दत्तनामाचा गजर करा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |
 

दत्तात्रेय, दिगंबर, गुरूदेव दत्त अशा नामाभिधानाने साकार होतात श्री दत्तगुरू! स्मतृर्गामी स्वरूपापर्यंत घेऊन जाणारे, वेगवेगळ्या रुपात दर्शन देणारे श्री दत्तगुरू. विविध स्थानी भेटणारे, जितके प्रेमळ तितकेच कडक असणारे दत्तगुरू. भक्तांची परीक्षा घेणारे, परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या भक्तांना कौतुकाने जवळ घेणारे दत्तगुरू.यती योगेश्वर असणारे, अतर्क्य योगसाधना करणारे व करून तोषवणारे, कधी त्रिमुख धारण करून त्रैलोक्यात संचार करणारे, काखेत झोळी घेऊन भिक्षा मागणारे, झोळीत भक्तिभाव घातला की, प्रसन्न होणारे, श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करणारे, श्री नृसिंहसरस्वती स्वामी म्हणून भक्तांना श्रीगुरुचरित्र कथन करणारे श्री दत्तगुरू!

 

दत्तगुरूंचं गुणवर्णन करण्यास मायेच्या अधीन असणारे शब्द काय कामाचे? कारण, मायेच्या पल्याड असणारे, मायेचा स्पर्शही नसणारे दत्तगुरू मायेमध्ये बांधलेल्यांना कसे शब्दबंधामध्ये सापडणार? अतर्क्य, अनंत, अपार या तीन ‘अ’मधून अलौकिकाच्या प्रदेशात भक्तांना मुक्त प्रवास घडवणारे दत्तगुरू. अवघड, अशक्य, असणार्‍या शब्दांना भक्तांच्या जीवनकोशातून काढून टाकणारे, भक्तांना कधीही टाकून न देता सदैव त्यांना समवेत घेऊन वावरणारे, डोंगर-पर्वत,गुहा अशा दुर्गम स्थानी तपामध्ये रममाण होऊन समाधीसुखाच्या अथांगसागरात सदैव डूब घेणारे दत्तगुरू. हे दैवत कलियुगात भक्तांना अवघड वळणावर कडेवर उचलून पार करून देणारे आहे.

 

सत्त्व, रज, तम त्रिगुणाने युक्त असल्याचा आभास निर्माण करणारे गुरूदेव दत्त! त्रिगुणाच्या पल्याड असणारे, पण भक्तांसाठी त्रिगुणात्मक अशा सृष्टीमध्ये अवतार घेणारे श्री दत्तात्रेय. निर्गुण असून सगुणात साकार होणारे, निराकार असून अंबामातेच्या पोटी बालकरुपात साकार होऊन मातृसुखाचा अनुभव देणारे दत्तगुरू! कारंजाग्रामी मातेला आनंदाच्या झुल्यावर झुलवणारे, सकल भक्तांना अतर्क्य वाटेल असे चरित्र घडवणारे दत्तगुरू. अत्रि-अनसूयेच्या पोटी जन्म घेणार्या दत्तात्रेयांसाठी अवघ्या सृष्टीचा सुंदर पाळणा करून अनसूया आणि अंबामातेने अंगाईगीते गायिली. त्यांचा जन्मोत्सव प्रत्येक भक्ताला भावतो. मार्गशीर्ष मासामधील पौर्णिमा म्हटली की, दत्तभक्तांच्या आनंदाला उधाण येतं. या पौर्णिमेला भक्तीचा परिपूर्ण परिघ पूर्ण करण्याचं सामर्थ्य असलेले दत्तगुरू सगुणात साकार झाले. ही मार्गशीर्ष पौर्णिमा म्हणजेच दत्तजयंती होय.

 

दत्तात्रेयांचा जन्मोत्सव संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी श्रद्धायुक्त अंत:करणानं साजरा केला जातो. गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर लाखनी, भद्रावती, भांबेरी, नागपूर आणि मुंबईच्या महानगरात हा दत्तजयंती उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. वर्षभर सकल दत्तभक्त या सोहळ्याची आतुरतेने प्रतीक्षा करतात. प्रवचनातून दत्तात्रेयाचं महात्म्य कथन करण्यात प्रवचनकार धन्यता मानतात. कीर्तनामधून दत्तकथा थेट आसमंतात घुमवत दत्तगुरूंपर्यंत कीर्तनकार घेऊन जातात. दत्तात्रेयांच्या विविध रुपांचं, गुणांचं वर्णन करताना वाणी थकत नाही. संसाराचा गाडा ओढताना थकून गेलेले भक्त दत्तात्रेयांच्या जयंतीउत्सवात उत्साहानं सहभागी होतात. केशरी-पिवळ्या रंगांच्या फुलांचे हार तसेच सजावट करताना भक्तीमध्ये रममाण होतात. पादुकांची अत्तराने पूजा करताना, गंध लेपन करताना प्रपंचातील नकोसे वाटणारे प्रसंग विसरून जातात.

 

नाना रंग, गंध उधळत येणारी दत्तजयंती प्रपंच, संसाराचे भडक रंग फिके करून टाकते. भक्तीचे रंग अधिक गडद-गहिरे करणारी दत्तजयंती! सप्तसुरातील संगीत गाताना दत्तगुरूंना आर्तपणानं आळवतात. दत्तगुरूंना संगीत, गायन अत्यंत प्रिय आहे. जिथे भक्त भावपूर्ण अंत:करणानं गायनसेवा करतात, तिथे दत्तात्रेयांना दर्शन दिल्याशिवाय राहवत नाही. ते त्यांच्या अस्तित्वाच्या अनुभूतीनं अवघा उत्सव भारून टाकतात. श्री गुरूचरित्र ग्रंथाचं पारायण मोठ्या नेमस्तपणानं करणारे भक्त त्यांना भावतात. तसेच श्री गुरूचरित्र ग्रंथाचं खर्‍या अर्थानं श्रवण करणार्‍या भक्तांवर ते आशीर्वादाची फूलं उधळतात. खडावांचा आवाज करत तर कधी हळूच गुप्तपणे उत्सवाच्या स्थानी येऊन भक्तांना खूश करतात. त्यांच्या अभिषेकाच्या तीर्थामध्ये, भस्मामध्ये भरपूर शक्ती असल्याचा अनुभव अनेक भक्तांना देतात.

 

दत्तजयंती उत्सवात भारून टाकणारं वातावरण तयार होतं. गूढ रम्यता त्या स्थानी जाणवते.एकभक्त असणारे बघता...बघता मुक्तीपर्यंत जातात. सातत्यानं सप्ताहभर केलेला ‘दिगंबरा दिगंबरा’चा मंत्रघोष थेट दत्तगुरूंना यायला भाग पाडतो. भक्तांना लौकिकासमवेत पारलौकिकाचे अनोखे रंग दाखवतात. त्यामध्ये भक्तांना रंगवतात. उत्सवामध्ये कायिक, वाचिक, मानसिक अशी त्रीविधं तपं भक्तांकडून घडतात. त्यामुळे त्यांना आत्मिक परमानंदाचा लाभ होतो. दत्तात्रेयांच्या उत्सवात पूजन, भजन, कीर्तन यांचा सुंदर सात्त्विक थाट असतो. अशा भक्तांवर दत्तप्रभू कृपेचा अविरत वर्षाव करतात. या वर्षावात चिंब भिजणारे भक्त मोठे भाग्यवान! दत्तगुरूंचा महिमा गाता... गाता भक्त दत्तमय होऊन जातात. दत्तात्रेय, दत्तगुरू यांचा उत्सव म्हणजे चैतन्याची सळसळ. चैतन्य मनामनात झिरपत गेलं की, जीवनाचं सार्थक होऊन जातं.

 
- कौमुदी गोडबोले 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@