नुक्ताचिन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018
Total Views |

 

 
 
 
 
आपल्याला जे पाहायचे आहे ते आपण दुसऱ्यात पाहतो. जे नाही पाहायचे ते नाही पाहत. दुसर्‍याकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन हा खरेतर तो स्वत:कडे कुठल्या नजरेने पाहतो यावर अवलंबून आहे. स्वत:मध्ये सद्गुण पाहणारा व त्यामुळे समाधानी असणारा दुसऱ्यांकडे स्वच्छ व निर्भळ नजरेतूनच पाहणार. कारण, तो संतुष्ट आहे.
 
 
आपल्याला आपल्या अवतीभवती आपण केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींची कदर करणारे लोक भेटले की, मनाला खूप प्रसन्न वाटते. मनाला समाधानाचा अनुभव येतो. तसेही कौतुकाचे बोल हवे हवेसे असतात. तसे पाहिले, तर सर्वसामान्यपणे माणसं ही चांगल्या गुणांचे व काही वाईट खोडींचे बनलेले रसायन म्हणायला हरकत नाही. आपल्या सगळ्यांमध्ये एक सद्गुणी व सुजाण माणसाचा निवास आहे. त्याचवेळी एखादा दुष्ट व जुलमी माणूसही त्याच्या आजूबाजूला आहेच. या पृथ्वीतलावर असा कोणीही नाही की, ज्याने एकही चूक केली नाही किंवा शरमेने मान खाली घालावी, असे काही केले नाही. म्हणून तर जेव्हा काही माणसे दुसऱ्यांवर टीकास्त्र सोडतात तेव्हा थोडेसे आश्चर्य वाटते व बऱ्याचदा खूप राग येतो.
 

तरीही अनेक लोक दुसऱ्यांवर सदैव टीका करताना दिसतात. दुसऱ्यांमधील कमीपणा शोधत राहतात. अगदी छिद्रान्वेषी मनाने दुसऱ्यामधील अपराधांचा शोध घ्यायची सवय त्यांना जडलेली असते. दुसऱ्यांना पारखत बसण्याशिवाय दुसरे काही अर्थपूर्ण करायचे त्यांना सूचत नाही. इतरांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे करून स्वत:ला न्यायाधीशाच्या खुर्चीत बसविण्यातच हे अतिशहाणे लोक धन्यता मानतात. जणू दुसऱ्यांच्या जीवनातील चुकांची यादी करण्यातच त्यांना धन्यता वाटते. कधी कधी हे अतिमहान लोक दुसऱ्यांनी चुका टाळण्यासाठी काय करायला हवे वा काय करायला नको याचे निर्णयसुद्धा स्वत:च घेताना दिसतात. ते दुसऱ्यांच्या चुकांचा ‘राईचा पर्वत’ करण्यासाठी सदैव तत्पर असतात. पण मानसशास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे जे सद्गुण वा जी नैतिकता असावी असे वाटते, ती दुसऱ्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसली नाही की त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण टीका करू लागतो. म्हणजे आपण आरशात ज्या व्यक्तीवर टीका करतो तिचे प्रतिबिंब पाहतो. त्या प्रतिबिंबात आपल्याला न आवडणाऱ्या आपल्याच गोष्टींची रुपरेखा आपण पाहतो व टीकेचा डोंगर उभा करतो. अर्थात, जगातल्या सुप्रसिद्ध महान व्यक्तींमध्येसुद्धा आपल्याला न आवडणाऱ्या न खपणाऱ्या गोष्टी आपण शोधू शकतो. महान संतांना आपण क्रूर ठरवू शकतो. हुशार शास्त्रज्ञांनाही आपण काही बाबतीत मूर्ख ठरवू शकतो. हे खरे तर या सगळ्या टीकेचे केंद्र आहे.

 

आपल्याला जे पाहायचे आहे ते आपण दुसऱ्यात पाहतो. जे नाही पाहायचे ते नाही पाहत. दुसऱ्याकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन हा खरेतर तो स्वत:कडे कुठल्या नजरेने पाहतो यावर अवलंबून आहे. स्वत:मध्ये सद्गुण पाहणारा व त्यामुळे समाधानी असणारा दुसऱ्यांकडे स्वच्छ व निर्भळ नजरेतूनच पाहणार. कारण, तो संतुष्ट आहे. जेव्हा टीका करायची, दुर्गुण शोधायची दृष्टी ही प्रदीर्घ प्रवृत्ती बनते, तेव्हा मात्र खरे संकट समोर उभे राहते. दुर्योधनाला सद्गुण असणाऱ्या पांडवांमध्ये दुर्गुण दिसतात, तर रावणाला प्रभू श्रीराम शत्रू समान वाटतात. थोडक्यात काय, अशा वेळी टीकोजीरावांची टीका एकंदरीत आजारी पडते, त्यात आरोग्याचा अंशही दिसत नाही. या टीकेत दुसऱ्याला इजा होण्याची शक्यता जास्त दिसून येते. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे वाक्य हे विधायक लोकांसाठी समर्पक आहे पण, निंदक जेव्हा दुष्ट, आपमतलबी व आत्मकेंद्रित असतात तेव्हा ते चांगल्या व्यक्तीपासून हजारो मैल दूर असलेले बरे. कारण, त्यांच्यातला अतृप्त व रोगट माणूस दुसऱ्याच्या निंदेत एक क्रूर आनंद घेऊन जगत असतो. असा माणूस स्वत:चे अपरिमित नुकसान तर करतोच पण, दुसऱ्यांचा सर्वनाश करण्यासाठी तत्पर असतो. ते दुसऱ्यासाठी छोटीशी चांगली गोष्ट करू शकत नाहीत. दुसऱ्यांना कसलीही सवलत देऊ शकत नाहीत. या लोकांना आत्मविश्वास व आत्मसन्मान कमी असतो. टीका, अपमान, उपहास वा धिक्कार या भावना आपल्याला सर्वत्र दिसतात. बऱ्याच वेळा माणूस स्वत:चा झालेला उपहास व अपमान दुसऱ्यांवर व्यक्त करून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन देतो. कधीकधी असेही असेल की, या माणसांना कुणी मनापासून स्वीकारले नसेल, त्यामुळे त्यांंना आपण चांगुलपणा कसा वाटावा, याची जाणीवही नसेल. दुसऱ्यांची मानहानी करणाऱ्या लोकांची ही सवय मात्र अनेक अजाण व निष्पाप लोकांना वेदना देते. अनेक नात्यांची वाताहत लावते. ‘गालीब’ने या माणसांच्या भावनेला ‘नुक्ताचिन’ म्हटले आहे. ते तिच्याकडेही प्रेम व्यक्त करू शकत नाहीत. त्यांनी ते भाव रोमॅटिक शब्दात व्यक्त केले आहेत,

 

नुक्ता चीन है गम-ए-दिल

उसको सुनाए न बने...’

 
 
 
 - डॉ. शुभांगी पारकर
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@