अर्थव्यवहार : करवाढीमुळे पेट्रोल-डिझेल गाड्या होणार महाग !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2018
Total Views |

 
 
 
 
पेट्रोल व डिझेल या द्रव इंधनावर चालणार्‍या गाड्या यापुढे महाग होण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. विजे(इलेक्ट्रिक)वर चालणार्‍या गाडयांना उत्तेजन देण्याच्या धोरणास अनुसरुन सरकार पेट्रोल-डिझेल गाड्यांवर जादा कर आकारणार असून त्यातून आलेली रक्कम इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्यासाठी सबसिडी म्हणून दिली जाणार आहे. नीति आयोगाने केलेल्या एका शिफारशीवरुन फिबॅट धोरण स्वीकारण्यात येणार आहे.
 
 
 
त्याअंतर्गत पेट्रोल-डिझेल गाड्यांवर अतिरिक्त 12 हजार रुपये कर आकारला जाणार असून तो प्रतिवर्षी वाढणार आहे. या अतिरिक्त करातून मिळणारा पैसा इलेक्ट्रिक गाड्या खरेदीसाठी उत्तेजन म्हणून दिला जाईल. इलेक्ट्रिक गाडी खरेदी केल्यास 25 हजार रुपये ते 50 हजार रुपयांपर्यंत सबसिडी उत्तेजन म्हणून देण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. ही सबसिडी खरेदीदाराच्या थेट खात्यात जमा होणार आहे. या शुल्काद्वारे सरकारला पहिल्या वर्षी 7 हजार 500 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच या गाड्यांचे भाग व बॅटरीवरील वस्तू व सेवा कर (जीएसटी)त कपातीची व इलेक्ट्रिक गाडीची रजिस्ट्रेशन फी माफ करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.
 
 
इलेक्ट्रिक गाड्यांना उत्तेजन देण्याची शिफारस ठीक असली तरी पेट्रोल-डिझेल गाड्यांवर अतिरिक्त शुल्क आकारणीस मात्र स्वयंचलित वाहन (ऑटो व्हेईकल्स) उद्योगाने विरोध केलेला आहे. या गाड्या तयार करणार्‍या उत्पादकांच्या म्हणण्यानुसार आधीच गाड्यां वर करांचे ओझे जास्त असून त्यात अधिभारांचीही भर पडलेली आहे. केवळ पेट्रोल-डिझेल गाड्यांवर सेस लावून भागणार नाही. इलेक्ट्रिक वाहने सुरु करण्यासाठी दुचाकींवरही सेस लावला पाहिजे. छोट्या गाड्यांचे इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रुपांतर केल्यास उलट खर्चात वाढ होईल. काही हजार रुपये सबसिडी देऊन फारसा फरक पडणार नाही.
 
 
सरकारने 2030 पर्यंत देशभरात सर्वत्र इलेक्ट्रिक गाड्या सुरु करण्याचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवले आहे. यामागे द्रव इंधन वापरामुळे होणारे प्रदूषण टाळणे व त्याच्या किंमतीतील चढउतारांमुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडू नये हा उद्देश आहे. पर्यावरणाचे प्रदूषण टाळल्यास जागतिक तापमानवाढी(ग्लोबल वॉर्मिंग)वर नियंत्रण आणता येणे शक्य होणार आहे.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी 22 रोजी होणार्‍या जीएसटी कौन्सिलच्या महत्वपूर्ण बैठकीत टायरसह गाड्यांच्या अर्धा डझन सामानावरील 28 टक्के कर घटवून तो 18 टक्क्यांवर आणला जाण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गाड्यांचे टायर स्वस्त होऊ शकतात. याच बरोबर ई-रिक्षाच्या टायरवरील जीएसटी 5 टक्के करण्यावरही बैठकीत निर्णय होऊ शकतो. सध्यातरी सायकल सोडून बाकीच्या दुचाकींच्या टायरवर 28 टक्के जीएसटी भरावा लागतो. तसेच सिमेंटवरील जीएसटीही 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांपर्यंत घटू शकतो. टीव्ही, कॉम्प्युटरवरील जीएसटीतही कपात केली जाऊ शकते.
जीएसटीमुळे महागाईत वाढ झाली असल्याच्या तक्रारी येत असल्याने आता हा कर कमी करण्यावर सरकारकडून विचार केला जात आहे. त्यामुळे सर्वसाधारण जनतेला व उद्योजकांनाही दिलासा मिळणार आहे.
 
 
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बँकेच्या झालेल्या आपल्या बैठकीत व्याजदरात या वर्षातील चौथी व शेवटची 0.25 टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे व्याजदर अडीच टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. त्याची तीव्र प्रतिक्रिया अमेरिकेच्या शेअर बाजारात उमटून तो वर्षभरातील सर्वात खालच्या स्तरावर बंद झाला. कालच्या व्यवहारात डाव जोन्स साडेतीनशे अंकांनी गडगडला. तर नासदाक 2 टक्क्यांपेक्षाही जास्तघसरला.पण ब्रेण्ट क्रूड मात्र पावणेदोन टक्क्यांनी वधारला. तो प्रति पिंपामागे 57 डॉलरच्याही वर गेला होता. गेल्या दोन महिन्यांपासून क्रूडच्या चढत्या भावांना लगाम बसलेला असून भारतासारख्या क्रूडची मोठ्या प्रमाणावर आयात करणार्‍या देशांना दिलासा मिळालेला आहे.पुढील वर्षात मात्र फेडकडून संथपणे व्याजदरवाढीचे संकेत देण्यात आले असून तीन ऐवजी दोनदाच ही वाढ केली जाणार आहे. तसेच 2018 व 2019 साठी देशांतर्गत सकल उत्पन्ना(जीडीपी)तील वाढ अनुक्रमे 3 व 2.3 टक्के इतकी होणार असल्याचे अनुमानही फेडरलने काढले आहे.
 
 


शेअर बाजारात किरकोळ घट,निफ्टी 10,900, सेन्सेक्स 36000 बिंदूंवरच

 
 
लागोपाठच्या तेजीनंतर आज गुरुवारी बँक निफ्टीच्या एक्सपायरी दिनी शेअर बाजारात नफावसुलीमुळे किरकोळ घट होऊन राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) व मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) हे अनुक्रमे 10 हजार 900 बिंदू व 36 हजार बिंदूंच्या वरच राहिले. निफ्टी व सेन्सेक्स हे आज सकाळी अनुक्रमे 36 हजार 321 बिंदू व 10 हजार 885 बिंदूंवर खाली(गॅप डाऊन) उघडीत दिवसभरात अनुक्रमे 36 हजार 475 बिंदू व 10 हजार 962 बिंदूंच्या उच्च तर 36 हजार 202 बिंदूंच्या खालच्या स्तरावरुन परत येत दिवसअखेरीस अनुक्रमे 52 बिंदू व 15 बिंदूंनी कमी होत अनुक्रमे 36 हजार 431 व 10 हजार 951 बिंदूंवर बंद झाले. तर बँक निफ्टीही 23 बिंदूंनी घटून 27 हजार 275 बिंदूंवर बंद झाला. भारतीय रुपया मात्र 47 बिंदूंनी वाढून प्रति डॉलरमागे 69 रुपये 93 पैशांपर्यंत तर कच्चे खनिज तेल (क्रूड)125 रुपयांनी गडगडून प्रति पिंपामागे 3255 रुपयांवर आले होते. ही क्रूडची गेल्या सहा महिन्यातील सर्वात कमी किंमत होती.
@@AUTHORINFO_V1@@