होमियोपॅथीक तपासणी (केस टेकिंग - २)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |



 
 
 
होमियोपॅथीक तपासणीचे महत्त्व आपण जाणले की, ज्याच्यामुळे तज्ज्ञांना औषध ठरवणे सोप्पे जाते. ज्यावेळी रुग्ण माहिती देण्यास सुरुवात करतो, तेव्हा होमियोपॅथीतज्ज्ञ काही नियमांनुसार ही तपासणी पुढे नेतात, रुग्ण जेव्हा आजाराविषयी किंवा स्वत:विषयी माहिती देऊ लागतो तेव्हा सर्वप्रथम पूर्ण एकाग्रतेने हे सर्व ऐकून घेणे हे तज्ज्ञांचे पहिले काम असते. यासाठी एकाग्रता का लागते? कारण, रुग्णांच्या माहितीमध्ये होमियोपॅथीतज्ज्ञ हे विशिष्ट व महत्त्वाची अशी लक्षणे शोधत असतात. याशिवाय रुग्णाच्या शरीरमुद्रा, विशिष्ट प्रकारचे हावभाव किंवा शारीरिक ठेवण, एखादी विशिष्ट प्रकारची लकब इत्यादी चिन्हेसुद्धा हेरता येतात. यामध्ये आजारपणाची लक्षणे व त्या माणसाची स्वत:ची लक्षणे ही वेगळी केली जातात. आजारपणाच्या लक्षणांवरून आजारांचे भौतिक निदान केले जाते व त्या माणसाच्या लक्षणांवरून तो कुठल्या प्रकृतीचा माणूस आहे, हे ठरवले जाते. आजाराच्या लक्षणांची तीव्रता, वेग व व्याप्ती पाहूनही कुठली लक्षणे घ्यायची हे ठरवले जाते. रुग्णाला बोलते करण्यासाठी जे विश्वासाचे वातावरण लागते, ते तज्ज्ञांच्या लक्षपूर्वक ऐकण्यातून तयार होते व रुग्ण बोलू लागतो. रुग्ण सर्व माहिती देत असताना त्यांच्या बोलण्यात अजिबात अडथळा आणला जात नाही. रुग्णाला त्यांच्या पद्धतीप्रमाणे माहिती देण्याची मोकळीक दिली जाते व फक्त रुग्ण माहिती देत असताना अवांतर विषयावर भरकटला, तरच तज्ज्ञ त्याला पुन्हा विषयावर आणण्याचे काम करतात. हल्लीच्या काळात जिथे डॉक्टर रुग्णांचे म्हणणे पूर्णपणे वा नीट ऐकूनही घेत नाहीत, अशा काळात होमियोपॅथीचे तज्ज्ञ मात्र पूर्ण वेळ देऊन ती ऐकून घेतात व त्यांना सहकार्य करतात. इथेच होमियोपॅथीचे महत्त्व उद्धृत होते.
 

रुग्णाचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतल्यावर मग तज्ज्ञ त्या रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या सहकाऱ्यांना रुग्णाविषयी माहिती विचारतात, जेणेकरून सर्व प्रकारची माहिती त्यांना उपलब्ध होते. याशिवाय रुग्णांचे म्हणणे व त्याच्या सहकाऱ्यांचे म्हणणे यातील साम्य व तफावत याचेही त्यांना ज्ञान होते. त्यानुसारच मग त्या रुग्णाची शारीरिक व मानसिक प्रकृती ठरवली जाते. बऱ्याचवेळा असे होते की, रुग्ण होमियोपॅथीचे औषध घ्यायला शेवटी येतो. त्याआधी त्यांनी इतर औषधशास्त्रांची औषधे बराच काळापर्यंत घेतलेली असतात. परंतु, त्याने बरे न वाटल्याने तो होमियोपॅथीकडे येतो. अशा केसमध्ये रुग्णाच्या मूळ आजाराची लक्षणे ही मुख्यत्वे दिसत नाहीत. कारण, त्या रुग्णाने इतर अनेक औषधे, प्रतिजैविके, वेदनाशामक गोळ्या, संप्रेरके, स्टिरॉईडस् अशा अनेक प्रकारच्या तीव्र औषधांचे सेवन केलेले असते. अशा वेळी मुख्य आजाराची लक्षणे व त्याचबरोबर ही औषधे घेतल्याने होणारे त्यांचे दुष्परिणाम यांचीदेखील लक्षणे त्यात समाविष्ट होतात याशिवाय संप्रेरके किंवा स्टिरॉईडस्सारख्या औषधांनी आजार दाबला (संप्रेशन) जातो. या सर्व प्रकारच्या लक्षणांचा नव्याने अभ्यास करावा लागतो. रुग्णाने जेवढी औषधे घेतलेली असतात त्यानुसार तो आजार जुनाट व क्लिष्ट होत जातो. कारण, काही औषधे ही निसर्गनियमानुसार तयार केलेली नसतात व नैसर्गिक घटकांपासूनही तयार केलेली नसतात. होमियोपॅथीक तपासणी पूर्ण झाल्यावर तज्ज्ञ त्यांची स्वत:ची निरीक्षणे व निदान लिहून ठेवतात. या तपासणीत रुग्ण जितक्या खुलेपणाने बोलेल त्यावर या तपासणीचे यश अवलंबून असते. जर संपूर्ण बरे व्हायचे असेल, तर रुग्णांनी होमियोपॅथीतज्ज्ञापासून काहीही लपवू नये. सर्व खरी माहिती द्यावी. ज्यामुळे रोगनिवारणास गती मिळते व लवकर रोगमुक्ती होते.

 
- डॉ. मंदार पाटकर 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@