स्वस्थ भारत यात्रेचे धुळ्यात आज आगमन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2018
Total Views |

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन

धुळे : 
 
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशात आरोग्य जनजागृतीच्या दृष्टीने शाश्वत सामाजिक बदल घडविण्यासाठी भारतीय अन्न व मानके प्राधिकरणाने सुरू केलेली ‘इट राईट इंडिया’ ही चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वस्थ भारत यात्रेंतर्गत सायकल रॅली काढण्यात येत आहे.
 
या सायकल रॅलीचे 20 डिसेंबर रोजी धुळे जिल्ह्यात आगमन होईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त ल. अं. दराडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
 
 
सहाय्यक आयुक्त दराडे यांनी म्हटले आहे, जागतिक अन्न दिवसानिमित्त म्हणजेच 16 ऑक्टोबरपासून देशाच्या सहा वेगवेगळ्या भागातून सायकल रॅली निघाली आहे. त्यापैकी तीन सायकल रॅली राज्यातून जाणार आहेत.
 
 
त्यापैकी एक सायकल रॅली नाशिक विभागातून जात आहे. या रॅलीसाठी केंद्र सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय, स्वच्छ भारत मिशन, पोषण अभियान, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सहयोगाने भारतीय अन्न व मानके प्राधिकरण, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय राबवीत आहे. धुळे जिल्ह्यातून सायकल रॅली 20 ते 24 डिसेंबर या कालावधीत मार्गक्रमण करेल.
 
 
गुरुवार 20 रोजी रॅलीचे आर्वी, ता. जि. धुळे येथून सायकल रॅलीचे धुळे जिल्ह्यात आगमन होईल. शुक्रवार 21 रोजी सकाळी 9 वा. क्युमाईन क्लब, धुळे येथून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन होईल.
 
 
ही रॅली अग्रवाल विश्रामगृह, श्री समर्थ सेवा केंद्र, महात्मा गांधी पुतळा, गल्ली क्रमांक 4, महानगरपालिकामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचेल. तेथे रॅलीचा समारोप होईल. यानिमित्त क्रीडा विभागातर्फे विविध कवायती, आदिवासी नृत्याचा कार्यक्रम सादर करण्यात येईल. यानिमित्त 21 रोजी सकाळी 10 वा. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात कार्यक्रम होईल.
 
 
जिल्हाधिकारी रेखावार हे अध्यक्षस्थानी असतील. तसेच अन्नातील भेसळ कशी ओळखावी, याविषयी प्रात्यक्षिके दाखविण्यात येतील. याशिवाय रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर रॅली 22 रोजी शिरपूरकडे मार्गक्रमण करेल.
@@AUTHORINFO_V1@@