महाराष्ट्र हिंदूविरोधी षडयंत्राची प्रयोगशाळा - आरव्हीएस मणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

भावी पिढीचे भविष्य गहाण ठेवणे धोकादायक -ले.जन. शेकटकर

 
 
मुंबई : 
 
दहशतवादाला विशेषण लावून भावी पिढ्यांचे भविष्य गहाण ठेवणे धोकादायक आहे असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल(निवृत्त) दत्तात्रय शेकटकर यांनी केले. परममित्र पब्लिकेशन्स प्रकाशित ‘हिंदू दहशतवाद नावाचे थोतांड’ या अनुवादित मराठी पुस्तकाचे प्रकाशन प्रमुख अतिथी ले.जन.दत्तात्रय शेकटकर यांच्या हस्ते बुधवार 19 रोजी हॉटेल ताज येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.
 
 
यावेळी व्यासपीठावर ’दी मिथ ऑफ हिंदू टेरर’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचे लेखक, केंद्रीय गृहमंत्रालयाचे माजी अवर सचिव आरव्हीएस मणी, मराठी पुस्तकाचे अनुवादक अरुण करमरकर, प्रकाशक माधव जोशी, पत्रकार , दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे कार्यवाह मकरंद मुळे उपस्थित होते.
 
 
26/11 च्या देशविरोधी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्याची पार्श्वभूमी आणि अतिरेक्यांच्या भक्ष्यस्थानी असलेले हॉटेल ताज यानिमित्त हे पुस्तक प्रकाशन योजले होते. ले.जन. शेकटकर म्हणाले की, जगात प्रत्येक सहा नागरिकांमागे एक भारतीय आहे. भारतीय मूळ वंशाच्या नागरिकांना आपण काय सांगत आहोत ? राजकारण करताना वस्तुस्थिती दुर्लक्षित केली जात आहे.
 
 
आरव्हीएस मणी म्हणाले की, गुजराथचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे नाव मी इशरत जहाँ प्रकरणात गोवावे यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यांनी जंग-जंग पछाडले होते.
 
 
मी अत्याचार सोसला. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडलो नाही. अगदी मला सिगारेटचे चटके दिले होते.माझ्या आई-वडिलांसमोर माझा छळ केला गेला.पण मी माझ्या निश्चयापासून ढळलो नाही.
 
 
देश सर्वतोपरी मानून मी काम केले. राष्ट्रवादाला केवळ अपमानित नव्हेतर बेचिराख करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महाराष्ट्राला हिंदूविरोधी प्रयोगशाळा करण्याचे षडयंत्र केले होते.
 
 
राष्ट्रवाद उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापक कट योजला होता. सैन्यातील समर्थ, सक्षम धैर्यशील अधिकारी कर्नल श्रीकांत पुरोहितची कारकीर्द ठरवून ठेचून काढली. हिंदू दहशतवाद प्रस्थापित करण्याचे कारस्थान रचले गेले. माझे पुस्तक हे तथ्यावर आधारित आहे. संदर्भासह लिहिलेले आहे. मी लिहिलेले पुस्तक ही परिकल्पना नाही.
 
 
कर्नल श्रीकांत पुरोहित आणि त्यांच्यासारखे जे हिंदू दशतवादाच्या खोट्या कटात अडकले आहेत त्यांची सुटका होणे, हिंदू दहशतवादाचा डाग नष्ट होणे ही माझ्या पुस्तकाची उपलब्धी असेल, असे ठोस प्रतिपादन आरव्हीएस मणी यांनी केले.
 
 
अनुवादक अरुण करमरकर म्हणाले की, काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते, प्रशासनातील काही स्वार्थी अधिकारी यांच्या व्यभिचारातून हिंदू दहशतवाद नावाचे भेसूर पाप जन्माला घातले गेले. हे पुस्तक त्या अभद्र युतीचे पाप मांडणारे आहे. फाळणीपासून लांगुलचालनाची भूमिका स्वीकाणार्‍या काँगेसचा पर्दाफाश करणारे आहे.
 
 
प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणार्‍या काँग्रेसचे खरे रूप या पुस्तकातून वाचण्यास मिळते. या पुस्तकाचा अनुवाद करताना चीड-संताप-अस्वस्थता आणि अगतिकता अशा संमिश्र भावना होत्या. पण, अनुवाद करून एक राष्ट्रीय कर्तव्य केल्याची जाणीव उत्पन्न झाली आहे असेही अरुण करमरकर म्हणाले.
 
 
 
प्रकाशक माधव जोशी यांनी पुस्तक प्रकाशित करण्यामागील भूमिका मांडली. सूत्रसंचालन मकरंद मुळे यांनी केले. कार्यक्रमाला टीजेएसबी सहकारी बँक आणि पितांबरी यांनी विशेष सहकार्य केले आहे.
 
सदर पुस्तक जळगाव येथे उपलब्ध आहे. त्यासाठी संपर्क क्र. (9422776591) असा आहे.
@@AUTHORINFO_V1@@