अपमानाची पोळी, सर्वांग जाळी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
 

पहिल्या सामन्यात अगदी काठावर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ दुसर्‍या कसोटी सामन्यात पार भुईसपाटच झाला आणि चार सामन्यांच्या या मालिकेत आता भारत आणि ऑस्ट्रेलियाची बरोबरी झाली. पण, या सामन्याच्या पलीकडे ही मालिका गाजली ती कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन यांच्यात उडालेल्या शाब्दिक चकमकीमुळे. मात्र, मैदानावरील पंच ख्रिस गॅफानी यांनी दोघांनाही तंबी देत हा वाद थांबवला. याआधीही विराटच्या मैदानातील आक्रमक वागण्यावरून टीका होत असताना आता, पुन्हा एकदा या पराभवाने टीकाकारांचं लक्ष विराटकडे वळलं आहे. याचं कारणही तसंच. ‘स्लेझिंग’ हा प्रकार क्रिकेटमध्ये नवीन नाही, त्यात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाद तर सर्वज्ञात आहे. २०१२ सालीसुद्धा विराट सिडनी येथील सामन्यात आपल्या आक्रमकतेमुळे वादात सापडला होता. त्यामुळे विराटच्या या अशा मैदानावरील आक्रमकतेमुळे याचा परिणाम संपूर्ण संघावर तर होत नाही ना, असा प्रश्न संघ व्यवस्थापनाला पडणं साहजिक आहे. त्यातूनच माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी विराटचे पिळलेले कानही त्याबाबतीत योग्यच वाटतात. त्यांच्या मते, विराट एक सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याच्या फलंदाजी शैलीचे सगळेच चाहते आहेत. मात्र, धावा काढताना आपल्यामध्ये आक्रमकता असावीच लागते, अशातला भाग नाही. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर यांनी हे दाखवून दिलं आहे.

खरंतर आज जगातल्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली, हा फलंदाजांमध्ये ’दादा’ असला तरी, मैदानावरील संयमाच्या बाबतीत तो नेहमीच मार खातो. म्हणजे, शाळेत प्रत्येक वर्गात एक असं पोर असतं, जे अभ्यासात भयंकर हुशार, पण तेवढंच मस्तीखोर, त्यामुळे त्याच्या मस्तीकडे कधीतरी दुर्लक्ष केलं जातं, पण हे नेहमीच घडेल याची शक्यता कमीच. विराटचंही असंच काहीसं झालंय,. विराट कोहली जर उत्तम फलंदाज आणि कर्णधार नसता तर त्याचं वागणं हे मैदानात भांडणाचं कारण ठरलं असतं, यात शंका नाही. त्याची ही आक्रमकता फलंदाजाच्या रूपात तर दिसलीच, पण प्रत्येक विकेटनंतर त्याचा उत्साह कधीकधी अति वाटतो. त्यामुळे २०१२ नंतर काही काळ मैदानावर शांत झालेला कोहली आणि फलंदाज म्हणून आक्रमक झालेला कोहली परत पाहायला मिळावा अशी अपेक्षा...

अक्कलखाती जमा

दुसर्‍या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर तब्बल १४६ धावांनी विजय मिळवला, म्हणजे भारताने प्रयत्न केले नाही, अशातला भाग नाही, पण नेहमीप्रमाणे काही निर्णयांमुळे गोलंदाजांची मेहनत अक्कलखाती जमा झाली. दुसर्‍या सामन्याच्या पहिल्या सत्रात भारत जेव्हा ४ वेगवान गोलंदाज घेऊन मैदानात उतरला, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या मात्र मोहम्मद शमीच्या गोलंदाजीनंतर या निर्णयाचं समर्थनही करावंसं वाटलं. पण शेवटच्या दिवसातील तासाभराच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी ५ बळी टिपले आणि सामना अगदी अलगद आपल्या खिशात घातला. सामन्यात ८ बळी टिपणार्‍या फिरकीपटू नेथन लॉयनला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले आणि या सामन्यात भारताचा एकही फिरकीपटू नव्हता. यामुळे संघ निवडीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पर्थचे मैदान हे फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज दोघांसाठी उत्तम आहे. मात्र, अश्विनच्या दुखापतीमुळे तो आधीच सामन्याच्या बाहेर गेला. मात्र, भारताकडे अश्विनची बदली नसली तरी, रवींद्र जडेजाला खेळवण्यास हरकत नव्हती. तर, भारत ११ क्रमांकाचे ४ फलंदाज घेऊन खेळला.

ज्या फलंदाजांना ८, ९, १० आणि ११व्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली. त्यामुळे या संघ निवडप्रक्रियेवर विरेंद्र सेहवागसह अनेक समीक्षकांनी टीका केली. नेहमीप्रमाणे भारताच्या दोन्ही डावांची सुरुवातीची कामगिरी निराशाजनक होती. सलामीवीरांकडून काहीच अपेक्षा नसल्यासारखी परिस्थिती सध्या झाली आहे. पृथ्वी शॉच्या दुखापतीचे परिणाम हे भारताच्या रन रेटवर होत आहेत. त्यामुळेच दुसर्‍या डावात भारताचा पूर्ण डाव अवघ्या १४० धावांवर आटोपला. या पराभवातून भारताला शिकण्यासारखे बरेच काही असले तरी, ऑस्ट्रेलियन संघाचा वाढलेला आत्मविश्वास आणि फिरकीपटू लॉयन यांचा सामना करण्यास भारताला सज्ज व्हावे लागणार आहे. त्यामुळे २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे होणारा तिसरा कसोटी सामना भारतासाठी महत्त्वाचा असेल. त्यातच पराभवाच्या विळख्यात सापडलेल्या भारतीय संघाचे मुख्य दुखणे असलेले दुखापत झालेले खेळाडू पुन्हा ‘कमबॅक’ करतील का, हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे सध्या अश्विन, पृथ्वी शॉ यांनी मैदानावर उतरणे भारतासाठी जमेची बाजू असेल. हा सामना अक्कलखाती जमा केल्यानंतर आता, संघनिवडीवर सर्वांचं लक्ष असेल...


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@