जातपंचायत बरखास्त करणारी ‘दुर्गा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2018
Total Views |


 

वैदू समाजाच्या जातपंचायतीतील अनिष्ट रुढींविरोधात लढा उभारून ती पंचायत दुर्गा गुडिलूने बरखास्त केली. महाराष्ट्रात बरखास्त झालेल्या या पहिल्या जातपंचायतीची ही ‘दुर्गा’ नामक प्रेरणा...


वैदू समाजात जातपंचायतीच्या माध्यमातून मुलींच्या लग्नाचा निर्णय घेतला जात होता. पाळण्यात, लहान वयातच मुलींची लग्ने लावून दिली जात होती. अशाप्रकारे बालविवाह करणे गुन्हा असल्याची पुसटशी जाणीवही वैदू समाजात नव्हती. पंचांच्या मक्तेदारीपुढे या मुलींचे काहीएक म्हणणे ऐकून घेतले जात नव्हते. जातपंचायतीच्या माध्यमातून अशा अनेक प्रकरणांमध्ये मुलींचे हक्क व अधिकार डावलणारे निर्णय सातत्याने देण्यात आले. २०१३ साली दुर्गा गुडिलू या मुलीच्या कुटुंबीयांना वाळीत टाकण्यात आले. कारण काय, तर तिची मोठी बहीण गोविंदी हिचे तत्कालीन प्रथेप्रमाणे चक्क गर्भातच लग्न ठरले होते. तिच्या आईने चार पंचांसमोर जर मुलगी असेल, तर ती भावाच्या मुलाशी लग्न करेल, असे वचन दिले होते. ज्या मुलाशी लग्न ठरले होते, त्याने सातवीतच शाळा सोडली. त्याला दारूचेही व्यसन होते. असे असताना गोविंदी या वैदू समाजातील पहिल्या उच्चशिक्षित मुलीशी तिचे लग्न लावून देण्यात येणार होते. परंतु, गोविंदीने या लग्नाला कडाडून विरोध केला आणि प्रकरण थेट जातपंचायतीकडे गेले. जातपंचायतीने हे लग्न वैध ठरविले. मात्र, हा निर्णय मान्य नसल्याने संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले. यावेळी गोविंदी आणि तिच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीर उभी राहिली ती तिची लहान बहीण दुर्गा गुडिलू. तिने थेट जातपंचायतीच्या निर्णयाला आव्हान दिले. मग काय, जातपंचायतीनेही दुर्गाच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला. परंतु, दुर्गाने जातपंचायतीद्वारे ठरविण्यात आलेली दंडाची रक्कम कुवतीच्या बाहेरची असल्याचे सांगत तो भरण्यास स्पष्ट नकार दिला.

 

जातपंचायतीत दुर्गाचा एक मित्र हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्यासाठी पुढे आला. पण, त्यालाही समाजातील लोकांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याला एका खोलीत कोंडून ठेवले. दुर्गाने तत्काळ १०० क्रमांकावर फोन करून पोलिसांना बोलविले आणि मित्राची सुटका केली. तसेच पंचांनाही अटक करण्यात आली. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पुढे दोन महिने दुर्गाला पोलीस संरक्षण देण्यात आले होते. २० ते २५ पोलीस तिच्या घराबाहेर बसलेले असायचे. दुर्गाने या अनिष्ठ रूढींविरुद्ध लढत एक आंदोलन उभे केले. काही महिन्यांनंतर समाजातील लोकांनी तिची माफीही मागितली. समाजाची परिषद घेऊन वैदू समाजाची जातपंचायत बरखास्त करण्यात आली. ही महाराष्ट्रात बरखास्त करण्यात आलेली पहिली जातपंचायत ठरली. या तिच्या कामाची दखल म्हणजे, अवघ्या १४व्या वर्षी ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक सामाजिक परिषदेमध्ये तिने प्रतिनिधीत्व करत भटक्या- विमुक्त समाजातील मुलांच्या समस्या मांडल्या. आज ‘स्वयं संघर्ष सामाजिक संस्था’ या संस्थेची ती अध्यक्ष आहे. सुई, बिब्बा, कंगवा यांसारख्या वस्तू विकून जीवन जगणाऱ्या महिलांना एकत्र करत तिने १८ बचतगट स्थापून ‘कुटुंबाकरिता बचत व त्यातून उत्कर्ष’ असा सबलीकरणाचा मार्ग दाखवत स्त्री सक्षमीकरणाचा एक आदर्श उभा केला आहे.

 

अनिष्ट रूढी-परंपरांचे ओझे वाहणाऱ्या वैदू समाजाने जातपंचायतीला झुगारून देत ‘वैदू विकास समिती’ची स्थापना केली. या समितीच्या माध्यमातून गावकुसाबाहेर ठेवण्यात आलेल्या महिलांना त्यांच्या हक्क व अधिकाराविषयी माहिती देण्यात आली. मुंबईसारख्या शहरातील बालविवाहाच्या अनिष्ट जोखडात अडकलेल्या १३ मुलींनी पुढाकार घेऊन हे विवाह मान्य नाहीत, असे निर्भयपणे सांगितले. सर्वेक्षण केले असता, १७६ कुटुंबांना बहिष्कृत करण्यात आले होते. त्यांना समाजात प्रांताधिकाऱ्यांमार्फत पुन्हा समाजात घेण्यात आले. मे महिन्यात समाजाची जत्रा असते. त्या जत्रेत सर्वांनी बोकड कापणे सक्तीचे असते. जर बोकड कापले नाही, तर त्या कुटुंबाला दुप्पट-तिप्पट पैसे द्यावे लागायचे. काही कुटुंबे अशी होती की, त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांना सावकाराकडून कर्ज काढून खर्च करावा लागत होता. तो खर्च आणि त्याचे व्याज असे तीस ते चाळीस हजार खर्च करावे लागत होते. परिणामी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, कुटुंबीयांसाठी त्यांच्याकडे पैसे राहत नव्हते. पण, जातपंचायतीपुढे बोलायची कोणाची हिंमत नव्हती. दुर्गाने जत्रेत बोकड कापण्यास नकार दिला. त्यामुळे अनेक गरीब कुटुंबांनी जत्रेत बोकड कापण्यास नकार दिला. त्यांना हा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरता आला. तसेच हक्क व अधिकारांविषयी आत्मभान आलेल्या मुलींना समुपदेशन, कायदेशीर मदत देण्यासाठी ‘स्वाधार’ या संस्थेने पुढाकार घेतला आहे.

 

व्यसनाच्या आहारी गेलेल्या, वयाने अधिक असलेल्या, वैचारिक मतभेद असलेल्या जोडीदारासोबत नांदण्यास या मुलींनी नकार दिला आहे. वैदू विकास समितीच्या माध्यमातून या मुलींना न्याय मिळवून देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दुर्गा गुडिलू सांगतात की, “पंचांची दहशत असल्यामुळे वर्षोनुवर्ष या मुलींनी बालविवाहाच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध आवाज उठवला नाही. आता मात्र त्यांना जर हे नाते नको असेल, तर त्या मोकळेपणाने त्याविषयी पुढे येऊन बोलू लागल्या आहेत.” त्यामुळे वैदू समाजातील या दुर्गेप्रमाणे अशा बुरसटलेल्या प्रथा-परंपरांना थारा देणाऱ्या समाज आणि जातपंचायतींमध्ये अशाच दुर्गांची आज गरज आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवताना कितीही दु:ख-कष्ट सोसावे लागले तरी शेवटी विजय हा सत्य आणि व्यक्तिस्वातंत्र्याचाच होतो, हेच खरे.

 

- नितीन जगताप

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@