अर्थव्यवहार : कच्च्या खनिज तेलाच्या किंमती तळ गाठण्याच्या मार्गावर ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

 
कच्च्या खनिज तेला(क्रूड)च्या किंमती गेल्या दोन महिन्या त उच्च पातळीवरुन खूपच खाली आलेल्या असून त्या तळ (बॉटम)गाठण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी तर त्या 5 टक्क्यांनी घसरल्या होत्या. याचे प्रमुख कारण म्हणजे क्रूडचा मागणीपेक्षाही भरपूर पुरवठा, पर्यायी उर्जा स्त्रोतांचा शोध व अमेरिकेच्या फेडरल बॅकेने वाढविलेले व्याजदर होय. याचा फटका वॉल स्ट्रीट(अमेरिकन शेअर बाजारा)लाही बसलेला असून त्याचे सर्व निर्देशांक दक्षिणे(मंदी)कडे झुकलेले आहेत.
ब्रेन्ट क्रूडची किंमत 5 टक्क्यांनी कमी होऊन प्रति पिंपामागे 54 डॉलर 35 सेंट्स इतकी एकाच दिवसात घटली होती. तर वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचा भाव 4.75 टक्क्यांनी घसरुन प्रति पिंपामागे 45 डॉलर 88 सेंट्सपर्यंत आला होता. गेल्या सुमारे तीन वर्षांपूर्वी ही किंमत प्रति पिंप 30 डॉलर्सच्याही खाली गेली होती.
 
 
गेल्या दोन महिन्यांपूर्वी याच क्रूडच्या किंमतीने गेल्या चार वर्षातील सर्वोच्च पातळी गाठलेली होती. ब्रेण्ट क्रूड तर प्रति पिंपामागे 87 डॉलर्सपेक्षाही महाग झाले होते. त्यामुळे भारतासारख्या तेलाची गरज भागविण्यासाठी आयातीवर अवलंबून असलेल्या देशांची मोठी आर्थिक कोंडी झाली होती. पण क्रूडच्या घटत्या भावामुळे त्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे.
 
 
2018 हे वर्ष अनेक प्रकारच्या घडामोडींचे ठलले असून या वर्षभरात शेअर बाजारात मोठे चढउतार झाले असले तरी वर्षाची अखेर काहीशी सकारात्मक होण्याची आशा तज्ञांना वाटत आहे. अशीच वाटचाल पुढील 2019 मध्ये सुरु राहिली तर मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) 45 हजार बिंदू तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) 12 हजार बिंदूंच्याही वर जाण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र आगामी वर्षाच्या प्रारंभाला सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजत असतांना शेअर बाजार थोडा अस्थिर (व्होलाटाईल)होऊ शकतो. या वर्षात सेन्सेक्स लवकरच 40 हजार बिंदूंपर्यंत जाऊन पोहोचणे शक्य असल्याचेही तज्ञांचे म्हणणे आहे. तो कदाचित 45 हजार बिंदूंच्या पातळीला स्पर्शही करु शकतो असे काही तज्ञांचे मत आहे. तर काहींच्या मते सेन्सेक्स 40 हजार ते 43 हजार बिंदूंदरम्यानही जाऊ शकतो.
 
 
निफ्टीच्या बाबतीतही तज्ञांच्या म्हणण्यानुसार तो 12 हजार बिंदूंची लक्ष्मणरेषा ओलांडून 12 हजार 500 बिंदूंपर्यंत झेप घेऊ शकतो. तर निफ्टी 11 हजार बिंदू ते 12 हजार बिंदूंदरम्यान राहण्याची शक्यता काही तज्ञांनी व्यक्त केली आहे.एवढे मात्र खरे की आगामी वर्षात हे दोन्ही निर्देशांक विक्रमी उंची गाठण्याच्या शक्यतेवर तज्ञांचे एकमत आहे. फक्त एकदा का निवडणुकीची धामधूम संपली की बाजाराची वाटचाल तेजीकडे होऊ शकते असे चित्र पुढील वर्षात राहणार आहे.
 
 
जसजसा डिसेंबर महिना संपत आलेला आहे तसतशी पुढील वर्षाची चाहूल सर्वांना लागलेली आहे. त्याआधीच आपल्या पोर्टफोलिओतील शेअर्सची अचूक निवड करुन तो सुधारण्याची शिफारस तज्ञांनी केलेली आहे. याचे कारण म्हणजे पुढील वर्ष बाजाराच्या दृष्टिने रोमांचक ठरणारे आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी व नंतर बाजार आपली चाल कशी बदलतो ते पाहावे लागणार आहे. तसेच त्यासाठी विशिष्ट धोरण(स्ट्रॅटेजी)ही आवश्यक राहणार आहे.
 
 
 
2018 हे वर्ष तसे पाहिले तर संमिश्रच राहिले. पण 2019 हे वर्ष आव्हानात्मक राहणार आहे. या वर्षात एफएमसीजी (ग्राहक व्यवहार)कंपन्यांवर अधिक भर राहील. तसेच बिगर बँकिंग वित्तीय संस्थां(एनबीएफसी)वर ही लक्ष ठेवणे गरजेचे ठरणार आहे. या वर्षात बाजारात मोठी उलाढाल होऊ शकते. अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदरवाढीसह अनेक निर्णयांवर बाजाराची नजर राहणार आहे.
 
 
देशाची राजधानी दिल्ली व आर्थिक राजधानी मुंबई व सांस्कृतिक राजधानी कोलकाता दरम्यान लवकरच अतिअतिवेगवान (सुपर सुपर फास्ट)रेल्वेगाड्या सुरु होणार आहेत. त्यासाठी रेल्वेमार्गाची सुधारणा केली जाणार आहे. त्यात रुळांची क्षमता वाढविणे व वळणे काढून टाकणे यांचा समावेश आहे. तसेच या मार्गावरील गाड्यांचा सरासरी वेग ताशी 80 ते 100 किलोमीटर इतकाच आहे. तो दुपटीपेक्षा जास्त वाढविण्यात येणार असून मुंबई ते दिल्ली हे सुमारे 1500 किमीचे अंतर अवघ्या सहा तासात पार करणे शक्य होणार आहे.
नफावसुलीने कोसळला बाजार, निफ्टीत 200, सेन्सेक्समध्ये 700 बिंदूंची घट
लागोपाठच्या तेजीनंतर शेअर बाजारात आज आठवड्याच्या अखेरच्या दिवशी झालेल्या प्रचंड नफावसुलीमुळे जोरदार घसरण होऊन राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) व मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) हे अनुक्रमे 197 बिंदू व 689 बिंदूंनी कोसळले. निफ्टी व सेन्सेक्स हे आज सकाळी अनुक्रमे 10 हजार 944 बिंदू व 36 हजार 449 बिंदूंवर उघडीत दिवसभरात अनुक्रमे 10 हजार 963 बिंदूंच्या व 36 हजार 483 बिंदूंच्या उच्च तर 10 हजार 738 बिंदू व 35 हजार 694 बिंदूंच्या खालच्या स्तरावरुन परत येत दिवसअखेरीस अनुक्रमे 10 हजार 754 बिंदू व 35 हजार 742 बिंदूंवर बंद झाले. तर बँक निफ्टीही 405 बिंदूंनी घटून 26 हजार 869 बिंदूंवर बंद झाला. भारतीय रुपयाही 33 पैशांनी घटून प्रति डॉलरमागे 70 रुपये 3 पैशांपर्यंत तर कच्चे खनिज तेलही (क्रूड)31 रुपयांनी कमी होऊन प्रति पिंपामागे 3214 रुपयांवर आले होते. ही क्रूडची गेल्या सहा महिन्यातील सर्वात कमी किंमत होती.
@@AUTHORINFO_V1@@