पानी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2019’ स्पर्धेची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव, पारोळा, जामनेर तालुक्यांचा समावेश


जळगाव : 
 
‘पानी फाउंडेशन’तर्फे ‘सत्यमेव जयते वॉटर कप 2019’ स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून, त्यात जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव, पारोळा आणि जामनेर तालुक्यांचा समावेश आहे.
 
 
दुष्काळाचा सामना करण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता व फाउंडेशनचा प्रमुख आमिर खान यांनी केले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील 76 तालुक्यांचा सहभाग राहणार आहे.
 
 
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी राज्यातील जलसंवर्धन, कृषी आणि ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. हे व्हिडिओ कॉन्फरन्समार्फत या बैठकीत सामील झाले होते.
 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पानी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमीर खान, किरण राव, पानी फाउंडेशनचे सी.ई.ओ. सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, नामदेव ननावरे सहभागी झाले होते. पुढील वर्षी 8 एप्रिल ते 22 मे 2019 दरम्यान ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.
 
 
यामध्ये पहिल्या विजेत्या तीन गावांना अनुक्रमे 75 लाख रु., 50 लाख रु. आणि 40 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्कृष्ट काम करणार्‍या गावाला 10 लाखांचे बक्षीस देण्यात येईल.
 
 
स्पर्धेअंतर्गत पानी फाउंडेशनच्या वतीने ‘पाणलोट विकासा’चे प्रशिक्षण देण्यात येते. 45 दिवसांच्या या कालावधीतील स्पर्धेत श्रमदान पाणलोट उपचारांचे नियोजन आणि निर्मिती यांचा समावेश राहील.
 
 
ज्यामुळे जमिनीतील भूजलपातळी वाढण्यास मदत होईल. निवडलेल्या तालुक्यातील प्रत्येक महसूली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांतील 76 तालुक्यांमध्ये यावर्षी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी 31 जानेवारी 2019 पर्यंत फॉर्म भरता येईल.
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे तीन उत्सव आपल्या महाराष्ट्राने अतिशय हर्षोल्हासात साजरे केले. आता आपण सारे मिळून सलग चौथ्या वर्षी या स्पर्धेत भाग घेणार आहोत.
 
 
राज्यातील जलयुक्त शिवार अभियानातील श्रमदानाच्या या अनोख्या चळवळीतून आपण दुष्काळमुक्तीच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्र फिरणार्‍या अमीर खान आणि त्यांच्या सुविद्य पत्नी किरण राव, सत्यजित भटकळ आणि पानी फाउंडेशनच्या संपूर्ण टीमचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि या स्पर्धेच्या चौथ्या सत्रासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. राज्य सरकार संपूर्ण यंत्रणेसह आपल्या सोबत आहे.
 
 
अमीर खान म्हणाले की, यंदा सरासरीपेक्षा कमी झालेल्या पावसाचं प्रमाण लक्षात घेता आम्हाला पुन्हा एकदा विकेंद्रित जलसंधारणाच्या कामाचं महत्त्व समजलं. निवडलेल्या 76 तालुक्यांमधील गावांनी वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन त्यांच्या गावातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा, अशी कळकळीची विनंती मी सर्व गावांना करतो.
 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लोकांना एकत्र आणण्याच्या या उपक्रमाचे स्वागत करुन सर्वांना सहभागाचे आवाहन केले.
 
 
केवळ आम्हीच तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या मोहिमेत सहभागी आहोत, असे नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पानी फाउंडेशनच्या पाठीशी उभा राहील, असा आश्वासक सूरही या बैठकीत उमटला.
@@AUTHORINFO_V1@@