जळगाव :
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये 20 डिसेंबर गुरुवार रोजी आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालय भारत सरकारतर्फे राबविण्यात येणार्या राष्ट्रव्यापी मोहिम अभियानाद्वारे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे गोवर आणि रुबेलापासून बालकांचे रक्षण करणार्या गोवर रुबेला लसिकरण करण्यात आले.
95% विद्यार्थ्यांना लस टोचण्यात आली. यासाठी आरोग्य विभागाकडून व्यवस्था करण्यात आली होती. शाळेत नोंदणी कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरिक्षण कक्ष तयार करण्यात आले होते, त्यामध्ये लसीकरण जनजागृती संदेश, भित्तीपत्रक लावण्यात आले होते.
यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी चिमुकल्यांनी लसीकरणाचा अनुभव घेतला. चिमुकल्यांना निरिक्षणगृहात निरनिराळे खेळ खेळवून आणि गीत, कार्टून दाखवून मुलांचे मन रमविण्यात आले. विद्यार्थ्यांना यावेळी खाऊचे देखील वाटप झाले. विद्यार्थ्यांना लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आले.
आरोग्य विभागातील व्ही. जी. देवरे, पी.डी. चौधरी, प्रेमलता पाटील, कल्पना मिस्तरी, सविता पाटील, ज्योती चव्हाण, सुनिता सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना लस दिली. आरोग्य विभागाचे डॉ. पाटील उपस्थित होते. प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील , समन्वयिका सौ. रत्नमाला पाटील, वर्गशिक्षक यांच्या देखरेखीमध्ये लसीकरण झाले.
यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.