जळगाव :
विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे गीता जयंती साजरी करण्यात आली.
खाशाबा अपंग क्रीडा प्रशिक्षण संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे गीता जयंती साजरी करण्यात आली. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा दिवस श्रीभगवद्गीता जयंती दिवस म्हणून साजरा होतो.
सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीष मासातील हा एकादशीचा दिवस गीताजयंती म्हणून ओळखला जातो.
हा दिवस भारतीय संस्कृतीसाठी श्रेष्ठतम दिवस आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. देशातील अनेक व्यक्ती भावपूर्ण अंतःकरणाने गीता जयंतीचा उत्सव दरवर्षी भक्तिभावाने साजरा करतात.
एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे, ही कदाचित अखिल विश्वात गीतेची एक आगळीवेगळी विशेषता आणि महानता आहे असे प्रकर्षाने दिसून येते. थोर संत विनोबाजींनी गीतेसंबंधी असे म्हटले आहे की,’ माझे शरीर आईच्या दुधावर पोसले, त्यापेक्षाही माझे हृदय व बुद्धी गीतेच्या दुधावर अधिक पोषक झाले आहे. गीता माझे प्राणतत्त्व होय.’
या दिनानिमित्त महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागात गीतेचे पूजन करून विद्यार्थ्यांना गीता या ग्रंथाबद्दल माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीद्वारे देखील गीतेच्या इतिहासाबद्दल वाचन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.