विवेकानंद प्रतिष्ठान आयोजित क्रीडा स्पर्धांचे जल्लोषात उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

 
जळगाव : 
 
विवेकानंद प्रतिष्ठानमधील सर्व विभागांच्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धा 20- 21 डिसेंबरला काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल आणि ब.गो.शानभाग विद्यालयाच्या क्रीडा मैदानावर झाल्या.
 
20 रोजी सकाळी उद्घाटन झाले. शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त प्रदीप तळवेलकर यांच्यासोबत रणजी क्रिकेट खेळाडू व काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी शिवप्रसाद पुरोहित प्रमुख पाहुणे होते.
 
मंचावर प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष पूनम मानुधने, हेमाताई अमळकर, विनोद पाटील, प्रशासन अधिकारी दिनेश ठाकरे, क्रीडा समन्वयक सूर्यकांत पाटील आणि सर्व विभागाचे मुख्याध्यापक होते.
 
पाहुण्यांचा परिचय शिक्षिका नम्रता कुलकर्णी यांनी केला. पाहुण्यांचे स्वागत पूनम मानुधने आणि सचिव विनोद पाटील यांच्या हस्ते झाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती देवी प्रतिमा पूजन झाले. शालेय विद्यार्थ्यांनी क्रीडा गीत सादर केले.
 
 
प्रदीप तळवेलकर यांनी प्रतिष्ठानच्या सर्व पाचही विभागांमधील शालेय व्यवस्थापन आणि सर्व परिवार समर्पण भावनेने लक्ष देत असल्याबद्दल प्रशंसोद्गार काढले. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी हा मैदानावर आला पाहिजे, ही शालेय व्यवस्थापनाच्या धडपडीचेही त्यांनी कौतुक केले.
 
 
विद्यालयाचे माजी विद्यार्थी शिवप्रसाद पुरोहित म्हणाले की, कुठल्याही खेळात यश मिळविण्यासाठी ध्येय निश्चित करणे व ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम व आत्मविश्वास गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी पराभव पचवायला शिकले पाहिजे, म्हणजे जीवनात येणार्‍या अपयशांना सामोरे जाण्याची कला आपोआप साध्य होते.यानंतर मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन करून क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या.
 
 
प्रारंभी विवेकानंद प्रतिष्ठान, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी हलगी घोषपथक, एरोबिक्स, रोप मल्लखांब, साडी मल्लखांब आणि श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी साहसी कवायत यांची प्रात्यक्षिके सादर केली.
 
 
डॉ. अविनाश आचार्य विद्यालय, कै. श्रीमती ब.गो.शानभाग विद्यालय, श्रवण विकास मंदिर कर्णबधिर विद्यालय, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल या विभागाच्या 12, 14 आणि 17 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांचे खेळांचे सामने झाले.
 
 
प्रास्ताविक प्रतिष्ठानचे क्रीडा समन्वयक सूर्यकांत पाटील यांनी तर सूत्रसंचालन काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे अतुल मनोहर यांनी केले. आभार काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका मंजूषा भिडे यांनी मानले. यशस्वितेसाठी प्रतिष्ठानच्या सर्व विभागातील विभाग प्रमुख, क्रीडा शिक्षक आणि शिक्षकेतर सदस्यांनी सहकार्य केले.
शिस्तबद्ध पथसंचलन ; क्रीडा मशाल मान्यवरांच्या हाती
 
विवेकानंद प्रतिष्ठानमधील जिल्हास्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीयस्तरावर विविध स्पधांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक क्रीडा मशाल शिस्तबद्ध पथसंचलन करीत मान्यवरांच्या हाती सोपविली. नंतर मान्यवरांनी ती प्रज्वालित केली. क्रीडाध्वजाचेही अनावरण झाले. खेळाडू, शिक्षक आणि पंचांना क्रीडा शिक्षक यांनी सामूहिक क्रीडा शपथ दिली.
@@AUTHORINFO_V1@@