शिर्डी संस्थानचा आदर्श

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |



 
 
डॉ. हावरेंची चिता पेटवून त्यांचे प्रतिकात्मक प्रेत स्मशानात नेऊन जाळण्याचे प्रकार शिर्डीत झाले आहेत. दुसऱ्या बाजूला मंदिर व्यवस्थापनाच्या अनेक निर्णयांमुळे होत असलेले सामाजिक बदलही समोर आहेत. अन्य धर्मीयांनीही त्याचे पालन केल्यास त्याचे समाजात स्वागतच होईल.
 

आधुनिक समाज दोन प्रकारच्या ताकदींवर चालतो. पहिले म्हणजे कायदा, घटना, न्यायव्यवस्था, लोकशाही पद्धतीने निवडून येणारे शासन, तर दुसऱ्या बाजूला असते मूल्यव्यवस्था, सर्वसामान्यांचे आचरण. या मूल्यव्यवस्था रुजविण्याचे काम श्रद्धा करतात. श्रद्धा म्हणजे परमेश्वराची कृतिहीन भक्ती नव्हे, तर योग्य आचरणाच्या प्रेरणा म्हणून त्याकडे बघितले पाहिजे. भारतीय परिप्रेक्ष्यात याचा विचार करायचा झाला तर हजारो वर्षांपासून मंदिरे, त्यातून निर्माण होणारे साहित्य, पूजनीय व्यक्तींच्या जीवनातून पाझरणारे आचरणाचे अमृत. सर्वसामान्यांनाही आयुष्यात कसे जगावे याचे मार्ग ही प्रार्थनास्थळे आणि साधूसंत दाखवितात. अशा मार्गदर्शनासाठी अत्युच्च अशा व्यक्तिमत्त्वाची गरज असते. सर्वसामान्य अशा प्रकारचे जीवनभान राखून आयुष्य जगू शकत नाहीत. मग विभूतींना समाज मान्यता देतो आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गक्रमण करीत असतो. हिंदू भावविश्वात जसे देवीदेवतांना महत्त्व आहे, तसेच ते निरनिराळ्या प्रकारच्या सिद्ध पुरुषांनाही आहे. अक्कलकोट स्वामी, शेगावचे गजानन महाराज आणि शिर्डीचे साईबाबा यापैकीच.

 
शिर्डी ओळखली जाते ती साईबाबांमुळेच आणि शिर्डी यापुढे ओळखली जाईल ती साईबाबांबरोबरच मंदिर व्यवस्थापनामुळे आणि त्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्यामुळे. शिर्डी संस्थानाने सरकारला ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यावरून सध्या वाद सुरू आहे. शिर्डी संस्थानाला वाद नवे नाहीत, मात्र आता या निर्णयावरून वाद होत आहेत. पूर्वी ते इथल्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथांवरून व्हायचे. शिर्डीत डॉ. हावरे यांच्या प्रयत्नांतून जे निर्णय झाले, जे आमूलाग्र बदल घडले त्यातून संस्थानाला आपले खाजगी कुरण मानून वागणाऱ्यांचे हितसंबंध जोपासाणाऱ्यांना चाप बसला. ग्रामस्थांच्या जमिनी भाव पाडून विकत घ्यायच्या आणि मंदिराला मग त्या चढ्या भावात विकायच्या, असा एक शिरस्ता इथे होऊन गेला होता. तो डॉ. हावरेंनी मोडला. यातून मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयावरून अत्यंत घाणेरड्या प्रकारचे आरोप आणि आंदोलने करण्यात आली. डॉ. हावरेंच्या प्रतिकात्मक प्रेताची अंत्ययात्रा काढण्यात आली आणि त्याला चितेवर अग्नीही देण्यात आला. त्यांची गाडी फोडली गेली आणि अनेक आरोपही करण्यात आले. शिर्डी हे गाव तसे नावारूपाला आले ते साईबाबांमुळेच. पाण्याची कमतरता, अनियमित शेती यामुळे रोजगाराची अन्य साधने इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध नाहीत. आज वादग्रस्त करण्यात आलेल्या निर्णयामुळे संपूर्ण नगर जिल्ह्याचे भाग्यच बदलणार आहे.
 
निळवंडे नावाचे धरण नगर जिल्ह्यात काठोकाठ भरून उभे आहे. मात्र, कालवेच न काढल्याने शेतकऱ्यांना पिण्याच्या वापरासाठी या पाण्याचा उपयोगच होत नाही. शिर्डी संस्थान हे पाटबंधारे बांधण्यासाठी खर्च करणार आहे. जसजसे काम पूर्ण होईल तसतसे याचे हप्ते संस्थानाकडून दिले जातील. नगर जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यातून सुटेल. अशा प्रकारचे क्रांतिकारक निर्णय शिर्डी संस्थानने पहिल्यांदाच घेतलेले नाहीत. शिर्डी स्वच्छ राहावी म्हणून संस्थान स्थानिक नगर परिषदेला दरमहा ३० लाख रुपये देते. दीडशे लोक दोन वेळा शिर्डी स्वच्छ करतात. घनकचऱ्याचे निर्मूलन करण्याचा प्रकल्पही आता मंदिराने हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात यामुळे शिर्डी नगर परिषदेला १५ कोटी रुपयांचे बक्षीसही मिळाले. आत्महत्या केलेल्या ६०० शेतकऱ्यांच्या कुटुंबांना संस्थानाने वैशिष्ट्यपूर्ण मदत केली आहे. केवळ धनादेश न देता रोजगाराभिमुख साहाय्यामुळे या कुटुंबांना कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्न मिळाले आहे. ५५० खाटांची दोन मोठी रुग्णालयेही संस्थान चालवते. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात इस्पितळे चालविण्यासाठी व अत्याधुनिक यंत्रणा विकत घेण्यासाठी मंदिराने ७१ कोटी रुपये दिले आहेत. स्वत: डॉ. हावरेंनी स्वत:च्या खिशातून ३७ लाखांहून अधिक रक्कम दिली आहे. आता इतके असताना संस्थानाने नीट काम करू नये म्हणून वाटेत काटे पेरणाऱ्यांचीही संख्या मुळीच कमी नाही. मंदिरही तेच आहे व शिर्डीही तीच आहे. व्यवस्थापन करण्याची पद्धत बदलली आणि व्यक्तीच्या ठायी काही मूल्यांची बैठक असली की, असे बदल घडून येतात. या व्यवस्थापनावर करण्यात आलेला सर्वात मोठा आरोप म्हणजे भगवीकरणाचा. यंदा साईंनी समाधी घेतलेल्या क्षणाला दीडशे वर्षे पूर्ण झाली. देशाचे पंतप्रधान यासाठी हजर होतात. मंदिरांवर भगवा ध्वज लावला गेला म्हणून गदारोळ माजविण्यात आला.
 
साईबाबा मुस्लीम असल्याचा पुरावा सादर करण्याचेही प्रयत्न झाले. यात स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणविणारी माध्यमे हा वाद वाढविण्यात आणि रंगवून पेश करण्यात पुढे होती, हे विशेष. ऋषीचे कूळ शोधू नये म्हणतात तसेच साईबाबांचेही आहे. आज शासनाच्या वतीने हे संस्थान चालविले जाते. अन्य कुठल्याही धर्मीयांची प्रार्थनास्थळे अशा प्रकारे सरकार चालवित नाही. जुन्यापुराण्या रुढी चालविण्यासाठी किंवा अन्य धर्मीयांना बाटविण्यासाठी श्रद्धाळूंनी दिलेला पैसा वापरला जातो. भक्तांनी दिलेला पैसा किती श्रद्धेने आणि नियोजनाने वापरला तर त्याचा कसा उपयोग करता येईल, त्याचा आदर्श म्हणून शिर्डी संस्थानाकडे पाहिले पाहिजे. ‘देवाला रिटायर्ड करा,’ असे हमखास टाळ्या मिळविणारे एक वाक्य स्वत:ला ‘पुरोगामी’ म्हणविणाऱ्यांत प्रसिद्ध आहे. हे विधान करणाऱ्या नटाचे नटश्रेष्ठत्व नाकारता येणारे नसले तरी हा सल्ला स्वीकारल्यानंतर किती विधायक कामांवर आपल्याला पाणी सोडावे लागेल, याची कल्पनाही न केलेली बरी. समाज चालतो तो श्रद्धेवरच. साईबाबांनी त्याला सबुरीचीही जोड दिली. जगभराने उचलून धरलेली साईबाबांची ही दोन मूल्ये शिर्डीकरांनीही आत्मसात केली, तर शिर्डीतल्या नतद्रष्टांना असले जिवंत माणसांच्या चिता जाळण्याचे उद्योग करावे लागणार नाहीत. तिरुपती बालाजी असो किंवा मुंबईचा सिद्धीविनायक, अशा प्रकारची भरघोस मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आजतागायत कुठल्याही सरकारी हस्तक्षेपाला या मंडळींनी मान्यता दिलेली नाही, हा मोठा वादाचा मुद्दा होईल. मात्र, शिर्डी संस्थान व डॉ. हावरेंचा आदर्श घेऊन या सगळ्याच मंडळींनी आपली मूल्यव्यवस्था समाजासमोर सिद्ध करावी. असे काही घडल्यास त्याचे यथोचित स्वागतच होईल.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@