अभिमन्यूचा अंत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |
 

चक्रव्युहात वेगाने शिरून अभिमन्यू कौरव सैन्याचा पाडाव करत होता. त्यांना जीवंत राहण्याची आशाच आता उरली नव्हती. शल्यपुत्र रुक्मरथ याने अभिमन्यूस ललकारले. तो उत्तम प्रतीचा योद्धा होता. अतिशय देखणे असे ते द्वंद्वयुद्ध होते. पण, त्याचाही अभिमन्यूने वध केला. त्यामुळे चिडून शल्याचे इतर पुत्र सरसावले, त्यांना अभिमन्यूने बेशुद्ध केले. त्याच्याशी लढणाऱ्या सर्वांनाच मरण तरी आले किंवा पळून जावे लागले. दुर्योधनाचा पुत्र लक्षणकुमार पुढे आला, दोघांचे तुंबळ युद्ध झाले. दोघेही तरुण आणि कसलेले योद्धे. शौर्याची परिसीमा झाली. पण, काही वेळातच अभिमन्यूने दुर्योधनासमोर लक्षणकुमाराला यमसदनास धाडले. आपल्या मुलाचा वध डोळ्यांसमोर पाहून दुर्योधनाला धक्काच बसला. तो मोठ्याने आक्रोश करू लागला, “या पातक्याला ठार करा.”

 

मग द्रोण, कृप, अश्वत्थामा, राधेय, बृहद्बळ आणि कृतवर्मा असे सहा योद्धे एकत्र आले आणि त्यांनी अभिमन्यूवर हल्ला केला. अभिमन्यूने त्यांचे घोडे मारले, धनुष्याचे तुकडे केले आणि तो हल्ला परतवून लावला. त्याला कळले की, जयद्रथाने पांडवांची वाट अडवून धरली आहे, म्हणून त्याने जयद्रथावरही हल्ला केला. व्यूहाच्या बाहेर कसे यावे हे त्याला कळेना, म्हणून सर्व व्यूहच मोडून टाकावा असा विचार त्याने केला. अभिमन्यू रागाने फुलून गेला होता. द्रोणांकडे अतिशय तुच्छतेने पाहून तो म्हणाला, “तुम्ही थोर पुरुष आहात. न्यायी आहात तरी, माझ्यावर असा अन्य्याय करण्याची तुमची हिंमत कशी झाली?” राधेयास पाहून तो म्हणाला,“तुम्ही स्वत:ला भार्गवाचे शिष्य म्हणवता, हेच का तुमचे शौर्य? तुम्ही धनुर्विद्येत माझ्या पित्यासमान आहात, असे स्वत:ला मानता मग असा भ्याडपणा का? ही पृथ्वी दुभंगून तुम्हाला गिळत कशी नाही? तुमच्या सर्वांची नावे आदराने आणि भीतीने घेतली जातात, कुठे गेले तुमचे उदारपण? हीच का उदात्तता? एका योद्ध्यावर सहा सहाजण हल्ला करता? तुम्हाला लाज शरम कशी वाटत नाही?”

 

अभिमन्यूस आता क्षणाची पण उसंत नव्हती त्याला लढणे भाग होते. आपली ढाल आणि तलवार घेऊन त्याने रथाबाहेर उडी मारली. या सर्वांना आता ठारच केले पाहिजे, असा विचार त्याने केला. द्रोण हे पाहत होते, त्यांना त्याच्या क्रोधाची कल्पना आली. बाण सोडून त्यांनी त्याच्या तलवारीची मूठ तोडली. राधेयाने त्याच्या ढालीचे दोन तुकडे केले. त्यामुळे आता अभिमन्यू पूर्ण नि:शस्त्र झाला. या सहा योद्ध्यांनी त्याला ठार मारण्याचा कट केला.

 

अभिमन्यूला आपल्या पित्याची अर्जुनाची आर्तेतेनेआठवण आली. आई सुभद्राचीही आठवण आली. त्याचे शौर्य पाहून मातापित्यांना वाटलेला अभिमान तो आता पाहू शकणार नव्हता. तो उदास झाला. आपण मृत्यूपूर्वी आपल्या पित्याला पाहू शकणार नाही, हे जाणवून तो खिन्न झाला. युधिष्ठीर आणि सर्व पांडव त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. त्यांना जयद्रथाने अडवून धरले होते. श्रीकृष्णास आता आपण पाहू शकणार नाही, याचे त्याला वाईट वाटले. कौरवांच्या या सहा योद्ध्यांनी त्याच्यावर केलेल्या या भ्याड हल्ल्याचा वचपा आपले पिताश्री अर्जुन नक्कीच काढतील, असा विश्वास मात्र त्याला होता.

 

अभिमन्यू असाहाय्य झाला होता. तो आपल्या रथाकडे गेला आणि त्याने रथाचे एक चाक काढून डोक्यावर धरले. ते चक्र गरगर फिरवून तो म्हणाला, “या ! एकामागून एक माझ्याशी लढायला या,” हे बोलून तो द्रोण यांच्याकडे वळला, चक्रधारी विष्णूच जणू! ते चाक तो त्यांच्यावर फेकणार इतक्यात त्या सहाही जणांनी बाण सोडून त्या चाकाचे तुकडे तुकडे केले. आता त्याने हातात गदा घेऊन आव्हान केले. तो अश्वत्थाम्यावर चालून आला. अश्वत्थामा त्याचे रौद्र रूप पाहून घाबरला आणि पळून गेला. मग तो दु:शासनाच्या मुलावर चाल करून गेला. दोघांचे घनघोर गदायुद्ध झाले. अपार थकव्यामुळे अभिमन्यू बेशुद्ध होऊन खाली पडला, दु:शासनाच्या पुत्राने त्याच्या मस्तकावर गदाप्रहार केला जो अभिमन्यूस सहन झाला नाही. परत कधीही उठण्यासाठी अभिमन्यू भूमीवर पडला होता, त्याचा वध झाला होताविश्वासघात करून सहा लोकांनी त्याचा असा वध केला होता. हा भयंकर गुन्हा सहा अतुल वीरांनी केला होता. हे पाप दुर्योधना इतकेच या सहाही लोकांचे होते. शंकराच्या वराने जन्म घेतलेला द्रोणपुत्र अश्वत्थामा पण यात सामील होता!

 

[email protected]


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@