चाळीसगावात स्टॅम्प वेंडर्सकडून नागरिकांची लूट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2018
Total Views |

कारवाईची मागणी; जागो ग्राहक संस्थेचे नायब तहसीलदारांना निवेदन

 
 
चाळीसगाव : 
 
तहसील कार्यालयाबाहेरील आवारात काही अधिकृत वेंडर्सकडून नागरिकांना चढ्यादराने स्टॅम्प पेपरची विक्री केली जात असून ही लूट तत्काळ थांबवून वेंडर्सचे सेल रजिष्टरची तपासणी करून दोषी वेंडर्सवर कारवाई करण्याची मागणी जागो ग्राहक जागो संस्थेच्या वतीने नायब तहसीलदार भालेराव यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 
 
नायब तहसीलदार भालेराव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील इतर तालुक्यात नागरिकांना स्टॅम्प पेपर तत्काळ मिळत असताना चाळीसगाव तहसील कार्यालयाच्या कक्षेत असलेल्या काही अधिकृत वेंडर्सकडून स्टॅम्प पेपरचा तुटवडा दाखवून विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची सर्रासपणे लूट केली जात आहे.
 
 
या स्टॅम्प वेंडरांना विचारणा केल्यास ट्रेजरी कार्यालय स्टॅम्प पेपर आम्हाला उपलब्ध करून देत नसल्याने नागरिकांना स्टॅम्प पेपर देता येत नाही, अशी उत्तरे देऊन नागरिकांना बाहेरचा रस्ता दाखवितात.
 
 
ट्रेजरी कार्यालय व स्टॅम्प वेंडर एकमेकांकडे टोलवाटोलवी करीत असून यात सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक तर होतेच. मात्र, वेळेवर स्टॅम्प पेपर मिळत नसल्यामुळे जास्त पैसे देऊन स्टॅम्प पेपर विकत घ्यावे लागत आहे. तरी स्टॅम्प विक्रेते, वेंडरांकडून नागरिकांची लूट थांबवून दोषी आढळल्यास परवाने रद्द करून कारवाई करावी व नागरिकांना वेळेवर स्टॅम्प पेपर उपलब्ध करून द्यावेत. असे न झाल्यास तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
 
 
निवेदनावर जागो ग्राहक जागोचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल पाटील, राहुल पाटील, सुयोग पाटील, मंगेश महाजन, पप्पू पाटील, अनुप देशमुख, रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश समन्वयक पी.एन.पाटील, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर कोल्हे, जिल्हा अध्यक्ष संजय कापसे, तालुका उपाध्यक्ष समाधान मांडोळे, मुकुंद पवार, दत्ता पवार आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत. यावेळी माजी जि. प. सदस्य किशोर पाटील, भाऊसाहेब जाधव, कोदगावचे भूषण पाटील, माळशेवगेचे दीपक पाटील उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@