...पण भव्य राम मंदिर लवकर बांधा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |


 

 

 
 

विराट जनसागर उसळला, रामनामाचा मंत्र निनादला


जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराजांचे सरकारला आवाहन

 

मुंबई : प्रभू राम हिंदुंच्या अस्मितेचा, प्रतिष्ठेचा विषय आहे. धर्माचे अधिष्ठान श्रीरामचंद्र आहेत. अशा प्रभू रामाचे अयोध्येत भव्य मंदिर उभारले जावे, ही आमची सर्वांची भावना आहे. आता सरकारने कायद्याच्या, अध्यादेशाच्या वा न्यायालयाच्या कोणत्याही मार्गाने अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवरच भव्य मंदिर उभारावे, असे आवाहन जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.

 

अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर राम मंदिर निर्मितीसाठी बांद्रा-कुर्ला संकुल मैदानावर विशाल सभेचे आयोजन करण्यात आले होते. सव्वालाख रामभक्तांच्या उपस्थीतीत पार पडलेल्या या विराट धर्मसभेत स्त्री-पुरुष, आबालवृद्धांसह प्रत्येकजण जणू रामनामाच्सा मंत्राने भारावून गेला होता. आसमंत जय श्रीराम, बदरंगबली की जय घोषणांनी निनादत होता. यावेळी नरेंद्राचार्य महाराजांनी प्रमुख वक्त्याच्या रुपाने वरील आवाहन केले. सदर धर्मसभेवेळी मंचावर गोविंद देव गिरी महाराज, विश्वेश्वरानंद महाराज, जैन मुनी नयपद्म सागर महाराज, रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, विहिंपचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेश जैन, विहिंपचे अ. भा. कार्याध्यक्ष अशोकराव चौगुले, अ. भा. कार्यकारिणी सदस्य दिनेश चंद्र, स्वामी विज्ञानानंद, विहिंपचे केंद्रीय मंत्री जुगल किशोर, विहिंपचे मुंबई विभाग मंत्री शंकर गायकर, विहिंपचे कोकण विभाग मंत्री रामचंद्र रामुका आदी मान्यवर उपस्थित होते.

 

नरेंद्राचार्य महाराज आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की, गेल्या शेकडो वर्षांपासून हिंदु समाज अयोध्येतील श्रीराम मंदिरासाठी संघर्ष करत आहे. आता श्रीराम मंदिरासाठी आम्ही इथे एकत्र आलो आहोत, पण जर त्यात कसलाही अडथळा आला आणि राम मंदिरासाठी आमच्या देहाच्या आहुती पडल्या तरी आम्ही स्वत:ला भाग्यवान समजू. राम मंदिर हा हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न आहे. जर एका हजरत बाल साठी मुसलमान एकत्र येत असतील, जेरुसलेममध्ये आपापल्या देवतेच्या श्रद्धेपोटी दोन धर्म संघर्ष करत असतील तर अयोध्येतील राम मंदिरासाठीजेखील हिंदुंनी जागृत व्हावे. पण हिंदू जागृत होऊनही मंदिर उभारले जात नसेल तर सरकारला आमच्या रक्ताचे पाट वाहताना पाहावे लागेल, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

 

नरेंद्राचार्य महाराज पुढे म्हणाले की, अयोध्येतील श्रीरामजन्म भूमीविषयक सर्व पुरावे पुरातत्व खात्याने याआधीच सादर केलेले आहेत. तरीही हिंदुंना संघर्ष करावा लागत असेल तर कोणी आमच्या सहिष्णुतेच्या गोड समजात राहू नये. आमच्या भावनांचा आदर करावा. पुढे ते म्हणाले की, राम मंदिराचे नाव आले की, हिंदुंना सर्वधर्मसमभावाचे डोस पाजले जातात. पण हाच सर्वधर्म समभावाचा मुद्दा अन्य धर्मियांना कोणी सांगत नाही. अन्य धर्मियांना हिंदू आपले बंघु वाटत नाही. असे का? असाही सवाल त्यांनी केला. रामाने अन्याविरुद्ध रावणाशी युद्ध केले. यावेळी रामाला साह्य करण्यासाठी नल, नील, जांबुवंत, सुग्रीव धावले. आता मात्र राम मंदिरासाठी हिंदू व्होटबॅंकेने एकत्र येऊन जो मंदिर बांधेल त्यालाच निवडून देऊ, असा संकल्प आपण केला पाहिजे. हिंदुत्वाची वज्रमुठ जेव्हा एक होईल तेव्हाच सरकारला जाग येईल. राम मंदिरासाठी सरकारने कायदा करावा वा अध्यादेश आणावा वा अन्य पर्याय अवलंबावे. तो सरकारचा प्रश्न आहे. पण आम्हीला केवळ राम मंदिर हवे आहे. आता राम मंदिरासाठी जो पुढे येईल तोच आमच्यावर राज्य करेल. सरकारला आमच्यापुढे झुकावेच लागेल, मंदिर बांधावेच लागेल, असे त्यांनी सडेतोडपणे सांगितले.

 

वनवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन धर्मांतराचे डाव

 

ख्रिश्चन मिशनरी व धर्मांतराबाबत नरेंद्राचार्य महाराज म्हणाले की, सध्या राज्यासह देशातल्या दुर्गम भागातल्या वनवासी समाजाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन त्यांचे धर्मांतर केले जात आहे. वनवासी समाजात बुद्धीभेद करुन त्यांना हिंदू धर्मापासून तोडण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या दाखल्यावरचा हिंदू धर्म पुसला जात आहे. आम्ही स्वत: वसईत हा अनुभव घेतला. आपल्या सर्वांना एकत्र येऊन ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या या षड्यंत्रालाही हाणून पाडावे लागेल, असे आवाहनही नरेंद्राचार्य महाराजांनी केले.

 

मंदिर उभारणीत कोणीही अडथळा आणू शकत नाही : होसबळे

 

रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करत सांगितले की, कायदा, अध्यादेश वा न्यायालय, चर्चेच्या माध्यमातून सरकारने अयोध्येतील रामजन्मभूमीस्थानी मंदिर निर्मितीचा मार्ग प्रशस्त करावा. हिंदुंच्या भावनेशी सरकार असो वा न्यायालय वा बुद्धीजीवी कोणीही खेळू शकत नाही. राम मंदिर हा हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यात कोणीही कसलाही अडथळा आणू शकत नाही. आम्ही आता आणखी प्रतिक्षा करु शकत नाही. सरकारने ज्याप्रमाणे नर्मदेतिरी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारला, तसेच भव्य श्रीराम मंदिर अयोध्येतही उभारावे, सरकारकरडे यासाठी वेळ नाही का, असा प्रश्न आम्हाला पडतो. एवढे बोलून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाणीवर विश्वास ठेवावा, असे आवाहनही उपस्थितींना केले. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाबद्दल होसबळे म्हणाले की, २०१० सालच्या न्यायालयीन निर्णयानेच हे स्पष्ट झाले की, राम जन्मभूमीस्थानी राम मंदिरच होते. त्यामुळे आता आणखी कसल्या पुराव्यांची वाट पाहायची.? शिवाय नरसिंह राव सरकारनेदेखील बाबरी ढाचा पतनानंतर सर्वोच्च न्यायालयात असे आश्वासन दिले की, रामजन्मभूमीस्थानी मंदिराचे अवशेष सापडले तर ती जागा हिंदुंना देऊ. तर मह अवशेष तर सापडले मात्र त्या आश्वासनाचे काय झाले.? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

हिंदूंच्या सहनशक्तीला मर्यादा आहेत !

 

धर्मसभेला संबोधित करताना गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये आम्ही रामजन्मभूमी प्रकरणावर दररोज सुनावणी घेऊ असे सरवोच्च न्यायालयाने म्हटले होते. मात्र नंकर न्यायालय स्वत:च्याच विधानावरुन पालटले. दहशतवाद्यासाठी मध्यरात्री दरवाजे उघडणाऱ्या न्यायालयाला राम मंदिराचा प्रश्न प्राधान्याचा वाटत नाही, हे कसले लक्षण मानायचे.? हिंदू सहनशील आहेत पण त्यालाही काही मर्यादा असते. आम्हाला मर्यादा उल्लंघायला मजबूर करु नका. आमचा सरकारला विरोध नाही. उलट मी तर म्हणतो की, सध्याच्या सरकारमुळे देश विकासपथावर घोडदौड करत आहे, पण विकासाबरोबरच मंदिरही आवश्यक आहे. सरकारने सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर राम मंदिरासाठी आता कायदा करावा, हीच आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

 

सारा हिंदुस्थान राममय होतो आहे !

 

जैन मुनी नयपद्मसागर महाराज म्हणाले की, सध्या संपूर्ण हिंदुस्थान राममय होताना दिसतो आणि युवकांचा उल्हासही प्रचंड आहे. त्यमुळे राम मंदिर उभारण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. मागच्या सरकारने रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता त्यांनी स्वत:च्या आईवडिलांचे अस्तित्व शोधावे. दिल्लीत तुघलक आणि घोरीच्या नावे रस्ते आहेत पण त्याच्यावर कोणी प्रश्नचिन्ह लावत नाही. मात्र आम्ही श्रीराममंदिराचे नाव घेतले की आम्हाला जातीयवादी ठरवले जाते, विरोध केला जातो, असे का.? लक्षात ठेवा इथे लोकशाही आहे आणि देशातल्या लोकशाहीचा श्वास हिंदू आहे. हिंदुंना रामजन्मभूमीवर भव्य मंदिर उभारायचे आहे आणि त्यापासून त्यांना कोणीही अडवू शकत नाही.

 

मोदीजी पुढे या, आम्ही तुमच्यासोबत आहोत !

 

विहिंपचे संयुक्त महामंत्री डॉ. सुरेंद्र जैन म्हणाले की, लोक आमच्यावर टीका करतात की राम मंदिर निर्मिती हे केवळ विहिंपचे आंदोलन आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, हे विहिंपचे नव्हे तर १९८३ साली संतांच्या आदेशानुसार सुरु झालेले कार्य आहे. सध्या इथे उपस्थित जनसमुदायावरुन वाटते की, हे प्रत्येक हिंदुचे स्वप्न आहे. युवकांच्या उपस्थितीने तर असे वाटते की आता राम मंदिर उभारणीपासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. मी मोदीजींना आवाहन करतो की, त्यांनी राम मंदिर निर्मितीसाठी पुढे यावे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. राम मंदिर निर्मितीतच तुमचे उज्ज्वल भविष्य आहे. दरम्यान यावेळी चिदंबरानंद सरस्वती, स्वामी विश्वेश्वरानंद, देवकीनंदन जिंदल आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. 

 

राम मंदिर हा हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि त्यात कोणीही कसलाही अडथळा आणू शकत नाही. आम्ही आता आणखी प्रतिक्षा करु शकत नाही. सरकारने ज्याप्रमाणे नर्मदेतिरी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभारला, तसेच भव्य श्रीराम मंदिर अयोध्येतही उभारावे, सरकारकरडे यासाठी वेळ नाही का, असा प्रश्न आम्हाला पडतो.”

- दत्तात्रय होसबळे, सहसरकार्यवाह, रा. स्व. संघ

 

"या सभेसाठी जमलेल्या युवकांच्या उपस्थितीने तर आता असे वाटते की, राम मंदिर उभारणीपासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन करतो की, त्यांनी राम मंदिर निर्मितीसाठी पुढे यावे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. राम मंदिर निर्मितीतच तुमचे उज्ज्वल भविष्य आहे.

- डॉ. सुरेंद्र जैन, महामंत्री, विश्व हिंदू परिषद

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@