उत्तरप्रदेश, बिहारचे नवे समीकरण!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018   
Total Views |


 

 
2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेश व बिहार या दोन राज्यात कोणते राजकीय समीकरण राहील हे आता जवळपास स्पष्ट होत आहे. बिहारमध्ये जी उलथापालथ होण्याची शक्यता होती, ती आता झाली आहे. राज्यातील एक नेते उपेंद्र कुशवाहा यांनी भाजप आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. ते कॉंग्रेस -राजद आघाडीत जातील हे मानले जात होते. कुशवाहा यांनी गुरुवारी तो निर्णय घेतला. बिहारमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रीय जनता दल, जीतनराम मांझी व उपेंद्र कुशवाहा यांच्यात महागठबंधन झाले आहे तर दुसरीकडे भाजप, जनता दल (यु) व रामविलास पासवान यांची युती अशा या दोन आघाड्यांमध्ये लोकसभा निवडणूक लढली जाईल. रामविलास पासवान यांचा पक्ष जागावाटपावरून जरा नाराज होता, ती नाराजी आता दूर केली जात असल्याचे समजते. या आठवड्यात बिहारमधील जागा वाटप पूर्ण होण्याची शक्यता आहे.
 

बिहारमध्ये एकूण 40 जागा असून, यात भाजपच्या 22 जागा आहेत. भाजपला या जागा हव्या आहेत. दुसरीकडे जनता दल युनायटेडने भाजपच्या बरोबरीने जागा मागितल्या होत्या. तर रामविलास पासवान यांनाही 8 जागा हव्या होत्या. 40 जागांमध्ये या तीन पक्षांना बसविण्याची कसरत भाजपाला करावी लागत आहे. यात भाजपच्या काही जागा कमी होतील हे स्पष्ट होते आहे. त्याची मानसिक तयारी भाजपने केली होती. भाजपा-जनता दल यु 17-17 तर रामविलास पासवान यांचा लोक जनशक्ती पक्ष 6 असे राज्यातील जागा वाटप होण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये दोन्ही आघाड्या तुल्यबळ ठरत असून त्यांच्यात 40 जागांसाठी अटीतटीची लढत होण्याची चिन्हे आहेत. 2014 मध्ये भाजपा आघाडीला राज्यातील 40 पैकी 32 म्हणजे 80 टक्के जागांवर विजय मिळविला होता. त्याची पुनरावृत्ती 2019 मध्ये करण्याचा विश्वास भाजपाला वाटत आहे. 2019 साठी आमचे मिशन 300 जागांचे आहे आणि ते आम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू असा विश्वास भाजपला वाटत आहे. आमच्याकडे पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह असे दोन महारथी आहेत. त्यामुळे आम्हाला 2019 ची कोणतीही चिंता नाही असाही ठाम विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहेत.

 

उत्तरप्रदेश

सर्वात मोठ्या राज्यात उत्तरप्रदेशात मात्र महागठबंधन होण्यात एक पेच असल्याचे समजते. त्यातही सपा-बसपा व राष्ट्रीय लोकदल यांच्यात युती झाली असल्याचे म्हटले जाते. कॉंग्रेससाठी फक्त अमेठी व रायबरेली या दोन जागा सोडण्याची तयारी इतर पक्षांनी दाखविली आहे.

विधानसभेचे चित्र

मार्च 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, भाजप व मित्रपक्षाला 3 कोटी 54 लाख मते मिळाली होती तर सपाला 1 कोटी 92 लाख व बसपाला 1 कोटी 89 लाख मते मिळाली होती. कॉंग्रेसला 45 लाख तर राष्ट्रीय लोक दलाला 15 लाख मते मिळाली होती. यातील तीन पक्ष सपा, बसपा व राष्ट्रीय लोक दल एकत्र आले आहेत. कॉंग्रेसला 8 जागा देण्याची तयारी या पक्षांनी दाखविली असल्याचे म्हटले जाते. कॉंग्रेसला 12-15 जागा हव्या आहेत. सपा नेते अखिलेश यादव कॉंग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. मात्र बसपा नेत्या मायावतींना न दुखावण्यासाठी ते विरोधी पक्षांच्या बैठकींना उपस्थित राहात नसल्याचे बोलले जाते.

उत्तरप्रदेशात अंतिम राजकीय चित्र कसे तयार होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राज्यात तिरंगी लढत झाल्यास ते भाजपच्या हिताचे ठरेल. मात्र, चारही विरोधी पक्षांमध्ये महागठबंधन तयार झाल्यास भाजपाला काही अडचणींचा सामना करावा लागेल. राज्यातील ब्राम्हण मतदार आजवर भाजपकडे होता. कॉंग्रेसने मागील काही महिन्यांपासून राहुल गांधींची ओळख पंडित राहुल गांधी अशी करून देणे सुरू केले आहे. त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगणे अवघड जात आहे. यात एक महत्त्वाची बाब म्हणजे ठाकूर म्हणजे राजपूत व ब्राम्हण हे दोन वर्ग एकत्र राहण्याची परंपरा कमी आहे. राज्याचे मुख्यमंत्रिपद ठाकुर नेत्याकडे असल्याने ब्राम्हण वर्ग त्यावर कशी भूमिका घेतो हे पाहणे महत्वाचे ठरेल. गोरखपूरच्या पोटनिवडणुकीत ब्राम्हण मतदारांनी सपा उमेदवाराला मतदान केल्याने भाजपचा पराभव झाला होता असे मानले जाते. उत्तरप्रदेशात कसे राजकीय समीकरण तयार होते याकडे सार्या देशाचे लक्ष लागले आहे. कारण येथे तयार होणार्या समीकरणावर 2019 चे राजकीय समीकरण तयार होणार आहे.

मिशन उत्तरप्रदेश

2014 मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले ते उत्तरप्रदेशातील अभूतपूर्व यशामुळे. राज्यातील 80 पैकी 73 जागा भाजपाला मिळाल्या होत्या. कॉंग्रेसला दोन, सपाला चार व अन्य एक अशा एकूण 7 सात जागा विरोधी पक्षांना मिळाल्या. भाजपने आगामी निवडणुकीसाठी मिशन उत्तरप्रदेशची घोषणा केली आहे. भाजपनेते राज्यातील 70 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवित आहेत. राज्यात महागठबंधन झाले तरी, आम्ही 70 जागा जिंकू असा पूर्ण विश्वास भाजपाला वाटत आहे. राहुल गांधींना ही निवडणूक जड जाईल, असाही विश्वास भाजप नेत्यांना वाटत आहे.

दोन मोदी

2014 मध्ये भाजपला जे यश मिळाले होते, त्यापेक्षा मोठे यश 2019 मध्ये मिळेल असे भाजप नेत्यांना का वाटते? एका नेत्याने सांगितले, 2014 मध्ये आमच्याजवळ फक्त नरेंद्र मोदी होते, आता अमित शाह आहेत. अमित शाह यांच्यासारखा नेता आम्हाला मिळाला आहे हे आमचे फार मोठे भाग्य आहे. अमित शाह यांच्या सभांना जी अलोट गर्दी होत आहे ती आश्चर्य वाटावी अशी आहे. म्हणजे 2014 मध्ये आमच्याजवळ एक मोदी होते, आता दोन मोदी झाले आहेत. मग, 300 चा आकडा का गाठता येणार नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत आधी 350 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तो थोडा वाढीव आहे असे गृहित धरले तरी 300 जागांची मजल आम्हाला सहज मारता येईल. प्रत्येक राज्यात आमच्या जागा वाढणार आहेत. हा नेता सांगत होता, आमच्या विजयाची अनेक प्रमुख कारणे राहणार आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमाची अफाट लोकप्रियता. पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या एका सर्वेक्षणात, मन की बात हा सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम असल्याचे आढळून आले आहे. ही लोकप्रियता बहुतांश मतांमध्ये परिवर्तित होण्याची शक्यता आहे. शिवाय जनधन योजना, उज्ज्वला गॅस योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ, मुद्रा योजना, त्यातून निर्माण झालेले कोट्यवधी रोजगार, सिंचनासाठी भरघोस निधी, प्रत्येक राज्यात विकास आणि संसाधनांची कामे, सरहद्दीची सुरक्षा, दहशतवादाचा बिमोड या योजनांसोबतच गेल्या चार वषार्र्त झालेला नेत्रदीपक विकास आम्ही जनतेपुढे ठेवणार आहोत. आणखी बरेच मुद्दे आहेत. अशा अनेक घटकांमुळे आम्ही 300 चा आकडा गाठू शकू, असे आम्हाला वाटते.

@@AUTHORINFO_V1@@