गहलोत, कमलनाथ, भूपेश बघेल कॉंग्रेसचे त्रिदेव!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून कमलनाथ, छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून भूपेश बघेल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून अशोक गहलोत यांनी सूत्रे स्वीकारली असली, तरी या तीन नेत्यांची निवड करताना कॉंग्रेस नेतृत्वाला राजधानी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीतही घाम फुटला होता! कॉंग्रेसच्या नेतृत्वाला या तीन राज्यांतील विधिमंडळ पक्षनेत्यांची निवड करताना मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गंत विरोधाचाही सामना करावा लागला. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोर ‘तरुण तुर्क की म्हातारे अर्क’ असा सामना रंगला होता.
 
 
मध्यप्रदेशात कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे, तर राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यात चांगलीच झुंज झाली. यात मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये म्हातार्या अर्कांनी तरुण तुर्कांवर मात केली. छत्तीसगडमध्ये सामना समवयस्कांमध्ये होता. तेथे बघेल यांची वर्णी लागली. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे तसेच राजस्थानमधील अशोक गहलोत आणि सचिन पायलट हे चौघेही राहुल गांधी यांच्या जवळचे समजले जात होते. त्यामुळे कुणाची निवड करावी, याबाबत राहुल गांधी यांची स्थिती ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी झाली.
अशोक गहलोत तर राहुल गांधी यांचे अघोषित राजकीय सल्लागार मानले जात होते. त्यामुळे नेत्याची निवड करताना राहुल गांधी यांची कोंडी झाली होती. शेवटी राहुलच्या मदतीला श्रीमती सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी-वडेरा यांना धावावे लागले. मध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांत स्पष्ट बहुमत नसल्यामुळे सरकार चालवण्याची कसरत नव्या दमाच्या ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांना झेपणार नाही, तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता, अनुभवी नेतृत्वाच्या हातातच सरकारची सूत्रे असली पाहिजे, या निष्कर्षावर कॉंग्रेसचे नेतृत्व आले आणि सत्तेची माळ कमलनाथ आणि अशोक गहलोत यांच्या गळ्यात पडली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या शब्दाचा मान राखत सत्तास्पर्धेतून माघार घेतली, मात्र सचिन पायलट अडून बसले होते. त्यामुळे त्यांच्यासाठी उपमुख्यमंत्रिपद निर्माण करावे लागले. यासाठी गुर्जर असल्याचा राजकीय लाभ त्यांना मिळाला.
 
 
 
कमलनाथ यांची मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून झालेली निवड सुरुवातीपासूनच वादाच्या भोवर्यात सापडली. कॉंग्रेस नेते सज्जनकुमार यांना शीखविरोधी दंगलीतील सहभागाबद्दल झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे कमलनाथ यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. कमलनाथ यांना मुख्यमंत्री केल्यामुळे शीख समाजात निर्माण झालेल्या नाराजीचा सामना कॉंग्रेसला लोकसभा निवडणुकीत करावा लागणार आहे. बिहार आणि उत्तरप्रदेशातील लोकांबाबत केलेल्या विधानामुळे कमलनाथ यांनी कारण नसताना स्वत:सोबत कॉंग्रेस पक्षाचीही अडचण केली आहे.
 
 
 
कमलनाथ यांची प्रतिमा गांधी घराण्याचे निष्ठावंत, अशी नेहमीच राहिली आहे. डून शाळेत कमलनाथ संजय गांधी यांचे सहाध्यायी होते. संजय गांधी यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळेच कमलनाथ राजकारणात आले. छोट्या कारचे स्वप्न संजय गांधी यांनी कमलनाथ यांच्यासोबतच पाहिले होते. आणिबाणीनंतर संजय गांधी यांना अटक झाली असताना कमलनाथ यांनी न्यायालयात न्यायाधीशाच्या दिशेने कागदाचा गोळा फेकला होता आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला.
कमलनाथ यांच्या प्रचारासाठी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी छिंदवाडा येथे आल्या असताना त्यांनी कमलनाथ यांचा उल्लेख, आपला तिसरा मुलगा, असा केला होता. श्रीमती इंदिरा गांधी यांना श्रद्धांजली वाहताना कमलनाथ यांनी त्यांना मॉं म्हटले होते. राजीव गांधी पंतप्रधान असताना, त्यांच्या कारचे सारथ्य करतानाचे कमलनाथ यांचे छायाचित्र ते मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच व्हायरल झाले होते. गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेचे फळ अखेर छिंदवाडा मतदारसंघातून सलग नऊ वेळा लोकसभेवर निवडून येणार्या कमलनाथ यांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून मिळाले.
 
 
 
राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून तिसर्यांदा शपथ घेतलेले अशोक गहलोत राजकीय जादूगार म्हणून ओळखले जातात. अशोक गहलोत यांचे वडील जादूगार होते, शाळेत असताना आपल्या वडिलांकडून शिकलेली जादू अशोक गहलोत शाळेतील आपल्या मित्रांना करून दाखवत आणि आपला प्रभाव पाडत. यावेळीही आपण जादू दाखवणार का, असा प्रश्न अशोक गहलोत यांना विचारला असता त्यांनी, जादू तर नेहमीच सुरू असते, कधी ती लोकांना दिसते, कधी दिसत नाही, असे उत्तर दिले होते. यावेळी मात्र विधानसभा निवडणुकीत अशोक गहलोत यांची जादू चालली आणि कॉंग्रेस जिंकली. अशोक गहलोत यांचे समर्थक त्यांच्यासाठी ‘‘अशोक नही ये आंधी है, मारवाड का गांधी है...’’ असे नारे लावतात.
राजस्थानच्या जनतेला आपल्या जादूच्या प्रयोगाने अशोक गहलोत नेहमीसाठी जिंकू शकणार नाहीत, तर त्यांना मुख्यमंत्री म्हणून प्रभावीपणे काम करावे लागणार आहे. काम केले नाही तर राजस्थानची जनता दुसर्यांदा सत्तेवर येण्याची संधी देत नाही, याचा अनुभव स्वत: अशोक गहलोत यांनी घेतला आहे. जोधपूर मतदारसंघातून सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या अशोक गहलोत यांनी आमदार म्हणून यावेळीही पाचव्यांदा निवडून येत इतिहास घडवला आहे. गहलोत यांची प्रतिमा उत्कृष्ट संघटक आणि प्रशासक अशी राहिली आहे.
 
 
कॉंग्रेस पक्षाचे महासचिव (संघटन) अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असणार्या अशोक गहलोत यांचे मन दिल्लीतच कधी रमलेच नाही, त्यांना सारखी राजस्थानची आठवण येत होती. राहुल गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून ओळखल्या जाणार्या अशोक गहलोत यांनी दिल्ली सोडण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे हट्ट धरला आणि राहुल गांधींनाही, लोकसभा निवडणुकीवर डोळा ठेवत इच्छा नसताना तो पूर्ण करावा लागला.
1971 मध्ये बांगला देश शरणार्थ्यांसाठी असलेल्या शिबिरातून काम करताना अशोक गहलोत राजकारणात आले. येथूनच ते श्रीमती इंदिरा गांधी यांच्या संपर्कात आले. इंदिरा गांधींनी त्यांना जम्मू-काश्मीरमधील एका भागातील निवडणुकीची जबाबदारी सोपवली. यासाठी काही पैसेही दिले. निवडणूक आटोपल्यावर गहलोत यांनी खर्च झालेल्या पैशाचा हिशेब सादर करत उरलेले पैसे कार्यालयात जमा केले. जे राजकीय क्षेत्रातील विरळा उदाहरण म्हणावे लागेल. आपल्या अशा वागणुकीने गहलोत यांनी इंदिरा गांधी यांचे मन जिंकले. 1982 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी त्यांचा उपमंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला.
पी. व्ही. नरिंसह राव यांच्या मंत्रिमंडळातही गहलोत वस्त्रोद्योग मंत्री होते. मात्र, वादग्रस्त तांत्रिक चंद्रास्वामी यांच्यामुळे आपले मंत्रिपद गहलोत यांना गमवावे लागले. पाली येथील एका कार्यक्रमासाठी गहलोत यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला चंद्रास्वामीही उपस्थित राहणार, असे समजल्यामुळे गहलोत या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. त्यामुळे चंद्रास्वामी नाराज झाले, त्यानंतर काही काळातच नरिंसह राव यांनी गहलोत यांना मंत्री म्हणून चांगली कामागिरी बजावली असतानाही मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला.
 
 
छत्तीसगडचे मुख्यमंत्री झालेल्या भूपेश बघेल यांचा मात्र श्रीमती इंदिरा गांधी यांच्याशी फारसा संपर्क आला नाही. मध्यप्रदेशातून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणार्या बघेल यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. छत्तीसगड बनण्याआधी बघेल दिग्विजयिंसह यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. 2000 मध्ये मध्यप्रदेशातून अलग होत छत्तीसगड नवे राज्य झाल्यावर बघेल अजित जोगी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले. 2003 मध्ये अजित जोगी यांचा पराभव झाल्यानंतर बघेल यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली.
 
 
2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत बघेल यांचा पराभव झाला. 2014 मध्ये प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून बघेल यांची निवड झाली, तेव्हापासून ते अध्यक्ष होते. राज्याच्या राजकारणात बघेल, अजित जोगी यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात, हाच मुद्दा त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी महत्त्वाचा ठरला. गहलोत, कमलनाथ आणि भूपेश बघेल हे कॉंग्रेसचे त्रिदेव लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला तारतात की मारतात, याचे उत्तर त्याच वेळी मिळणार आहे...
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@