सौदीच्या साहाय्यतेचा ‘पाकी’ अर्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2018
Total Views |
 

पाकच्या लष्करी साहाय्यतेला आगामी काळातही सुरळीत ठेवण्यासाठी सौदी अरबचीही परतफेडीची जबाबदारी बनतेच. परिणामी, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानला मदत करण्याचा सौदी अरबने निर्णय घेतलेला दिसतो.

 

पाकिस्तानचे अर्थमंत्री असद उमर यांनी याच आठवड्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना घोषणा केली की, “सौदी अरब पाकिस्तानमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक करणार आहे.” या गुंतवणुकीचे नेमके प्रमाण किती असेल, याची घोषणा मात्र नंतर केली जाईल. त्यामुळे आधीच आर्थिक स्थिती बिकट असलेल्या पाकिस्तानला सौदीच्या गुंतवणुकीमुळे मोठा दिलासा मिळू शकतो. ऑक्टोबर महिन्यातच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या सौदी अरबच्या दौर्‍यात पाकिस्तानच्या जमाखर्चातील संतुलन साधण्यासाठी सौदी अरबने तीन अब्ज डॉलर्सची मदत पाकिस्तानला जाहीर केली होती. त्याचबरोबर सौदीकडून पाकिस्तान आयात करत असलेल्या तेलावरसुद्धा एका वर्षात तीन अब्ज डॉलरची "Deffered Payment Facility' प्रदान करण्यात आली. खरं तर ऑक्टोबर २०१८ पूर्वी सौदी अरबने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारच्या आर्थिक साहाय्यतेस नकार दिला होता. पण, जेव्हा इमरान खान यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर मदतीसाठी सौदीकडे टाहो फोडला, जेव्हा आर्थिक संकट पाकच्या वेशीवर आ वासून उभे होते, तेव्हा सौदीने मदत करण्याची तयारी तर दाखविली, पण त्यासाठीच्या अटी आणि नियमांची पूर्तता करणे मात्र पाकिस्तानसाठी कदापि सोपे नव्हते.

 

परंतु, आता साहजिकच हा प्रश्न उपस्थित होतो की, मग गेल्या काही काळात असे नेमके काय घडले की, सौदी अरब पाकिस्तानवर अचानक इतका मेहरबान होऊन त्यांना मदत करायला पुढे सरसावला? पण, या परिस्थितीतही पाकिस्तानचे मंत्रिगण हेच सांगत सुटले की, सौदी अरबने पाकला केलेली मदत ही बिनशर्त आहे. परंतु, पाकिस्तानचा हा दावा व्यावहारिक पातळीवर स्वीकार्ह वाटत नाही. यापूर्वी माध्यमांच्या हवाल्याने जी माहिती समोर आली, त्यात असे सांगितले गेले की, आर्थिक साहाय्यतेच्या मोबदल्यात सौदी अरबने पाकिस्तानसमोर काही अटी ठेवल्या आहेत. ज्यामध्ये सर्वात प्रमुख अट होती ती सौदीने येमेनमध्ये चालवलेल्या लष्करी अभियानाला पाकिस्तानने मदत करण्याची. उल्लेखनीय बाब म्हणजे, २०१५ साली सौदी अरबच्या नेतृत्वात गठित केलेल्या ‘इस्लामिक नाटोसंघटनेचे सैन्य प्रमुख म्हणून पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांची निवड करण्यात आली होती. त्याचबरोबर इराणनजीकच्या पाकिस्तानी सीमाभागात सौदीचा त्यांच्या संपूर्ण अधिकार क्षेत्राखाली दोन मोठ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी करण्याचाही मानस होता. परंतु, पाकिस्तान सौदीच्या वरील दोन्ही अटींबाबत काहीसा साशंकच होता. कारण, त्यामुळे पाकिस्तानच्या इराणसोबतच्या संबंधांवर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि ते पाकिस्तानसाठी धोक्याचेही ठरले असते. म्हणूनच मग पाकिस्तानने सौदीचा नाद सोडून इतर मदत करू शकतील, अशा देशांसमोर, आंतरराष्ट्रीय संघटनांसमोर पदर पसरवायला सुरुवात केली. या दरम्यान, तुर्कीच्या सौदी दूतावासात सौदीच्या राजघराण्याविरोधात परखड लेखन करणारे आणि सौदी युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या डोळ्यांत खुपणार्‍या पत्रकार जमाल खाशोगी यांची दि. २ ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. पत्रकाराच्या या हत्येचा जागतिक मानवाधिकार संघटना तसेच इतर देशांनीही कडाडून विरोध दर्शविला. इतकेच नाही, तर मोहम्मद बिन सलमान यांच्यातर्फे सौदी अरबमध्ये परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी आयोजितदावोस इन डेजर्टनामक कार्यक्रमावरही अनेक देशांच्या गुंतवणुकदारांनी बहिष्कार टाकला. त्याचबरोबर सौदीअंतर्गतही राजघराण्याविरोधात दबावही हळूहळू वाढू लागला.

 

गेल्या अनेक दशकांच्या उदाहरणांवरून हे पुरेसे स्पष्ट आहे की, इस्लामिक देशांपैकी पाकिस्तानची सैन्यशक्ती ही सर्वाधिक बलाढ्य असून सौदी अरब आणि विशेषत: राजघराण्याचा पाकिस्तान नेहमी संरक्षक राहिला आहे. सौदी अरबमध्ये राजे सलमान यांच्या राज्यारोहणानंतर सौदी सेना आणि नॅशनल गार्डसमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार करण्यात आली, ज्याचा उद्देश राजपरिवाराची सुरक्षा आणि स्थिरता अबाधित ठेवणे, हाच होता. सध्या सौदी राजघराणेआणि त्यांच्या विरोधकांमध्ये मोठ्या प्रमाणात राजनैतिक आणि सामरिक समीकरणे आकार घेत आहेत. अशावेळी राजे सलमान आणि युवराज मोहम्मद बिन सलमान आपल्या राजसत्तेच्या संरक्षणासाठी पाकिस्तानला कदाचित सर्वाधिक उपयुक्त समजतात. गेल्या कित्येक वर्षांमध्ये पाकिस्तानी सैन्याने विविध प्रसंगी सौदी अरबच्या महत्त्वपूर्ण अभियानांमध्ये सक्रिय भूमिका निभावली आहे. १९७९ साली जेव्हा मक्का स्थित ‘ग्रँड मॉस्क्यू’ला अतिरेक्यांनी ताब्यात घेतले होते, तेव्हा पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीला पाचारण करण्यात आले होते. तसेच इराक-इराण युद्धादरम्यानही मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी सैन्याची सौदी अरबमध्ये उपस्थिती होती. २०१५ सालीही येमेनवरील लष्करी कारवाईत पाकिस्तानने आपली नौसेना मदतीसाठी पाठवली होती. २०१८च्या प्रारंभीपासूनच पाकिस्तानी सैन्याची एक तुकडी सौदी अरबमध्ये तळ ठोकून आहे. का तर, म्हणे सौदी अरबच्या सैन्याला प्रशिक्षण आणि सैनिकी सल्ले देण्यासाठी. पत्रकार जमाल खाशोगीच्या हत्येनंतर, तर पाकिस्तानी सैन्याकडून अशा प्रकारच्या सैनिकी मदतीच्या सौदीकडूनच्या अपेक्षाही वाढल्या आहेत.

 

 
 

पाकिस्तानतर्फे दिल्या जाणार्‍या या लष्करी साहाय्यतेला आगामी काळातही सुरळीत ठेवण्यासाठी सौदी अरबचीही परतफेडीची जबाबदारी बनतेच. परिणामी, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानला मदत करण्याचा सौदी अरबने निर्णय घेतलेला दिसतो. खरं तर सौदीकडून मदत घेणं हे पाकिस्तानसाठी तसं काही नवीन नाहीच. पाकिस्तानला गेली कित्येक वर्षे सौदीकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे, खासकरून १९८०च्या अफगाणिस्तानातील मुजाहिद्दीन युद्धानंतर पाकला सौदीकडून मिळणार्‍या आर्थिक मदतीतही वाढ करण्यात आली. आर्थिक मदतीबरोबरच पाकिस्तानात वहाबी विचारसरणीच्या प्रचार-प्रसारार्थ सौदी पेट्रो डॉलर्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. त्याअंतर्गतच मदरशांच्या, मशिदींच्या उभारणीसाठी भरघोस आर्थिक मदत करण्यात आली. त्याचबरोबर वेळोवेळी पाकिस्तानच्या डगमगणार्‍या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठीही सौदी अरबकडून वेळोवेळी अनुदानरुपीमदतही पाकिस्तानला करण्यात आली.

 

अशाप्रकारे एकीकडे सौदी अरबने आपले हित आणि स्वार्थ साधत पाकिस्तानप्रती मनाचा मोठेपणा दाखवत त्याची योग्य ती परतफेडही केली, असे म्हणावे लागेल. सध्या सौदीचे राजघराणे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही पातळीवर अनेक गहन समस्यांच्या गर्तेत अडकले असताना पाकिस्तानला त्यांच्या इच्छेनुसार मदत करत त्यांची सदिच्छा पदरी पाडण्याचा सौदीचा हा प्रयत्न आहे. परंतु, प्रत्येक क्षणी परिस्थिती बदलत आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोहम्मद बिन सलमान आणि सौदी राजघराण्याला खाशोगी हत्येप्रकरणी क्लीनचीट दिल्यानंतर आता हे प्रकरण अंधारात कुठे तरी हरवून जाण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे सौदीदात्यांवर आता कुठल्याही प्रकारच्या नैतिक जबाबदारीचा दबाव नसेल आणि परिणामी पाकिस्तानला आतापर्यंत मिळालेल्या सौदीच्या दयेची, सौहार्दाची वागणूक कुठे तरी चुकल्यासारखी वाटल्यास आश्चर्य वाटायला नको.

 
- संतोष कुमार वर्मा  
 

(अनुवाद : विजय कुलकर्णी)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@