आगी लावण्याचे धंदे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

 

 
 
 
 
नितीन गडकरींचा काँग्रेसला आरसा दाखवणारा आरोपांचा सिलसिला सुरू असताना काँग्रेसी कृपेवर तगून राहिलेल्या विनोद दुआंच्या पत्रकारितेचे पित्त न खवळते तरच नवल! आपली काँग्रेसशी असलेली इमानदारी दाखविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे पाहून मग विनोद दुआंनी गडकरींच्या मुलाखतीतच काटछाट केली व त्यालाच मोदीविरोधातील विद्रोह असे ठरवत नाचवले.
 

रंगीत वेष्टनात गुंडाळून नकली माल माथी मारण्याची बनवेगिरी थोडाफार काळ चालू शकते, पण कसोटीची वेळ येते तेव्हा मात्र या फसवाफसवीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जातातच. विनोद दुआ नामक माध्यमपंडिताला याचा अनुभव नक्कीच येत असेल. नुकतीच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांची एचडब्ल्यू न्यूज या माध्यमाने मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने नितीन गडकरींना रस्तेबांधणी प्रकल्प आणि एनपीएबाबत प्रश्न विचारला. रस्तेबांधणीचे शेकडो प्रकल्प निरनिराळ्या कायदेशीर अडीअडचणींमुळे बंद पडल्याबद्दल आणि थकित कर्जाबद्दल (एनपीए) हा प्रश्न होता. यावर नितीन गडकरींनी उत्तर दिले आणि “मी मंत्रिपदाची जबाबदारी घेतली, तेव्हा रस्तेबांधणीचे ४०३ प्रकल्प अडकले होते,” असे सांगितले. एनपीएबाबतही उत्तर देत नितीन गडकरींनी हे सगळे प्रकल्प मी कारभार हाती घेताच पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचेही स्पष्ट केले. सोबतच हे प्रकल्प अडकून राहण्यात सरकारची ७५ टक्के जबाबदारी असल्याचेही मान्य केले. हा झाला मुलाखतीचा एक भाग. आता माध्यमसंकेतानुसार नितीन गडकरींचे मुलाखतीतले या प्रश्नाबाबतचे संपूर्ण म्हणणे काय आहे, हे दाखवणे गरजेचे होते. पण विनोद दुआ यांनी आपल्या विकृत विचारांना जागत मुलाखतीला निराळाच रंग देण्याचा प्रयत्न केला. विनोद दुआंनी गडकरींचे उत्तर पूर्ण होण्याआधीच आपल्या तोंडाची वाफ दवडत, हा भाजपच्या आतला असंतोष असल्याचे संपादित व्हिडिओत ठोकून दिले. (‘प्रकल्प अडकण्यात सरकारची ७५ टक्के जबाबदारी’ या अनुषंगाने) झाले! लगेचच नितीन गडकरी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात भूमिका घेत असून ते भाजपमधले विद्रोही नेते असल्याचे विनोद दुआ यांनी आपल्या डाव्या मेंदूच्या आज्ञेने सांगितले. सोबतच नितीन गडकरींची तुलना सरकारमध्ये कोणतेही पद पदरी न पडल्याने इकडे-तिकडे काहीबाही बडबडत भटकणार्‍या यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्याशी केली. इथेच विनोद दुआ यांनी माती खाल्ल्याचे व नको तो उद्योग केल्याचे स्पष्ट होते. कारण नितीन गडकरी यांच्या या मुलाखतीचा असंपादित भाग नंतर सर्वत्र प्रकाशित झाला व विनोद दुआंनी संपादित केलेली चोरी पकडली गेली.

 

नितीन गडकरींच्या या मुलाखतीला कोणतीही छेडछाड न करता सलगपणे पाहिले की, विनोद दुआ यांची बुद्धिभ्रष्टता ठळकपणे समोर येते. काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ सरकारने पर्यावरण व कायदेविषयक बाबींची पूर्तता न केल्याने सदर रस्तेबांधणी प्रकल्प रखडल्याचे, त्यातले काही एनपीएत गेल्याचे नितीन गडकरींनी आपल्या पुढच्याच वाक्यात म्हटले आहे. शिवाय गडकरींनी आपल्या पहिल्याच वाक्यातमी मंत्रिपदाचा कारभार हाती घेतला तेव्हा अशी परिस्थिती होती,” हे म्हटल्याचेही सर्वांसमोर आहे. म्हणजेच ते काँग्रेस सरकारच्या चुकांबद्दलच बोलत असल्याचे कोणत्याही सामान्य बुद्धीच्या माणसाच्या लक्षात येईल आणि पुढची सलग वाक्ये ही तर काँग्रेसच्या नाकर्तेपणाचा पाढा वाचून दाखवणारीच आहेत. नितीन गडकरींचा असा काँग्रेसला आरसा दाखवणारा आरोपांचा सिलसिला सुरू असताना काँग्रेसी कृपेवर तगून राहिलेल्या विनोद दुआंच्या पत्रकारितेचे पित्त न खवळते तरच नवल! आपली काँग्रेसशी असलेली इमानदारी दाखविण्याची हीच योग्य वेळ असल्याचे पाहून मग विनोद दुआंनी गडकरींच्या मुलाखतीतच काटछाट केली व त्यालाच मोदीविरोधातील विद्रोह असे ठरवत नाचवले. पण सत्य कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी ते समोर येतेच. कोणी कितीही पाताळयंत्रीपणा केला तरी तसे करणारे लोक सत्याच्या एका फटक्यासरशीच गारद होतात. इथेही तसेच झाले आणि नंतर विनोद दुआ यांना खुलासा देण्यासाठी पुढे यावे लागले. पण या खुलाशातही त्यांनी आपण किती निर्ढावलेले आहोत, हेच दाखवून दिले आणि स्वतःच्या चुकीच्या कृत्यावर पश्चात्तापाचा एक शब्द बाहेर काढण्याचाही दिलदारपणा दाखवला नाही. यातून दुआंच्या हलक्या मनोवृत्तीचा अंदाज सहज लावता येतो.

 

खरे म्हणजे माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनच आता आतापर्यंत ओळखली जात असत. माध्यमे जे जनतेसमोर ठेवतील ते सर्वच्या सर्व खरे, असेच मानले जाई. अपवाद वगळता त्यात तथ्यही होतेच. पण स्वातंत्र्योत्तर काळात मुख्य प्रवाहातील माध्यमे ही जनतेच्या प्रश्नांसाठीचे व्यासपीठ न राहता कोणत्या ना कोणत्या तरी पक्षाच्या दावणीला बांधली गेल्याचेच पाहायला मिळते. आपल्या राजकीय उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी मग इथले लोक हवे तेवढे व हव्या त्या स्वरूपात वार्तांकन करू लागले. ही चौथ्या स्तंभाला लागलेली कीडच होती व इथल्या राज्यकर्त्यांनी तिला पोसण्याचेच धोरण अवलंबले. गेल्या ७० वर्षांत गांधी-नेहरू घराण्याने या क्षेत्रात आपल्या हितसंबंधांना बाधा न पोहोचू देणारीच माणसे स्थिरस्थावर होऊ दिली. परिणामी सत्ताधारी काँग्रेसचे गोडवे गात मार्क्सवादी विचारांच्या विझत्या पखाली वाहणे, हेच या लोकांचे कर्तव्यकर्म झाले. साडेचार वर्षांपूर्वी बहुसंख्यांच्या लोकेच्छेनुसार सरकार तर बदलले. पण जी लोकशाही बहुमताच्या मूलतत्त्वावरच चालते त्या बहुमताच्या विचारांची दखल मात्र माध्यमांनी घेतली नाही. अशावेळी सोशल मिडिया नामक शस्त्राचा या जनतेने वापर करत आतापर्यंत माध्यमांतल्या उच्च पदावर बसून हुच्चपणा करणाऱ्यांची ढोंगबाजी चव्हाट्यावर आणण्याचे काम केले. दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी विचाराने प्रेरित झालेली नवनवीन संकेतस्थळे-माध्यमेही विकसित होत गेली. आताचा विनोद दुआ यांचा खोटारडेपणा समोर आणण्यात या सर्वांचाच हातभार आहे. आतापर्यंत आपल्याला हवे तेच ‘गाळीव वास्तव’ जनतेसमोर नेणाऱ्यांनी मात्र या तथ्याला ट्रोल ठरवण्याचाच शहाजोगपणा केला.

 
नरेंद्र मोदी किंवा भाजपचा समर्थक, राष्ट्रवादी-हिंदुत्वनिष्ठ विचारांचा पाठीराखा तो अज्ञानी व बिनडोक ठरवण्यापर्यंतही या लोकांनी मजल मारली. या प्रकारातून मुख्य प्रवाहातील माध्यमांनी स्वतःचे अजेंडेच राबविण्याचे उद्योग केल्याचे स्पष्ट होते. नितीन गडकरी यांच्या आडून विनोद दुआ किंवा त्यांच्यासारख्या अन्यांनादेखील आपापले राजकीय अजेंडेच राबवायचे असतात. वरवर पाहता ते नितीन गडकरींची भलामण करतानाही दिसतील, पण त्यांच्या या डावपेचांवर विश्वास ठेवण्याची बिलकुल आवश्यकता नाही. खरे तर त्यांना नितीन गडकरीही नकोत आणि राष्ट्रवादी विचाराने भारलेले अन्य कोणीही नकोतच नकोत. या लोकांना आपापले जुने पंचतारांकित दिवस अन् रंगीत पार्ट्यांनी भरलेल्या रात्री परत हव्या आहेत. ते काँग्रेस सत्ताधारी झाल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणूनच ही मंडळी अशी बुद्धिभेद करणारी व राष्ट्रवादी विचारांच्या मंडळींत फूट पडेल, अशी कारस्थाने रचताना दिसतात. तीन राज्यांतल्या काँग्रेसी विजयाने या मंडळींना अंधारलेल्या स्वप्नात आनंदाचा कवडसा पडल्याचे भास होत आहेत. राहुल गांधींना सर्वोच्चपदी बसविण्यासाठीच स्वतःला निष्पक्ष म्हणविणार्‍या या लोकांचे हे सगळे उपद्व्याप सुरू आहेत, निरनिराळ्या माध्यमातून फेक न्यूजचाही रतीब वाढला आहे. विनोद दुआसारखा माणूस फेक न्यूजच्या आहारी जाऊन भाजपांतर्गत आगी लावण्याचे उद्योग करतो, हे त्याचेच द्योतक. पण फेक न्यूज ही फेकच असते, त्याने कोणाला चेकमेट करता येत नाही, तर ज्याने कोणी तशी आगळीक केली त्यालाच ती चेकमेट करत असते, हे दुआंनी लक्षात घेतलेले बरे. नाहीतर आता झाली त्यापेक्षा अधिक नाचक्की होण्याची पाळी त्यांच्यावर येतच राहिल.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@