महागठबंधन, तिसरी आघाडी आणि रालोआ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2018   
Total Views |


जो पक्ष ज्या राज्यात मजबूत आहे, त्याने मोठ्या भावाची भूमिका वठवावी. इतरांनी त्याला सहकार्य करावे. नाही तर आघाडी टिकणार नाही, असा इशारा आताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. अजून कशात काही नसतानाच असे इशारे देणे चालू झाल्याचे पाहता पुढे काय काय घडू शकते, याचा अंदाज बांधायला हरकत नाही.

 

लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशी महागठबंधन, तिसरी आघाडी अशा आघाड्या करण्यासाठी विविध विरोधी पक्षांची धडपड चालू आहे. आगामी निवडणुकीत आघाडी करणार्‍या विरोधकांचा एककलमी कार्यक्रम आहे, तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि रालोआ यांना पराभूत करून दिल्लीचे तख्त आपल्या ताब्यात घेणे. यासाठी कसलाही विधीनिषेध न बाळगता विरोधक एकत्र येऊ लागले आहेत. एकेकाळी एकमेकांना पाण्यात पाहणारे पक्षही भाजप सत्तेवर येता कामा नये, या हेतूसाठी एकमेकांच्या गळ्यांत पडू लागले आहेत.

 

आगामी काळात, भाजपला विरोध करणारे पक्ष आणि स्वत:च्या कपाळावर पुरोगामित्वाचा टिळा लावणारी तथाकथित मंडळी नवनवीन मुद्दे उपस्थित करून भाजप, संघ परिवार यांची जास्तीत जास्त बदनामी करण्याचा प्रयत्न करणार हे स्पष्टपणे दिसून येऊ लागले आहे. अभिनेता नसीरुद्दीन शाह याने अलीकडे जे तारे तोडले, ते अशा प्रयत्नाचाच एक भाग, असे म्हणता येईल. आता अशाच कथित पुरोगामी मंडळींना, भारतात असहिष्णुतेने मोठ्या प्रमाणात डोके वर काढल्याचा एकदम साक्षात्कार झाला आहे. भाजप, संघ परिवाराची बदनामी करण्याच्या षड्यंत्राचा भाग म्हणून त्यांचे हे उपद्व्याप चालले आहेत, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. पण अभिनेता अनुपम खेर, गृहमंत्री राजनाथ सिंह आदी मंडळींनी या अपप्रचाराला सडेतोड उत्तरे देऊन त्यांची तोंडे बंद केली आहेत. असे असले तरी निवडणुका जसजशा जवळ येतील तसतशी ही भुतावळ अधिक थयथयाट करणार, हे निश्चित.

 

पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये जेथे भाजपची प्रदीर्घ सत्ता होती, तेथे भाजपच्या हातातून सत्ता गेल्याने विरोधक हुरळून गेले आहेत. आता दिल्ली जवळ आली असल्याचे त्यांना वाटत आहे. पण लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या पराभवाने भारतीय जनता पक्षाला मात्र सावधगिरीचा इशारा दिला आहे. आपल्या सरकारच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याबरोबरच विरोधकांच्या अपप्रचारास सडेतोड उत्तरे देण्याची सिद्धता त्या पक्षाला करावी लागणार आहे. पक्ष संघटना अधिक भक्कम करण्याकडे लक्ष देण्याचा आग्रह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून धरला जाऊ लागला आहे. बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांचा आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वांशी संपर्क वाढायला हवा, यावर भर दिला जाऊ लागला आहे. कशामुळे पराभव झाला, काय चुकले याचा शोध पक्षाकडून एव्हाना घेतला गेला असेलच. झालेल्या चुका टाळून पूर्ण ताकदीनिशी पक्ष मैदानात उतरला तर विजय अशक्य नाही. विधानसभा निवडणुकीत तीन राज्ये भाजपच्या हातातून गेली असली तरी लोकसभा निवडणुकीत भाजपलाच यश मिळेल, असा अंदाज राजकीय जाणकारांनी व्यक्त केला असला तरी त्यावर संतुष्ट राहून गाफील राहता कामा नये. सगळे विरोधक केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी भाजपला पराभूत करण्यासाठी टपले आहेत. त्या सर्वांचे मनोरथ धुळीस मिळविण्याची शक्ती भारतीय जनता पक्षात नक्कीच आहे.

 

याबरोबरच अनावश्यक वाद निर्माण होणार नाहीत, याची काळजी भाजपने घ्यायला हवी. अलीकडे एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी, आमच्या पक्षात नेते भरपूर असल्याने त्यांना बोलण्याचा मोह आवरत नाही, अशा अर्थाचे विधान केले होते. अशा नेत्यांच्या वक्तव्यांनी मूळ विषय बाजूला राहतो आणि नको ते विषय पुढे येतात, त्याला अनेक फाटे फुटत जातात, त्यातून नसते वाद निर्माण होतात, हे अशा नेत्यांच्या लक्षात कधी येणार? असे असले तरी अलीकडील पराभवातून सावरून लोकसभा निवडणुकीत पूर्ण तयारीनिशी उतरण्याची सिद्धता भाजपने चालविली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने गुजरातमधील जसदान मतदार संघातील जागा जिंकली आहे. गुजरातचे मंत्री कुंवरजी बावलिया यांनी काँग्रेस उमेदवाराचा १९ हजार, ९७९ मतांनी पराभव करून ही जागा जिंकली. या विजयाने गुजरात विधानसभेत भाजपचे संख्याबळ १०० झाले आहे. झारखंड राज्यातील कोलेबिरा मतदार संघात मात्र काँग्रेसचा विजय झाला आहे.

 

दुसरीकडे भाजपला पराभूत करण्यासाठी महागठबंधन तयार करण्याचे प्रयत्न चालू असले तरी त्यास अजून मूर्त स्वरूप येताना दिसत नाही. केवळ शपथविधी समारंभांना हजेरी लावून आणि हातात हात घालून छायाचित्रे काढून घेतली म्हणजे महाआघाडी निर्माण होत नाही! सध्या काँग्रेसच्या पुढाकाराने महाआघाडी आकार घेत आहे. पण ही आघाडी देश पातळीवर नव्हे तर राज्य पातळीवर व्हायला हवी. जो पक्ष ज्या राज्यात मजबूत आहे, त्याने मोठ्या भावाची भूमिका वठवावी. इतरांनी त्याला सहकार्य करावे. नाही तर आघाडी टिकणार नाही, असा इशारा आताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. अजून कशात काही नसतानाच असे इशारे देणे चालू झाल्याचे पाहता पुढे काय काय घडू शकते, याचा अंदाज बांधायला हरकत नाही. द्रमुकचे नेते स्टालिन यांनी राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर आघाडीत सहभागी होऊ इच्छिणारे अनेक पक्ष नाराज झाले होते. असे असूनही स्टालिन यांनी आपल्या मताचा पुनरुच्चार केला आहे!

 

विभिन्न विचारांचे पक्ष आपली तत्त्वे विसरून केवळ भाजपला पराभूत करण्यासाठी एकत्र आले असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाआघाडीत सहभागी झालेल्या पक्षांवर केली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बसप काँग्रेसला वगळून आघाडी करणार असल्याच्या वृत्ताबद्दल काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी चिंता व्यक्त केली आहे. काँग्रेसला वगळून उत्तर प्रदेशात आघाडी केल्यास भाजपविरोधातील कोणतीही राष्ट्रीय आघाडी दुर्बळ ठरेल, असे ते म्हणतात. महाआघाडीबद्दल अखिलेश यादव, मायावती यांनी आपले पत्ते अजून पूर्णपणे उघडले नाहीत, असाच याचा अर्थ!

 

महाआघाडीबाबतची अशी स्थिती तर दुसरीकडे तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे काँग्रेस आणि भाजपला वगळून तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी नुकतीच ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी याबाबत चर्चा केली. प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही ते भेट घेणार आहेत. पटनायक यांच्या भेटीतून ठोस काही निष्पन्न झाले नाही. आपण पुन्हा त्यांची भेट घेण्यासाठी येऊ, असे त्यांनी म्हटले आहे. प्रादेशिक पक्षांनी एकत्र येणे हे अत्यंत निकडीचे आहे. भाजप आणि काँग्रेसला तो पर्याय ठरू शकतो, असे त्यांचे मत आहे. महागठबंधन आणि तिसरी आघाडी निर्माण करून रालोआला आव्हान देण्याचे प्रयत्न चालले असले तरी अशा आघाड्या प्रत्यक्षात कसा आकार घेतात, हे पाहण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. विरोधकांची ही अवस्था लक्षात घेऊन लोकसभा निवडणूक प्रचारात भाजपने मुसंडी मारल्यास विरोधकांना चीत करणे सहज शक्य आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@