वांगखेमचा फुटीरतावाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018   
Total Views |


 

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी १९ नोव्हेंबरला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी केली. राष्ट्रीय अस्मितेचे अपूर्व स्वरूप असलेल्या राणी लक्ष्मीबाईंची जयंती साजरी करणे, ही खरंतर आनंदाची आणि सर्वमान्य घटना. किशोरचंद वांगखेम या इसमाला मात्र मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राणी लक्ष्मीबाईंची जयंती साजरी केली म्हणून भयंकर त्रास झाला. त्याने त्याच्या मनातली गरळ फेसबुकवर ओकली. तो म्हणतो, “मणिपूरच्या स्वातंत्र्य चळवळीशी झाशीच्या राणीचा काही संबंध नव्हता.” वर हा इसम असेही लिहितो की, “राणी लक्ष्मीबाईंची जयंती साजरी करून मुख्यमंत्र्यांनी आपण भाजप, संघ आणि नरेंद्र मोदी यांच्या हातातली कपठपुतळी आहोत, हे सिद्ध केले.” काय म्हणावे या इसमाला? स्वतःला ‘पत्रकार’ म्हणविणाऱ्या या महाभागाला मणिपूरची स्वातंत्र्य चळवळ स्वतंत्रपणे लढली गेली, असे वाटते का? याला असे वाटते का की, मणिपूर भारतातले एक राज्य नाही, तर ते भारतापासून स्वतंत्र आहे. दुसरे असे की, विविध राज्यांच्या भौगोलिक विविधतेने आपला देश श्रीमंत आहे. ही सर्व श्रीमंती राज्यघटनेच्या सर्वव्यापी तरतुदीनुसार एकमेकांशी अभिन्नपणे समरस झाली आहे. किशोरचंद मात्र देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला नाकारून, राज्याची संवैधानिक एकात्मता नाकारून, मणिपूरसंदर्भात त्या राज्याची स्वतंत्र स्वातंत्र्य चळवळ म्हणतो. वर तो देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राणी लक्ष्मीबाईंसंदर्भात म्हणतो की, “त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत काही योगदान नव्हते.” तो असे म्हणू शकला, कारण देशाला जोडणाऱ्या अस्मितांना नाकारून जनमानसात देशाचे ऐक्य रूजू नये, असे वाटणारा एक विघातक गट आहे. त्या गटाचे सदासर्वकाळ एकच काम आहे की, कोणत्याही परिस्थितीत विविधतेमध्ये एकता मानणाऱ्या भारतीयांमध्ये समरस एकात्मता उत्पन्न होऊ नये. देशातील जनतेच्या मनात भारतीयत्व लोप पाऊन फुटीरतेचे बीज रुजावे. पण, किशोरचंद वांगखेमसकट त्या सर्वांना माहिती हवे की, ते दिवस गेले की कुणीही यावे आणि फुटीरतेचे ढोल बडवून जावे. आता खरे संविधान जगणारे सरकार आहे. त्यामुळे कुठल्याही फुटीरतेला उत्तर संविधानानेच मिळणार. आता या उत्तरामुळे तोंडघशी पडणारे फुटीरतावादी तथाकथित विचारवंत काय वाट्टेल ते बरळतील, ही गोष्ट अलहिदा.

 

बरे झाले, असेच होवो!

 

अतिशय तोलूनमापून शब्दप्रयोग करत किशोरचंद वांगखेम याने देशाच्या ऐक्याला, सुरक्षेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या प्रत्येक वाक्यात फुटीरतेचा गर्भितार्थ दडला आहे. “स्वातंत्र्यासाठी स्वतंत्र लढलेल्या मणिपूरमध्ये लक्ष्मीबाईंची जयंती साजरी करून मुख्यमंत्र्यांनी मणिपूरच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केला,” हे विधान या दीडशहाण्या पत्रकाराने विघातक पद्धतीने वापरले आहे. या वाक्यातून किशोरचंदने मणिपूर राज्यात राहणाऱ्या भारतीयांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, तुमच्या मणिपूरमध्ये बाहेरच्या (म्हणजे मणिपूरच्या बाहेरील) व्यक्तीची जयंती केली जाते, तुमच्या मणिपूरच्या स्वातंत्र्यसैनिकांची नाही. याचाच अर्थ “तुम्हाला हा देश, या देशाचे सरकार, प्रशासन नाकारते आहे. तुम्हाला अपमानित करत आहे. भारत या देशाला तुमच्या स्थानिक अस्मितेचे, स्थानिक इतिहासाचे वावडे आहे. मग हा देश, संविधान, सरकार तुमचे नाहीच.” ईशान्य भारत फुटीरतेच्या आगीत होरपळत आहे. या पार्श्वभूमीवर किशोरचंदच्या फुटीरतावादी विधानाचा गंभीरतेने विचार करणे आवश्यक आहे. भारतीयांमध्ये देशाच्या सार्वभौमत्वाविषयी शंका निर्माण करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. तशी प्राथमिक कारवाई किशोरचंदवर झाली. १९ नोव्हेंबरलाच आक्षेपार्ह विधानामुळे त्याला अटकही झाली. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या सल्लागार मंडळाने ११ डिसेंबर रोजी किशोरचंद वांगखेम याच्यावरील आरोपाची तपासणी केली. त्या तपासणीमध्ये मंडळाला आढळले की, राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या तरतुदीनुसार त्याला ताब्यात घेण्यात यावे, यासाठी पुरेशी कारणे आहेत. त्यानंतर मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी सल्लागार मंडळाची शिफारस स्वीकारली. मंडळाची शिफारस आणि कलम १२ (१) नुसार मिळालेल्या अधिकारानुसार राज्यपालांनी किशोरचंदला १२ महिने कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. हा आदेश म्हणजे भारतीय एकतेला नाकारणाऱ्या फुटीरतावादी मनोवृत्तीवरची कारवाई आहे. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचाच नव्हे, तर इतर अनेक हक्कांचा, अधिकारांचा विघातक अर्थ लावणे अशी विघातक मोहीम देशद्रोह्यांकडून सुरू आहे. ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ म्हणणे याला घटनेने दिलेले ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ आहे, असे मानणारेही याच पठडीतले. या सर्व फुटीरतावाद्यांचा संवैधानिक मार्गाने विचार व्हावा, हीच सदिच्छा!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@