पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018   
Total Views |



मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगण व मिझोराम या पाच राज्यांतील निवडणुका आता संपत आल्या आहेत आणि आता चर्चा होत आहे, ती या राज्यांच्या निकालांचा लोकसभा निवडणुकीवर होणाऱ्या परिणामांची.


प्रत्येक निवडणूक वेगळी असते, निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात आणि त्यामुळे या पाच राज्यांचे निकाल लोकसभेसाठी निर्णायक असतील, असे समजण्याचे कारण नाही. या निकालांचा एक मनोवैज्ञानिक परिणाम होतो आणि तो काही दिवस कायम असतो. या काही दिवसांत पुन्हा एखादी घटना घडते आणि पहिल्या वातावरणाला कलाटणी मिळते. पाच राज्यांत भाजपला विजय मिळाल्यास त्याचा एक अनुकूल परिणाम भाजपसाठी होईल. मात्र, त्याचा दुसरा परिणाम म्हणजे विरोधी पक्ष एकजूट होतील. कारण, शेवटी निवडणुकांचे यश ही एक मतांची बेरीज असते. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताची शान उंचावली, भारताचा परकीय चलनाचा साठा जो पूर्वी १० हजार कोटी होता, तो आता १५ हजार कोटी झाला आहे, चलनवाढीचा दर पूर्वी जास्त होता, आता तो कमी झाला आहे, याचा विचार करून देशाच्या कानाकोपऱ्यात राहणारा मतदार मत देत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपला उमेदवार कोण, मुस्लीम, दलित, ठाकूर, ब्राह्मण किती? उमेदवार ठाकूर असेल तर ब्राह्मण दुसरीकडे जाणार, उमेदवार ब्राह्मण असेल तर ठाकूर दुसरीकडे जाणार, हे सारे मुद्दे एवढे प्रभावशाली असतात की, शेवटी या घटकांचे प्रतिनिधीत्व करणारे राजकीय पक्ष एकत्र आले तर त्याची बेरीज होईल आणि ते एकत्र न आल्यास स्वाभाविकच भाजपचा आकडा मोठा दिसेल. कर्नाटकात लोकसभेच्या काही पोटनिवडणुका झाल्या. तेथील राज्य सरकारमध्ये सध्या काँग्रेस आणि जेडीएसमध्ये दररोजचे तमाशे सुरु आहेत. तरीही जनता दल-काँग्रेस युतीला मोठा विजय मिळाला. कारण, मतांची बेरीज या युतीच्या बाजूने होती. कर्नाटक विधानसभेत भाजपला १०४ जागा मिळाल्या. मते मिळाली ६९ लाख. काँग्रेसला ८१ जागा मिळाल्या. मते मिळाली ७१ लाख आणि जनता दल (से)ला ३९ लाख मते पडली. काँगे्रस आणि जनता दल (से) एकत्र आले. सरकार स्थापन केले. सरकारमध्ये सगळे काही आलबेल नाही. पण, दोन्ही पक्षांची मते एकत्र आली आणि त्यांनी पोटनिवडणुका जिंकल्या.

 

२०१४ मध्ये भाजपला ३१ टक्के मते आणि ५१ टक्के जागा मिळाल्या होत्या. कारण, विरोधी पक्ष विखुरलेले होते. विरोधी पक्षांमधील फूट कायम राहिल्यास भाजपला २०१४ पेक्षाही मोठा विजय मिळेल आणि विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपला काही अडचणींचा सामना करावा लागेल. भाजपसाठी एक समाधानाची बाब म्हणजे, बिहारमध्ये नितीशकुमार भाजपसोबत राहतील, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. म्हणजे, या एका राज्यात तरी भाजपला नुकसान होण्याची शक्यता नाही. रामविलास पासवान काही जादा जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेही शेवटी भाजपसोबत राहतील, असे मानले जाते. त्यातल्या त्यात उपेंद्र कुशवाहा यांचा पक्ष मात्र भाजप आघाडीबाहेर पडण्याचे संकेत आहेत. अर्थात त्याचा दोन-तीन मतदारसंघ वगळता फार परिणाम होण्याची शक्यता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस वगळता अन्य प्रादेशिक पक्षांसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. ही एक फार चांगली बाब आहे. शिवसेना व चंद्राबाबू नायडू यांना पुन्हा जवळ करता येईल का, यासाठी भाजपने प्रयत्न केला पहिजे. चंद्राबाबू नायडू फार दुखावले गेले आहेत. सध्या ते विरोधी पक्षांना एकत्र आणणारे शिल्पकार ठरत आहेत. जी भूमिका पूर्वी लालूप्रसाद यादव बजावत होते, त्या भूमिकेत सध्या नायडू वावरत आहेत. त्यांना पुन्हा भाजप आघाडीत आणण्याचे प्रयत्न झाल्यास, त्याचा भाजपला फार मोठा फायदा होईल.

 

नवी भाषा

 

पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इमरान खान यांची नवी भाषा जरा सुखद धक्का देणारी आहे. कर्तारपूर कॉरिडोरच्या भूमिपूजन सोहळ्यात इमरान खानचे भाषण त्याचा संकेत देणारे ठरले. पाकिस्तानचे नेते आजवर भारताला, अण्वस्त्रांची धमकी देत होते. पण, इमरान खानने मात्र समंजस भाषा उच्चारली आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही देशांजवळ अण्वस्त्रे आहेत. म्हणजे युद्ध होण्याची शक्यता नाही. कारण, युद्ध झाल्यास दोन्ही देश पराभूत होतील, बेचिराख होतील, हे इमरानचे भाष्य फार बोलके आहे.

 

प्रामाणिक भाष्य

 

पाकिस्तानची भूमी अन्य देशांत दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरू देणे, हे पाकिस्तानच्या हिताचे नाही, असे प्रामाणिक भाष्य इमरानने केले आहे. हाफिज सईद, दाऊद इब्राहिम या समस्या मला पूर्वापार मिळाल्या आहेत. त्यासाठी मला जबाबदार ठरवू नका, अशी माझी विनंती आहे. इतिहासापासून आपण धडा घेतला पाहिजे, मात्र त्यात अडकून पडता कामा नये,” असेही इमरान खानने म्हटले आहे. इमरान खान हा तसा धर्मांध नेता नाही. पाकिस्तानची जनता आज तरी त्याच्या बाजूने आहे. पाकिस्तानच्या नव्या पिढीचा तो प्रतिनिधी आहे. जग किती पुढे गेले आहे, हे त्याने पाहिले आहे. पाकिस्तानसाठी काहीतरी करण्याची त्याची इच्छा आहे. कर्तारपूर कॉरिडोरबाबत त्याने एक धाडसी निर्णय घेतला आणि भारतानेही त्यास अनुकूल प्रतिसाद दिला. पाकिस्तानची सर्वात मोठी समस्या म्हणजे, तेथील राजकीय स्थिती केव्हा बदलेल याची शाश्वती नाही. दोन्ही देशांना एकत्र आणू शकणारी बाब म्हणजे, दोन्ही देशांमधील समान भाषा, समान व्यवहार.

 

बर्लिनची भिंत

 

आज पाकिस्तान-चीन एकत्र आले तरी त्या दोन्ही देशांमध्ये काहीच समान नाही, एकत्र आणणारा एकही समान दुवा नाही. रंग, भाषा, धर्म सारे वेगळे आहे. भारत- पाकिस्तान यांच्यात तसे नाही. पंतप्रधान मोदी यांचे,”बर्लिनची भिंत कोसळू शकते तर भारत-पाकिस्तान यांच्यातील भिंतही कोसळू शकते,” हे विधान फार मार्मिक आहे. बलिर्र्नची भिंत कोसळली, ती काही एखादा करार करून नाही तर दोन्ही देशांतील जनभावनांच्या रेट्याने कोसळली. भारत-पाक संबंधात तो रेटा नाही. पंजाब प्रांत हा पाकिस्तानचा कणा आहे आणि पाकिस्तानी पंजाब व भारतातील पंजाब या दोन्ही राज्यांतील सारे काही एक आहे. बोलण्याची भाषा, वागण्याची पद्धत, घरातील व्यवहार सारे एक आहे. कारण, ७१ वर्षांपूर्वी हे दोन्ही प्रांत एकच होते. आज जर दोन्ही देशांतील नागरिक मोठ्या संख्येने दुसऱ्या देशात जाऊ लागले, तर मग वातावरण बदलू लागेल आणि भारत-पाक संबंधातील चीनची भिंत कोसळण्यास वेळ लागणार नाही. याचा अर्थ भारत-पाकिस्तान पुन्हा एक होतील असे नाही. पण, जी तेढ आहे जो तणाव आहे आणि याचा जो फायदा अमेरिका, चीन व पाकिस्तानातील काही गट उठवित आहेत, त्यांना तो उठविता येणार नाही आणि दुसरीकडे भारताला जी मोठी आर्थिक व लष्करी किंमत मोजावी लागत आहे, ती मोजावी लागणार नाही.

 

चीनचा धोका

 

भारताला आज आपल्या सुरक्षाव्यवस्थेवर हजारो कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. भारतीय लष्कराचा मोठा भाग काश्मीर खोऱ्यात अडकून पडला आहे. निमलष्करी दलांना मोठा भाग काश्मीर खोऱ्यात अडकून पडला आहे. पाकिस्तानशी संबंध सुधारल्यास त्यात भारताला मोठा दिलासा मिळेल. कारण, भारताला खरा धोका चीनचा आहे. आंतरराष्ट्रीय जगतात पाकिस्तान भारताचा प्रतिस्पर्धी होऊ शकत नाही. भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारताजवळ सारे काही आहे. कमतरता आहे ती मुबलक पैशाची आणि जो पैसा आहे त्यातील मोठा भाग पाकिस्तान आणि काश्मीर या दोन आघाड्यांवर खर्च होत आहे. खरोखरीच कर्तारपूर कॉरिडोर यशस्वी झाल्यास, भारत-पाक संबंधातील तो मोठा अध्याय ठरेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@