कुर्‍हा येथे कार्यकर्त्यांना संघटित करीत घडवला दणदणीत सत्याग्रह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

भुसावळच्या ‘संघमय’ त्यागी परिवारातील दिलीप ओक यांची धडाडी : कारावास संपताच ‘मिसा’त अटक


भुसावळ : 
 
आणीबाणीविरोधात पेटून उठत दिलीप ओक आणि त्यांच्या घरातल्यांनी स्थानबद्धांच्या परिवाराच्या मदतीसाठी तीळतीळ तुटत केलेल्या धावपळीला तोड नाही...
 
75-76 मध्ये अनेकांच्या अंतरात्म्याला साद घालीत त्यांनी जुलमी आणीबाणीविरुद्ध सत्याग्रहासाठी प्रवृत्तही केले, स्वत: सत्त्याग्रह करीत कारावास पत्करला आणि मुक्तता होत नाही तोच मिसाबंदीही म्हणून कारागृहात पाय ठेवला. ते आणि लहान भाऊ मोहन यांच्यासोबतच त्यांचे चुलत मेहुणे आणि सध्या नाशिकचे महानगर सहसंघचालक प्रदीपराव केतकर हेही कारागृहात होते. एकाच परिवारातील तिघांनी तत्त्वनिष्ठेपोटी कारावास पत्करण्याचेही हे दुर्मीळ उदाहरण.
 
 
जूून 1975 मध्ये इंदिरा गांधींनी स्वत:चे पंतप्रधानपद वाचविण्यासाठी राज्यघटना, त्यातील सप्तस्वातंत्र्य, लोकशाहीतील मानवी जीवनमूल्य पायदळी तुडवली. याविरोधात सत्याग्रहामुळे आणि नंतर मिसाबंदीत कारावास भोगणार्‍यांमध्ये होते दिलीप रामचंद ओक (रा. स्टेट बँक शाखेमागे, म्युन्सिपल पार्क, भुसावळ).
त्यांचा जन्म पुण्याचा, 26 डिसेंबर 1945 चा. भुसावळच्या डी.एस.हायस्कूलमधून ते एस.एस.सी.झाले. बागकाम आणि विशेषत: आत्मचरित्रे आणि रहस्य कथांचे वाचन हे त्यांचे छंद. वडिलांचे किराणा दुकान आणि 2 भावांचे स्वतंत्र व्यवसाय हा त्यांच्या परिवाराच्या उदरनिर्वाहाचे साधन.
 
 
ते संघाचे तालुका कार्यवाह असताना 25 जूून 1975 ला आणीबाणी घोषित होत धरपकड सत्र सुरू झाले, संघावर बंदी आली. पण संघमय जीवन जगणार्‍या ओक परिवाराने मिसाबंदीच्या परिवारासाठी मदतकार्य (सावधगिरी बाळगत, कारण दहशत प्रचंड होती.) सुरु ठेवले होते. भूमिगत, फिरते राहत मिसाचे अटक वॉरंट टोलवत ते सत्याग्रही तुकड्या तयार करीत होते. एवढ्या स्तरावर त्या ‘दहशत पर्वात’ धावपळ करणारे दिलीप ओक आणि त्यांच्या परिवाराचे उदाहरण दुर्मीळ.
 
 
संघाच्या आदेशानुसार नंतरच्या टप्प्यात लोकशाही व मानवी मूल्यांच्या जागरासाठी सत्याग्रह करण्याचे ठरले... पण मुक्ताईनगर येथे संघाच्या निर्देशानुसार कालावधी संपूनही सत्त्याग्रह झालेला नव्हता. तेव्हा तेथे ठाण मांडत त्यांनी अनेक स्वयंसेवकांना सत्याग्रहासाठी सज्ज केले. 16 जानेवारी 1976 ला तत्कालीन काँग्रेस नेत्या प्रतिभाताई पाटील यांची कुर्‍हा येथे बसस्टँड परिसरात जाहीर सभा होती. ती संपत असतानाच ओक आणि कुर्‍ह्याचे प्रमोद शिवलकर यांच्यासह 11 स्वयंसेवकांनी अटक व कारावास होणार हे माहीत असूनही जोरदार घोषणा देत गावात तासभर फेरी काढली. ‘आणीबाणी उठलीच पाहिजे’, ‘लोकशाहीची पुनर्स्थापना झालीच पाहिजे, ‘भारत माता की जय’ आदी घोषणा देत त्यांनी आवाज उठवला, अटक झालीच.
 
 
भुसावळ न्यायालयाने 2 महिने कारावासाची शिक्षा ठोठावल्याने जळगाव उपकारगृहात रवानगी झाली. तेथून सुटका झाल्यावर मिसात अटक दाखवत ठाणे कारागृहात नंतर महिन्याने नाशिक कारागृहात त्यांना डांबण्यात आले. तेथे लहान भाऊ मोहन याचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याचे अवघड काम त्यांनी पार पाडले. तेथे भुसावळमधील 18 कार्यकर्ते, जळगावातील बरेच जण होते. दिलीप हे रोज सकाळी 1 तास संघशाखेत आणि दिवसभर अनेक प्रकारच्या प्रशिक्षणात सहभागी होत.
 
 
कॅरम, बुद्बिबळ या बैठ्या आणि अन्य मैदानी खेळात त्यांचा सर्व वेळ निघून जाई. अनेक नाटकांमध्येही रस घेतला, ‘गारंबीचा बापू’ या गाजलेल्या नाटकात लहानशी भूमिकाही केली. घरच्यांच्या मोजक्या भेटी झाल्या. घरीही ते पत्र लिहीत. कारागृहात बाबाराव भिडे, प्रल्हादजी अभ्यंकर, अशोक कुकडे, आबाजी थत्ते इ. दिग्गज होते. दर बुधवारी दुपारी भुसावळचे 7-8 स्वयंसेवक एका नेत्याला जेवणाला सोबत घेत असत. बाहेर लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ओक आणि इतरांनी अनेकांना पत्र लिहीत जनता पक्षाला मतदान करण्याचे, प्रचाराचे आवाहनही केले, त्याचा परिणाम जनता पक्ष जिंकला. 23 मार्च 77 ला सुटका झाली. रेल्वेस्टेशनपासून सर्व 18 स्थानबद्धांची 9 रिक्षांमधून जनसागराच्या साक्षीने 2 तास मिरवणूक चालली.
(संपर्क- दिलीप ओक-9405918157)
लहान भाऊ मोहनचे मनोधैर्य टिकवून ठेवले...
 
दिलीप ओक यांनी संघाचे प्रचारक निघायचे म्हणून स्वेच्छेने रेल्वेची नोकरी सोडली. 1972 ते 74 ते कराडला प्रचारक होते. तेथून परतल्यावर जून 74 मध्ये कर्ज काढून रिक्षा घेतली.
 
वर्षभर चालवली...नंतर दिलीप आणि लहान भाऊ मोहन (अविवाहित) हे दोघे कारावासात राहिले. मोहन उदास असे, त्याला धीर देण्याचे अवघड काम दिलीप यांनी केले...त्या काळात रिक्षा झाकून ठेवली, कर्ज थकल्यामुळे ती विकण्याची वेळ आली.
 
 
मोहन (2000 मध्ये दिवंगत) यांच्या पत्नी मेघनाताई या मुलाकडे पुणे येथे व त्यांच्या सोबतचे जुळे बंधू स्व.मदन (1999 मध्ये दिवंगत) यांच्याही पत्नी मंजिरीताई पुण्यात मुलाकडे राहतात. दिलीप व सौ.कल्याणी आणि चि.केदार हे भुसावळला आहेत.
...भावासाठी मागितली बदली
 
 
दिलीप यांचा 18 जानेवारी 76 ला कुर्‍हा येथे सत्याग्रह, त्याच रात्री एदलाबादला कारागृहात, भुसावळ कोर्टाने दिली 2 महिने शिक्षा...जळगाव कारागृहात 2 महिने 17 मार्चपर्यंत आणि तेथेच मिसाचे वॉरंट बजवून अटक...नंतर दुसर्‍या दिवशी ठाण्याला रवानगी...भाऊ मोहन नाशिक कारागृहात असल्याने सर्वांना भेटीसाठी सोईचे म्हणून नाशिकला हलविण्याची विनंती, त्यानुसार कार्यवाही...23 मार्च 77 ला सुटका. जल्लोषात स्वागत...संघकार्यात अजूनही सक्रिय.
ओक कुटुंब स्थानबद्धांच्या परिवाराच्या सेवेत...
 
 
सत्याग्रहामुळे दिलीप ओक यांना 2 महिने कारावासाची शिक्षा झाली. जळगाव कारागृहात त्यांच्यासोबत कुर्‍ह्याचे प्रमोद शिवलकरांसह 11 सत्याग्रही आणि जळगावचे देवेश कासखेडीकर, विजय नाईक, धरणगावचे बाळू चौधरी, नंदू अग्निहोत्री आदी होते. पहाटे पाचला उठायचे.. योगासने, व्यायाम, संघाची प्रभात शाखा असे.
 
 
नाश्त्यात कांजी मिळे. नंतर बौद्धिक होई. दुपारी 12-12॥ ला बावनपत्तीची भाजी, 3 भाकरी असे 250 ग्रॅम जेवण मिळे. नंतर बुद्धिबळ इ. खेळ होत. सायंकाळी संघशाखा, रात्री संघाची पद्य व्हायची. दर 5 दिवसांनी भुसावळ कोर्टात सर्वांची भेट होई. घरची फारशी काळजी नव्हती, कारण वडील किराणा दुकान चालवत होते. स्थानबद्धांच्या परिवारासाठी आई लीलाताई सायकलीने घरोघर हिंडत दरमहा रोज 5 दिवस पैसे जमा करायची.
मूर्तिमंत त्याग...
 
 
आर.एम.एस.मधील नोकरीची 5 वर्ष, लग्नाला 4 वर्ष झालेली आणि घरात 2 अपत्ये... अशा स्थितीत गांधीजींच्या खुनानंतरच्या 1948 मधील संघबंदीच्या विरोधात रामचंद्र ओक यांनी सत्त्याग्रह केला.
 
 
3 महिने कारावास झाल्याने सरकारी नोकरी गेली. 1975 मध्ये दिलीप ओक यांनी सत्याग्रहात 2 महिने कारावास सोसला नंतर मिसाबंदीत ते वर्षभर स्थानबद्ध राहिले.
@@AUTHORINFO_V1@@