चौपदरीकरण निविदा ऑनलाईन प्रसिद्ध

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |
 

समांतर रस्ते कृती समितीतर्फे आनंदोत्सव, जिल्हाधिकार्‍यांचे केले अभिनंदन
ना. गिरीश महाजन, पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे मानले आभार

 
 
 
जळगाव : 
 
 
जळगाव शहरात आठ किलोमीटर महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची निविदा गुरुवारी ऑनलाईन प्रसिद्ध झाल्याचा आनंद समांतर रस्ते कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आतषबाजीसह पेढे वाटप करून साजरा केला.
 
 
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व भाराराप्राचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांना पेढे भरविण्यात आले. या निविदेचा पाठपुरावा करणारे जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन आणि पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे आभार समितीतर्फे मानण्यात आले.
 
 
खोटेनगर ते कालिंकामाता मंदिरदरम्यान चौपदरीकरण
 
 
शहरात महामार्ग चौपदरीकरणाची 69 कोटी 26 लाख रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. याअंतर्गत खोटेनगर ते कालिंकामाता मंदिरदरम्यान चौपदरीकरण, तीन ठिकाणी वाहनांसाठी भुयारी मार्ग व एका ठिकाणी पादचार्‍यांसाठी भुयारी मार्ग होणार आहे. ही निविदा 1 फेब्रुवारीस होईल.
 
 
समांतर रस्ते कृती समितीने 15 ते 26 नोव्हेंबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन केले होते. येथे ना. महाजन यांनी मध्यस्थी करून महिनाभरात निविदा मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. जिल्हाधिकारी यांनी दर 15 दिवसांनी आढावा घेऊ, असे तर सिन्हा यांनी महिनाभरात निविदा काढू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार 19 ला निविदा प्रसिद्ध झाल्याचा आनंद कृती समितीने साजरा केला.
 
 
ढोल-ताशांच्या आवाजात नृत्य करीत पेढे वाटप करण्यात आले. समांतर रस्ते कृती समितीचे सदस्य नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, अनंत जोशी, डॉ. राधेशाम चौधरी, फारुख शेख, सुशील नवाल, दिलीप तिवारी, अरविंद देशमुख, गजानन मालपूरे, विनोद देशमुख, सरिता माळी, शोभा चौधरी, राजी नायर, वैशाली पाटील, गनी मेमन, अमीत जगताप आदींसह इतरांनी आतषबाजी केली.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात छोटेखानी बैठक झाली. निविदा मार्गी लागल्यानंतर आता महामार्गावरील वीजवाहिन्या स्थलांतराचा पाठपुरावा करायचे ठरले. वीज मंडळाने 5 कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी जिल्हा विकास नियोजन समितीतून निधी मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. सोमवारपर्यंत महामार्ग लगत अडथळा ठरणारे वृक्ष मोजून त्यांची तोड करण्याची परवानगी मनपा वृक्ष समितीकडून घेऊ, असेही सांगण्यात आले. मनपाने जलवाहिनी स्थलांतरासाठी विशेष सभेत ठरावसुद्धा केलेला असल्याचे सांगण्यात आले.
 
 
सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्ग रुंदीकरणासाठी मंजूर केलेला 12 कोटी 40 लाख रुपयांचा निधी विस्तारित कामावर करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांदादा पाटील यांना विनंती करू, अशीही चर्चा झाली.
@@AUTHORINFO_V1@@