भारताने बेल्जिअमला बरोबरीत रोखले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2018
Total Views |



नवी दिल्ली : भारतीय संघाने पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य बेल्जियमला २-२ असे बरोबरीत रोखले. अखेरच्या ५ मिनिटांपर्यंत भारताकडे २-१ अशी आघाडी होती, पण सिमोन गौगनार्डने बरोबरीचा गोल केला. अखेरच्या तीन मिनिटांत अनुभवी गोलरक्षक पी आर श्रीजेशने बेल्जियमचा गोल अडवला. भारताने 'क' गटात अव्वल स्थानासह उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेशाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. गोल फरकाच्या जोरावर भारतीय संघ आघाडीवर आहे.

 

रविवारच्या या सामन्यात बेल्जियमने पहिल्या पाच मिनिटांत सामन्यावर मजबूत पकड घेतली. पहिल्याच मिनिटाला मिळालेले दोन कॉर्नर परतवण्यात गोलरक्षक पीआर श्रीजेशला यश आले. ८व्या मिनिटाला अॅलेक्सांडर हेंड्रीक्सने कॉर्नरवर गोल करताना बेल्जियमला आघाडी मिळवून दिली. १४व्या मिनिटाला मनदीप सिंगने गोल करण्याचा केलेला प्रयत्न बेल्जियमच्या गोलरक्षकाने अडवला आणि पहिल्या सत्रात यजमानांना ०-१ अशा पिछाडीवर रहावे लागले.

 

भारत आणि बेल्जियम यांच्यातील सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळवून देणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारणार याचीच उत्कंठा होती. या लढतीपूर्वी उभय संघ ३० वेळा समोरासमोर आले होते आणि त्यात बेल्जियमने जय-पराजयाच्या आकडेवारीत १४-१३ अशी आघाडी घेतली होती. तीन सामने अनिर्णीत सुटले. मात्र, विश्वचषक स्पर्धेतील तीन सामन्यांत भारताने २-१ अशी आघाडी घेतली होती.

 

अखेरच्या दहा मिनिटांत बेल्जियमने भारताच्या सर्कलमध्ये शिरकाव केला, पण भारताच्या बचावपटूंनी चोख कामगिरी केली. आघाडी घेतल्यानंतरही भारताच्या आक्रमणाची धार बोथट झाली नाही. सुमित, ललित उपाध्यय, कोठाजीत, आकाशदीप यांनी सुरेख खेळ केला. अखेरच्या पाच मिनिटांत बेल्जियमने गोलरक्षकाला माघारी बोलावले. ५६व्या मिनिटाला बेल्जियमच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@