शेख याने अभिजित कटकेला सहजरीत्या नमवत ‘महाराष्ट्र केसरी’चा मानाचा तुरा आपल्या शिरपेचाच रोवला. पहिल्यापासूनच घरात कुस्तीप्रेम असलेला बालालादेखील कुस्तीची आवड निर्माण झाली. ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकायचेच हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्याने मेहनत घेण्यास सुरुवात केली आणि त्यात तो यशस्वीही झालाबाला हा बुलढाण्याकडून ‘महाराष्ट्र केसरी’ या स्पर्धेत उतरला होता. असं असलं तरी, तो मूळचा सोलापूरचा. घरात सर्वांनाचा कुस्तीची आवड. त्याच्या पाच पिढ्यांनी आपली कुस्तीची परंपरा जपली होती. त्याचे वडील आझम शेख यांनीदेखील आपल्या मुलांच्या कुस्तीच्या आवडीसाठी अपार मेहनत घेतली. त्याच्या दोन भावांनीही कुस्ती स्पर्धांमध्ये येण्याचे अनेक प्रयत्न केले. परंतु, त्यांना त्या स्पर्धांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर आझम शेख यांनी बालाच्या खेळावर मेहनत घेण्यास सुरुवात केली. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे एखाद्या कुस्तीपटूसाठी आवश्यक असलेला खुराकही त्याला मिळणं कठीण होतं. म्हणूनच केवळ शांत डोक्याने आपला खेळ खेळणे हा त्याच्या खेळाचा खरा ‘युएसपी.’ ‘महाराष्ट्र केसरी’चा बहुमान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेला बाला मातीतल्या कुस्तीत तरबेज होता. परंतु, ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा ही मॅटवर खेळवली जात असल्यामुळे त्याने त्या दृष्टीनेही सराव करण्यास सुरुवात केली होती. यासाठी गेली आठ वर्षे त्याने कुस्तीच्या आखाड्यात स्वत:ला शारीरिक आणि मानसिकरित्या घडविले. आपले शिक्षण सांभाळत त्याने कुस्तीचा सरावही सुरू ठेवला.

 

बाला रफिक हा कायमच वादांपासून दूर राहिला आणि त्याने आपलं संपूर्ण लक्ष हे केवळ कुस्तीवर केंद्रित केलं. यातच त्याला गेल्या दीड वर्षामध्ये दुखापतींनी घेरलं. परंतु, या दुखापतींवरही मात करत बालाने आपला सराव सुरूच ठेवला. पहाटे उठून नित्यनियमाने तो आपला सराव करत असे. मातीमधला कुस्तीपटू असला तरी, त्याने व्यायामाचीही साथ कधी सोडली नाही. वडिलांकडून कुस्तीचे धडे घेणाऱ्या बालाला त्यानंतर खरी गरज होती ती म्हणजे व्यावसायिक कुस्तीच्या प्रशिक्षणाची. परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याच्यासमोर मोठे संकट होतेच. त्यातच त्याला व्यावसायिक कुस्तीचे धडे घेण्यासाठीही मार्गदर्शक मिळाले नव्हते. अशाच परिस्थितीत बालाने कोल्हापूर गाठले आणि व्यावसायिक कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्याची गाठ गणपतराव आंदळकर यांच्याशी पडली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली बालामधील कुस्तीपटू आणखी घडत गेला. अपार मेहनतीच्या जोरावर त्याने पुण्यातील गणपत दांगट यांच्या आखाड्यात ‘महाराष्ट्र केसरी’ बनण्याचे स्वप्न समोर ठेवून सराव करण्यास सुरुवात केली. याच कालावधीत त्याने गणेश घुले आणि वांजळे उस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे घेण्यास सुरुवात केली.

 

बाला रफिक हा सध्या कुस्तीसोबतच बारावीचेही शिक्षण घेत आहे. त्याचा आजपर्यंतचा प्रवास हा अनेक चढ-उतारांनी आणि संघर्षांनी भरलेला असाच आहे. त्याने या स्पर्धेसाठी मातीच्या विभागातून ‘महाराष्ट्र केसरी’च्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. ‘महाराष्ट्र केसरी’चा प्रबळ दावेदार मानला जाणाऱ्या अभिजित कटकेचा त्याने ११-३ अशा तांत्रिक गुणांच्या आधारे पराभव करत सर्वांनाचा मोठा धक्का दिला. शक्ती आणि युक्तीच्या जोरावर बाला पूर्ण ताकदीने या स्पर्धेला सामोरा गेला. त्यातच प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने ‘महाराष्ट्र केसरी’वर आपल्या नावाची मोहोर उमटवली. बाला रफिकचा आजवरचा प्रवास हा थक्क करणारा आणि संघर्षमय असाच... त्याने आजवर अनेक कुस्ती स्पर्धांमध्ये आपले कौशल्य दाखवून दिले, अनेक पदकेही पटकावली. पण, मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’चा बहुमान मिळाल्यानंतर त्याचा आता कुस्तीतील खऱ्या अर्थाने प्रवास सुरू झाला आहे. प्रतिकूल परिस्थितीत ‘महाराष्ट्र केसरी’पर्यंतचा प्रवास करणाऱ्या रफिकला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. एकीकडे खाशाबा जाधव यांच्यासारखा महान कुस्तीपटू महाराष्ट्राला लाभला होता, त्यातच आता शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी निघालेल्या रफिकसमोर येत्या काळात अनेत आव्हाने असतील, यात काही शंका नाही. राज्यात आज बालाने आपले, आपल्या गुरूंचे आणि आपल्या परिवाराचे नाव मोठे केलेच आहे. तो येत्या काळात राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरही आपल्या राज्याचे, गुरूंचे आणि देशाचे नाव उंचावेल अशी आशा करणे गैर ठरणार नाही.

 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@