...आणि नसिरुद्दीन जागा झाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2018
Total Views |



काँग्रेसच्या तीन राज्यातील विजयामुळे आतापर्यंत कुंभकर्णी झोपेत गेलेली मंडळी आपापल्या बिळातून बाहेर पडू लागली आहेत. असहिष्णुतेबद्दलचे नसिरुद्दीन शाह यांचे विधान त्याचीच साक्ष. भिवंडी, गोध्रा इथे जिवंत जाळलेल्या पोलिस व कारसेवकांची नसिरुद्दीन शाह यांनी कधी फिकीर केली नाही. पण आता मात्र निवडणुका जवळ आल्याने या लोकांना कंठ फुटल्याचे दिसते.


उत्कृष्ट कलाकार माणूस म्हणून किती निकृष्ट विधाने करू शकतो, याचा अनुभव नुकताच देशवासीयांनी घेतला. उत्तर प्रदेशात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेवरून चित्रपट कलाकार नसिरुद्दीन शाह यांनी देशातल्या कथित असहिष्णुतेची टिमकी वाजवली. यावर काही भाष्य करण्याआधी आपल्या विधानाचा गैरफायदा घेऊ पाहणाऱ्या पाकिस्तानी पंतप्रधान इमरान खान यांना सुनावल्याबद्दल नसिरुद्दीन शाह यांचे अभिनंदन. आता मुद्दा येतो शाह यांच्या विधानाचा. बुलंद शहर या ठिकाणी काही दिवसांपूर्वी गोतस्करीच्या संशयावरून एका जमावाने गोंधळ घातला व यातच एका पोलीस अधिकाऱ्याला आपल्या प्राणास मुकावे लागले. ही नक्कीच उद्वेगजनक आणि खेदमूलक घटना. नसिरुद्दीन शाह यांनी याच घटनेचा बाऊ करत आजकाल देशात गायीपेक्षा पोलिसाचा जीव स्वस्त झाला असून अशा हिंसक वातावरणाने ग्रासलेल्या भारतात मला माझ्या मुलांच्या सुरक्षेची काळजी वाटते, अशा आशयाचे विधान केले. मुळात पंचतारांकित आयुष्य जगणाऱ्या नसिरुद्दीन शाह यांनी स्वतःच्या आणि स्वतःच्या मुलाच्या किंवा कुटुंबीयांच्या सुरक्षेची चिंता करण्याचे काहीही कारण नाही. भारतीय संविधानाने सीमेवर उभे राहून देशाची सुरक्षा करणाऱ्या जवानांवर दगडफेक करणाऱ्यांनाही सर्व प्रकारचे मानवी अधिकार प्रदान केलेले आहेत, तिथे नसिरुद्दीन शाह किंवा त्यांच्या कुटुंबीयांची काय कथा? शाह यांनी निर्धास्त व बिनधास्त राहावे. उलट इथली व्यवस्थाच अशी आहे की, जो देशहिताची कामे करतो त्याच्या मार्गात काटेच काटे येतात तर जो देशहिताला सुरुंग लावतो त्याच्यासाठी प्रसारमाध्यमांसह न्यायपालिकाही मध्यरात्री दरवाजे उघडते. विशेष म्हणजे शेकडो भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्याला वाचविण्यासाठी पुरोगामी, बुद्धिजीवी विचारवंतांच्या बरोबरीने नसिरुद्दीन शाह हेदेखील हिरीरीने पुढाकार घेतात. आपल्या या कृत्यातून नसिरुद्दीन शाह यांनी बॉम्बस्फोटात ज्यांनी आपल्या जीवाभावाची व्यक्ती कायमची गमावली, त्यांच्या वेदनेची, यातनेची, दुःखाची कधी फिकीर केली नाही, हेच स्पष्ट होते. त्यामुळे नसिरुद्दीन शाह यांची सुरक्षितता, असहिष्णुता याबद्दलची ताजी विधाने केवळ दांभिकतेचे प्रदर्शन करणारी किंवा राजकीय प्रेरणेने केलेली पोपटपंचीच ठरते.

 

२०१४ साली देशात मोदी सरकार आल्यानंतर पुरस्कार वापसी गँगने चांगलेच आकांडतांडव केल्याचे सर्वांना स्मरत असेल. जे घडलेच नाही, ते घडल्याचा बभ्रा करत या लोकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची यथेच्छ बदनामी केली. यात दिल्लीतल्या रंगीबेरंगी पार्ट्यांपासून वंचित राहिलेले पत्रकार, लेखक होते, वर्षानुवर्षे डाव्या विचारांचा लाल झेंडा निरनिराळ्या विद्यापीठे व संस्थांमध्ये गाडणारे विचारवंत, बुद्धिजीवी होते, फुटकळ कारणांवरून विकासकामांना विरोध करणारे पयार्र्वरणवादी होते आणि नको त्या लोकांच्या मानवाधिकारावरून रात्रंदिवस बोंबलत सुटणारे स्वयंघोषित समाजसेवकही होते. आता हीच मंडळी पुन्हा एकदा आपापल्या बिळातून बाहेर पडून सक्रिय झाल्याचे दिसते. याला कारण अर्थातच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांतला काँग्रेसचा विजय हे होय. तीन राज्यांच्या विधानसभा निकालांमुळे या लोकांच्या कुपोषित विचारांना चांगलाच खुराक मिळाला असून कधी एकदा राहुल गांधी पंतप्रधानपदी विराजमान होतायत, याची त्यांना स्वप्ने पडू लागली आहेत. याचीही काही कारणे आहेत. नरेंद्र मोदी या माणसाने वर उल्लेख केलेल्या मंडळींच्या आतापर्यंतच्या हिरव्याकाळ्या उद्योगांना असा काही चाप लावलाय की, त्यांना हा माणूसच नकोसा झाला. म्हणूनच देशातल्या कथित असहिष्णु वातावरणावरून बोलघेवडेपणा करत मूळची मोदीविरोधाची मळमळ या लोकांच्या मुखातून सातत्याने बाहेर पडत असते. गेल्या काही दिवसांत यापैकीच काही लोकांनी ‘आर्टिस्ट युनाईट’ नावाने एकत्र येत लोकशाही वाचवण्याची हाळी दिली. जवळपास ४५० लोक यात सहभाग घेणार असून देशातली लोकशाही धोक्यात आल्याचा या मंडळींचा दावा आहे. अशोक वाजपेयी, मल्लिका साराभाई, अरुंधती रॉय, चित्रा पालेकर हे लोक या गटाचे म्होरके असतील. पण लोकशाही रक्षणाच्या नावाखाली एकत्र आलेल्या या लोकांना लोकशाहीची किंवा सहिष्णुतेची खरोखरच काही फिकीर वाटत असेल, असे समजण्याचे काहीही कारण नाही. कारण या लोकांची आतापर्यंतची वागणूक लोकशाहीवर अविश्वास दाखवणारीच राहिली. सोबतच आताच या लोकांना अशी काय उबळ आली की, लोकशाही धोक्यात आल्याचे, असहिष्णुता वाढीस लागल्याचा आरडाओरडा ते करू लागले? साहजिकच आगामी वर्षात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची त्याला पृष्ठभूमी आहे आणि या लोकांना फक्त भाजपचा, पर्यायाने राष्ट्रवादी विचारांचा विरोध करायचा आहे. त्यासाठीच त्यांचा सगळा आटापिटा चालू आहे. अर्थात हा काही आजचाच प्रकार नाही. पाच-साडेपाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून निवड झाली तेव्हापासून काँग्रेसी तुकड्यांवर पोसत आलेल्या लोकांनी हीच कामे केली व आताही तसलीच कामे करण्यासाठी त्यांना हुरूप आला आहे.

 

नसिरुद्दीन शाह हे याच टोळक्यातले आणखी एक ‘चिंता’मणी, असे आपण म्हणू शकतो. देशाच्या सांस्कृतिक, कलासक्त वातावरणाला कलाकार, चित्रकार, साहित्यिक हे नेहमीच समृद्ध करत असतात. अशा मंडळींच्या अभिव्यक्तीतूनच समाजाच्या जाणिवा प्रगल्भ होत असतात. सोबतच कलाकारांच्याही आपापल्या राजकीय, वैचारिक भूमिका असू शकतात. पण आताचा मुद्दा या लोकांच्या भूमिकांचा नव्हे तर दुटप्पीपणाचा आहे. कोणत्याही जीवाची हत्या होणे, कसल्याही प्रकारची हिंसा करणे, नेहमीच निषेधार्ह, पण निषेधाच्या निवडक चिरक्या आवाजाचे काय? हत्येविरोधात, हिंसाचाराविरोधात बोलणाऱ्यांच्या सापेक्षपणाचे काय? बुलंद शहर येथे जमावाच्या गोंधळात जसा एका पोलीस अधिकाऱ्याचा बळी गेला तसाच बळी याआधीही गेलेला आहे. त्यावेळी आज कंठ फुटलेल्या लोकांनी कशाचा आणि कोणाचा तोबरा तोंडात भरला होता? पहलू खान, अकबर खान यांच्या मृत्युवरून छाती पिटणाऱ्यांना कधी प्रशांत पुजारी, संजीव गुर्जर यांची कलेवरे पाहून का पाझर फुटला नाही? गोमाफियांच्या, गोतस्करांच्या वारांना हे लोक बळी पडले. हे केवळ गोहत्येच्या बाबतीतच नाही. अगदी २००६ साली भिवंडीला धर्मांध मुसलमानांनी आपल्या भागात पोलीस ठाणे नको म्हणून जिवंत जाळलेल्या जगताप आणि गांगुर्डे या दोन पोलिसांच्या जीवाचे काय? २०१२ साली मुंबईच्या आझाद मैदानावर रझा अकादमीच्या धर्मांध गुंडांनी धिंगाणा घातला, ज्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलचा विनयभंग केला, त्यावेळी आज बडबड करणाऱ्यांनी कुठल्या मातीत चोच खुपसली होती? धर्मांधांच्या या झुंडशाहीचा लोकशाहीच्या कथित राखणदारांनी, सहिष्णुतेची चिंता वाहणाऱ्यांनी कधी विरोध का केला नाही? गोध्रा रेल्वेस्थानकात ५९ कारसेवकांचा कोळसा करण्यात आला, त्याविरोधात का कोणी टाळूला जीभ लावली नाही? त्यावेळी ही मंडळी कुंभकर्णी झोपेत होती आणि आता काँग्रेसच्या तीन राज्यांतील विजयामुळे त्यांची झोपेची झिंग उतरल्याचे दिसते. म्हणूनच आता या लोकांनी डराँव डराँव सुरू केल्याचे स्पष्ट होते.

 

दुसरीकडे यात अर्थातच प्रसारमाध्यमांचीही निश्चित अशी भूमिका आहे. निवडक घटना दिवसरात्र लोकांसमोर नाचवायच्या आणि आपल्या निरपेक्षपणाचे ढोल पिटायचे, हा कित्ता कितीतरी मीडिया हाऊसेस गिरवतात. सोबतच विशिष्ट घटनेचा बुद्धिजीवी, विचारवंतांनी विरोध केला तर त्याला अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे गोंडस नाव लावले जाते आणि राष्ट्रवाद्यांनी विरोध केला तर त्याला असहिष्णुतेचे लेबल चिकटवले जाते. हे काय चाललेय? ही कोणती सहिष्णुता आहे? ही कोणती लोकशाही आहे? भारत आणि भारतीय समाज आपल्या अस्तित्वापासूनच सहिष्णू आहे, हे खरे म्हणजे नसिरुद्दीन शाह आदी मंडळींनी लक्षात घ्यावे. म्हणूनच इथे जो आला तो इथलाच झाला आणि हे केवळ ऐतिहासिक काळात नव्हे तर आधुनिक काळातही. म्हणूनच धर्मांधांच्या दहशतीमुळे बांगलादेशातून परागंदा व्हावे लागलेल्या तस्लिमा नसरीन भारतात आश्रयाला येतात, गेल्या सहा वर्षांपासून पाकिस्तानात कैदेत असलेल्या हमीद अन्सारीला भारताची ओढ लागते आणि रोहिंग्या मुसलमानही भारतातच घुसखोरी करतात. ते इथल्या सौहार्दामुळे आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या स्वभावामुळेच. नसिरुद्दीन शाह यांनी आपल्या विधानांमुळे त्याला चूड लावण्याचे काम करू नये.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@