आजच्या पालकांपुढील आव्हाने, संधी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |


 


मुलांच्या आवडीनिवडी, कल ओळखण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत. मानसशास्त्रज्ञांची मदत मिळू शकते. या सगळ्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा, यासाठी विचार आणि द़ृष्टी हवी. शालेय शिक्षणाला पूरक अशा कितीतरी गोष्टी आज इंटरनेटमुळे, गुगलमुळे सहजासहजी उपलब्ध आहेत. विषय सोप्पे, रोचक आणि प्रभावी करणारी खूप साधनं मदतीसाठी तत्पर आहेत. अर्थात, साधनांपेक्षा साधना महत्त्वाची, याचाही विसर पडता कामा नये.


हाती नाही बळ, दारी नाही आड,

त्याने लावू नये फुलझाड...

सोसता सोसेना संसाराचा ताप,

त्याने होऊ नये मायबाप...

 

या ओळींचं वारंवार स्मरण होतं. विशेषत: पालकत्त्वासंबंधी बोलताना, लिहिताना तर हटकून. एकदा लग्न झालं, संसार थाटला आणि मायबाप झाला की मग तक्रार, कुरकुर करण्यात काही अर्थ नाही. पालकत्त्व म्हणजे काय, हे सांगताना मार्सेलेने कॉक्स म्हणतात, “लग्नापूर्वी होतात त्यापेक्षाही आता जास्त काळजी घेणारे असता.” पुढं जाऊन आता असं म्हणावंसं वाटतं की, “दिवसेंदिवस पालकांना अनेक गोष्टींची आणि अधिक काळजी घेणं अपरिहार्य होणार आहे, होत आहे.”

 

पालकत्त्वाची जबाबदारी सांभाळणं आणि निभावणं आता पूर्वीइतकं सोप्पं व सरळ नाही. गुंतागुंत वाढत चालली आहे पण, त्याचबरोबर पूर्वीपेक्षा अधिक संधीही आहेत. आता बदल इतक्या वेगाने होतात की, त्याबरोबर जुळवून घेणं खूप कठीण होत आहे. सामाजिक, आर्थिक, तंत्रज्ञानात्मक बदल फार झपाट्याने होत आहेत. समजून घेणंही सोप्पं नाही. हे सगळं समजून घेणं आणि त्यानंतर जुळवून घेणं व पुढे जाऊन काही बदल करणं, अतिशय दमछाक करणारं आहे. पूर्वी दोन पिढ्यांमध्ये अंतर (जनरेशन गॅप) असायचं. आता एकाच घरातील मोठी मूलं आणि लहान मूलं यांच्यामध्येही लक्षात येण्यासारखं जनरेशन गॅप दिसतं. नवीन तंत्रज्ञानामुळे तर जीवनाचं प्रत्येक क्षेत्र पूर्णपणे ढवळून, घुसळून निघत आहे. बिच्चारे मायबाप गांगरून जातात. काय आणि कसं करावं, कळत नाही. एकच मूल असल्यामुळे काळजी, भीती, चिंता, दबाव, हुरहूर या सगळ्यांचं एक मिश्रण चेहऱ्यावर, डोक्यात, मनात, काळजात, घरात अगदी ठळकपणे दिसतं. त्यात भर वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्यांची.

 

- आईने टीव्ही बघून दिला नाही म्हणून १३ वर्षांची मुलगी गळफास लावून आत्महत्या करते.

 

- वडिलांनी मोबाईल काढून घेतला म्हणून शरीराभोवती विजेची तार गुंडाळून स्वत: ला विजेचा शॉक देत या जगाचा निरोप घेणारा आठवीतला बालक.

 

- तुझ्या वडिलांकडे गाडी नाही, असं मित्रांनी चिडवल्यामुळं सातवीतच शाळा सोडणारा विद्यार्थी.

 

- मोटरसायकल दिली नाही, तर कॉलेजमध्ये जाणार नाही, अशी आईवडिलांना धमकी देणारा युवक.

 

- अगदी आठ-दहा हजारांची नोकरी मिळाल्यावर उंची कपडे, बूट, महागडी मोटरसायकल, हजारो रुपयांचे स्मार्टफोन अशा नाना प्रकारच्या वस्तूंच्या आकर्षणामुळे घरच्या आर्थिक परिस्थितीची चिंता न करणारे तरुण.

 

अशा बातम्या वाचल्यावर, आजूबाजूला घडणाऱ्या घटना बघितल्यावर पालक कसे अस्वस्थ नाही होणार? गांगरून, घाबरून कसे नाही जाणार? मानसशास्त्रज्ञ फ्लिनच्या म्हणण्यानुसार, आता मुलांचा बुद्ध्यांक वाढत आहे. ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. पण, भावनांक घसरत आहे ही चिंताजनक गोष्ट आहे. पूर्वी सगळा भर बुद्ध्यांकावरच होता. आता बुद्ध्यांकच नाही, तर भावनांकाबरोबरच सामाजिक, आध्यात्मिक, जिज्ञासा असे कितीतरी ‘क्यू’ क्यूमध्ये उभे आहेत. त्यांच्याकडे डोळेझाक करता येत नाही, येणारही नाही. तेही खूप महत्त्वाचे. किंबहुना, बुद्ध्यांकापेक्षाही हेच आज अधिक महत्त्वाचे मानले जातात. सफलतेसाठी हेच निर्णायक आहेत, असं तज्ज्ञ मानू लागले आहेत. त्यामुळे या पैलूंकडे अधिक लक्षं दिलं पाहिजे. आजच्या पालकांना याची जाण आणि भान असणं मोलाचं. प्रत्येक गोष्टीचं व्यापारीकरण, चंगळवाद, भोगवादी द़ृष्टी यामुळं घराघरांत ताणतणाव, विविध प्रकारच्या समस्या(अभ्यासापासून आरोग्यापर्यंत आणि आहारापासून विहारापर्यंत) वाढत आहेत, गुंतागुंतीच्या होत आहेत. जीवघेणी स्पर्धा, अतिमहत्त्वाकांक्षा यामुळे ताणतणाव कमालीचा वाढत आहे. गुन्हेगारी आणि आत्महत्यांचं प्रमाण चिंताजनक बनत चाललं आहे.

 

दहा वर्षांपूर्वी म्हणजे २००८ मध्ये ‘द वीक’ या इंग्रजी साप्ताहिकाने केलेले सर्वेक्षण प्रचंड धक्कादायक आहे. दहा वर्षांनंतर स्थिती किती खालावली असेल, याची कल्पना करता येईल.

 

* तणावाखाली असलेल्या ७६ लोकांना निद्रानाश, तर ५८ लोकांना डोकेदुखीची समस्या आहे.

 

* बंगळुरूमधील ३६ तंत्रज्ञांमध्ये मानसिक समस्या दिसते, असं ‘निमहंस’च्या (NIMHANS) पाहणीत आढळलं.

 

* युवकांमध्ये वैफल्यग्रस्तता दोन पासून १२ पर्यंत वाढली आहे.

 

* जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) म्हणण्यानुसार, वैफल्यग्रस्तता ही एकविसाव्या शतकातील क्रमांक एकची समस्या होणार आहे.

 

* आयटी क्षेत्रातील २० पैकी एक आत्महत्येचा विचार करत असतो (NIMHANS)

 

* भारताच्या आयटी क्षेत्रातील २७.६ तरुण ड्रग्जच्या आहारी जात आहेत, असंही ‘निमहंस’च्या पाहणीत लक्षात आलं आहे.

 

ही माहिती म्हणजे हिमनगाचं एक छोटसं टोक आहे. ‘We have overdeveloped minds and underdeveloped hearts’ असं आजच्या पिढीचं जे वर्णन केले जातं ते अक्षरश: खरं आहे. ही स्थिती बदलून ‘overdeveloped minds and super developed hearts’ अशी स्थिती व्हायला हवी. शिक्षणामुळे मनुष्य निर्माण व्हायला हवा. हेच शिक्षणाचं महत्त्वाचं सूत्र आहे. पण, सध्या मनुष्याऐवजी मशीन्स निर्माण होत आहे. आणि त्याहीपुढे जाऊन राक्षस निर्माण होत आहेत. ही शिक्षणाची मोठी शोकांतिका आहे. कृतज्ञ व्हायच्याऐवजी कृतघ्न होत असतील, तर तो शिक्षणाचा मोठा पराभवच आहे. हे सगळं कसं थोपवायचं, हे पालकांसमोरील मोठं आव्हान आहे. ‘In every adversity lies the opportunity’ प्रत्येक प्रश्नात एक संधीही दडलेली असते, असं म्हटलं जातं. पालकांसमोर आ वासून उभ्या असलेल्या आव्हानं आणि समस्यांमध्ये संधीही खूप आहेत. पूर्वी सर्वच घरांत काही फार मोठं शैक्षणिक वातावरण होतं असं नाही. अनेक घरांत मुलांना शाळेत पाठवणं एवढंच व्हायचं. अनेक मुलं स्वत:च्या हिमतीनं, मेहनतीनं, स्वत:ची वाट स्वत: शोधत पुढं जायची. मुलांच्या गुणवैशिष्ट्यांकडे बारकाईनं लक्ष देणं आणि त्या दिशेने मुलांच्या विकासासाठी योजनाबद्ध प्रयत्न त्यामानाने कमीच होतेआज चित्र हळूहळू बदलत आहे. पालकसभांना येणाऱ्या पालकांची संख्या थोडीफार वाढत आहे, हे एक महत्त्वाचं पाऊल म्हटलं पाहिजे. अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आजचा काळ हा संधींचा काळ आहे. पूर्वी या संधी थोड्याफार प्रमाणात असल्या तरी माहीतच नसायच्या. आज चित्र बदलत आहे. विविध संधी आणि क्षेत्रं मुलांना खुणावत आहेत. सुजाण आणि जागरूक पालकांनी थोडं अवतीभवती बघितलं, तर ही क्षेत्रं आणि संधी निश्चित दिसतील. विविध विषयांचे तज्ज्ञ, विशेषज्ञ, मार्गदर्शक आज उपलब्ध आहेत. शाळेतील शिक्षकांच्या काही मर्यादा असतात. पण समुपदेशक, विशेषज्ञ यांच्या मदतीने मुलांच्या समस्या नेमकेपणाने समजून घेऊन सोडवण्याची सुविधा आज उपलब्ध आहे. मुलांच्या वर्तन आणि अध्ययनाच्या आड येणारे विविध प्रकारचे अडथळे तज्ज्ञांच्या मदतीने सोडवले जाऊ शकतात, ही एक मोठी जमेची बाजू आहे. माहितीचा विस्फोट तर मोठ्या प्रमाणात आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातून उपयुक्त माहिती मिळविण्याची सोय आहे. घरबसल्या आणि अनेक वेळा खर्चाशिवायही ही माहिती मिळून जाते. अर्थात, माहितीचा उपयोग कसा आणि किती करायचा, हा विवेक आणि कौशल्याचा भाग आहे. शाळा आणि घरातून शिक्षकांनी व पालकांनी विवेक आणि कौशल्य मुलांमध्ये कशी रुजतील, याची व्यवस्था आणि खबरदारी घ्यायला हवी.

 

मुलांच्या आवडीनिवडी, कल ओळखण्यासाठी अनेक प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत. मानसशास्त्रज्ञांची मदत मिळू शकते. या सगळ्यांचा उपयोग कसा करून घ्यायचा, यासाठी विचार आणि द़ृष्टी हवी. शालेय शिक्षणाला पूरक अशा कितीतरी गोष्टी आज इंटरनेटमुळे, गुगलमुळे सहजासहजी उपलब्ध आहेत. विषय सोप्पे, रोचक आणि प्रभावी करणारी खूप साधनं मदतीसाठी तत्पर आहेत. अर्थात, साधनांपेक्षा साधना महत्त्वाची, याचाही विसर पडता कामा नये. ज्यांचं शिक्षण अर्धवट राहीलं किंवा ज्यांची घरची आर्थिक स्थिती खूप चांगली नाही अशांनाही आता दूरस्थ शिक्षणाचा (distant education) लाभ घेता येतो. स्वत:ला update आणि upgrade करता येतं.आजच्या काळात केवळ पदव्या पुरेशा नाहीत. पदव्यांच्या जोडीला विविध प्रकारची कौशल्यं आणि त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे attitude, विजिगीषु सकारात्मक अभिवृत्ती हा पाया आहे. आज त्याचीही जोपासना व्हायला हवी. ती करताही येते. सतत शिकत राहीलं पाहिजे आणि आज सुदैवाने तसं सतत शिकताही येतं. ही खूपच महत्त्वाची आणि जमेची बाजू आहे. शिकण्याची ज्याच्या मनात तीव्र इच्छा आहे त्याला खूप संधी आहेत. आल्विन टॉफ्लर हा अमेरिकन लेखक खूप सुंदर व मार्मिक शब्दांत म्हणतो- “The illiterate of the 21st century will not be those who cannot read and write, but those who cannot learn, unlearn and relearn.” एकविसाव्या शतकात ज्याला लिहिता-वाचता येत नाही, हा अशिक्षित नसून जो शिकू शकत नाही, शिकलेलं पुसून पुढे जात नाही आणि परत नव्याने शिकत नाही, त्यालाच अशिक्षित म्हटलं पाहिजे.आपल्यासमोर असलेल्या अडचणी, प्रश्न, समस्या, आव्हानं यातूनही ज्याला संधी, मार्ग, उत्तरं दिसतात, तीच माणसं हताश व निराश न होता उत्साहाने विजयाच्या शिखराकडे कूच करू शकतात. तशी खूप उदाहरणंही आहेत. आजच्या पाल्य आणि पालकांनी याचा वेध घ्यायला हवा. यश आपलंच आहे...

 

- दिलीप वसंत बेतकेकर

लेखक विद्याभारती संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@