माणुसकीचा धर्म हीच उपासनेची अंतिम फलश्रुती : सरसंघचालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |


 

मुंबई :आजच्या दत्त जयंतीच्या दिवशी इथे सर्वांनाच धर्माचे दर्शन झाले. आपला धर्म उपासनेची, पूजा-अर्चनेची दिशा दाखवतो. पण, खरा धर्म कसा आचरणात आणायचा, ते आज आपल्याला समजले. उपासना आपल्याला दिशा दाखवते, ती म्हणजे माणसाशी माणसासारखे कसे वागावे ही होय. उपासनेची अंतिम फलश्रुती माणुसकीचा धर्म हीच आहे,” असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.

 

नूतन गुळगुळे फाऊंडेशन यांच्यावतीने प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात दिव्यांगांच्या कौतुकाचा, गौरवाचाध्येयपूर्ती पुरस्कारसोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ. मोहनजी भागवत बोलत होते. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक असलेल्या सारस्वत सहकारी बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, डॉ. रेखा डावर, नुतन गुळगुळे फाऊंडेशनच्या अध्यक्षा नुतन गुळगुळे आणि मुलगा पुष्कर गुळगुळे यावेळी मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ. मोहनजी भागवत आणि गौतम ठाकूर, तसेच डॉ. रेखा डावर यांच्या हस्ते आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य करणार्या दिव्यांगांचा, कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने समाजातील मान्यवर, सुहृद आणि दिव्यांगजन उपस्थित होते.

 

सरसंघचालक आपल्या अध्यक्षीय संबोधनात म्हणाले की, “सत्य, संवेदनशीलता, शुचिता आणि तपश्चर्या हे धर्माचे चार घटक आहेत. अशा सर्वांना जोडणार्या, सर्वांचे जीवन उन्नत करणार्या, सगळीकडे मंगल सुखाची वर्षा करणार्या धर्माचे दर्शन येथे घडले. आपल्या अडीअडचणींवर मात करुनतमसो मा ज्योतिर्गमयही प्रार्थना सार्थ करुन दाखवणार्या सगळ्याच महानुभावांना आपण इथे पाहिले. आज या सर्वांच्या उपस्थितीमुळे साधुसंतांचा सत्संग घडल्याची भावना माझ्या मनात निर्माण होत आहे. यांना कोणी धर्माचार्य म्हणणार नाही, पण ते सत्य धर्माचे, माणसाला माणसाशी माणुसकीच्या नात्याने वागायला शिकवणारे आचार्य नक्कीच आहेत,” अशा शब्दांत त्यांनी सत्कारमूर्तींचे कौतुक केले.

 

धडधाकट व्यक्ती एखादे काम झाले नाही तर अनंत कारणे सांगतो. पण, इथे ज्यांना आपण पाहिले, त्यांच्या अडचणींना तर अंतच नाही. तरी त्यांनी त्यावर मात करुन स्वत:सोबत दुसर्यांच्याही उन्नतीसाठी हातभार लावला. हे पाहून तरी इतरांनी अडचणी सांगायला नको,” असेही ते म्हणाले. संत ज्ञानेश्वरांबद्दल सरसंघचालक म्हणाले की, “विश्वाचे आर्त जाणून संत ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणाची कामना केली. परहिताकरिता स्वहिताचा त्याग करण्यातूनच संवेदनशीलता मनात उमटते. संवेदनशीलतेतूनच शुचिता, पावित्र्यता मनात वास करते. आपल्याला माणसाने माणसाशी कसे वागले पाहिजे, हे समजायला हवे. असे वागण्याची पवित्रता तपश्चर्येतून मिळते. याची कितीतरी उदाहरणे आहेत. त्यातली काही आपण आता पाहिली,” असे ते म्हणाले.

 

समाज हा माणुसकीच्या धर्माने चालतो, इथे हाच माणुसकीचा धर्म पाहायला मिळाला. आपल्यापैकी प्रत्येकाने हजारो नव्हे, निदान पाच लोकांच्या तरी सुखासाठी काम करावे,” अशी अपेक्षाही यावेळी बोलताना डॉ. मोहनजी भागवत यांनी व्यक्त केली. शिवाय असा सन्मान सोहळा आयोजित करणार्या गुळगुळे परिवाराने रक्ताच्या नात्यापलीकडे आपले कुटुंब वाढवल्याचेही सरसंघचालकांनी म्हटले.

 

सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “इथून मी नेहमीच धैर्याच्या आणि शौर्याच्या गाथा घेऊन जातो. विशेष म्हणजे, हा कार्यक्रम, इथल्या दिव्यांगजनांचे कार्य पाहिले की, वर्षभर आपले पाय जमिनीवर राहतात,” असेही ते म्हणाले. गौतम ठाकूर यांनी यावेळी सारस्वत बँकेच्या दिव्यांगज्योती कर्ज योजनेचाही शुभारंभ केला. या योजनेंतर्गत दिव्यांगांना कमी व्याजदरावर, प्रक्रिया शुल्काशिवाय, विना जामिनदार कर्ज देण्यात येणार आहे. हे कर्ज व्यवसायासाठी तसेच उपचारांसाठीही दिले जाईल, अशी घोषणा यावेळी ठाकूर यांनी केली. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक नुतन गुळगुळे यांनी केले. यावेळी डॉ. रेखा डावर, अ‍ॅ. चैत्रा पवार आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले.


 

माहितीच्या महापुरात रोजच्यारोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@