अ‍ॅवॉर्डवापसी गँगचे पुनरागमन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
‘आर्टिस्ट युनाईट’ नावाने अ‍ॅवॉर्डवापसी गँग पुन्हा सक्रिय होत आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर राहुल गांधींच्या वरातीत नाचायला हे दुटप्पी लोक तयार झाले आहेत.
 

पावसाळा येण्याची नुसती चाहूल लागली तरी पहिल्यांदा आनंद होतो तो बेडकांना. पावसाळा यायचा अवकाश की, ही मंडळी डराव डराव करून आसमंत डोक्यावर घेतात. पाच राज्यांतल्या निवडणुकीचे जे काही निकाल आले ते भाजपवर प्रेम करणाऱ्या आणि भाजपच्या माध्यमातून काही चांगले घडू शकते, यावर विश्वास असणाऱ्यांसाठी धक्का देणारी गोष्ट होती. मात्र, त्याचबरोबर एका मोठ्या वर्गासाठी ती आनंदवार्ताही होती. स्वत:ला ‘बिगरराजकीय’ म्हणवत काँग्रेसची चापलूसी करणाऱ्यांचा एक मोठा वर्ग आपल्या देशात आहे. वस्तुत: कुठल्याही राज्याची निवडणूक ही स्वतंत्रच असते. ज्या मताधिक्याने भाजप या राज्यात मागे पडली आहे, ते पाहिले तर याला ‘दारूण पराभव’ वगैरे म्हणता येणार नाही. मात्र, आता लोकसभेचे निकालही असेच लागतील, असे मानणाऱ्यांचा एक मोठा वर्ग निर्माण झाला आहे. यात काही मोदीद्वेष्टे पत्रकार आहेत, स्वत:ला ‘अभिव्यक्तिवाले’ म्हणविणारे लोक आहेत आणि विद्यापीठातून अध्यापनापेक्षा नसते उद्योग करण्यासाठी आपल्याला पगार मिळतो, असा समज असलेले लोकही आहेत. हा सगळा तपशील पुन्हा उगाळायचे कारण म्हणजे ‘आर्टिस्ट युनाईट’ नावाने दिल्लीतून आता एक मोहीम सुरू होणार आहे. देशभरातील सुमारे ४५० कलाकारांनी यात आपला सहभाग नोंदविण्याचे ठरविले आहे. या देशातील लोकशाही संकटात असल्याचा दावा करणारी ही मंडळी आहेत. यात ‘पुरस्कारवापसी गँग’ आहे. ल्युटंट दिल्लीतल्या ओल्या पार्ट्यांपासून वंचित राहिलेले कलाकार आहेत. आपल्या चित्रापेक्षा वादांमुळेच अधिक गाजणारे चित्रकार आहेत. असा हा सगळा गोतावळा आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी वाजतगाजत राहुल गांधींच्या वरातीत नाचायला तयार झाला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत या मंडळींनी फेब्रुवारी महिन्यात संमेलनाचे आयोजन केले आहे. त्याचा पाठपुरावा म्हणून देशातल्या सर्वच महानगरात मग हा कार्यक्रम रेटला जाईल. अशोक वाजपेयी, मल्लिका साराभाई, अरुंधती रॉय, चित्रा पालेकर वगैरे मंडळी या सगळ्याच्या प्रमुखपदी असतील. डाव्या विचारांनी प्रेरित असलेली ही मंडळी आहेत, हे वेगळे सांगायला नको. लोकशाही सुरक्षित नसल्याचा कांगावा करणारी ही सगळी मंडळी किती दांभिक आहेत, हे त्यांच्या टायमिंगवरून कळतेच. कारण, जो काळ त्यांनी निवडला आहे तो मुळातच या देशात निवडणुकांचे वारे वाहण्याचा आहे. लोकशाही वाचवायची भाषा करणारे हे लोक देशातील बहुसंख्य नागरिकांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या पंतप्रधानांचा किती द्वेष करतात, हे उघड आहे. अभिव्यक्तिवाल्या मंडळींनी नक्षल्यांच्या हिंसेचे समर्थन केले तरी ते चालते. काश्मीरमधील फुटीरवाद्यांनी चालविलेल्या हिंसक कारवाया यांच्या लेखी योग्य असतात. अरुंधती रॉय वगैरे मंडळींनी या विषयात जे काही तारे तोडले आहेत, ते वाचले तर यांच्या अभिव्यक्तीचे रक्षण व्हावे म्हणून सीमेवर लढणाऱ्या जवानांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित होतो.

 

लोकशाहीप्रधान समाजव्यवस्थेमध्ये कला, संस्कृती, साहित्य या सगळ्याच घटकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकशाही मार्गाने निवडून आलेली मंडळी मग ती कुठल्याही पक्षाची अथवा विचारसरणीची असोत, ती कायदे करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करू शकतात. मात्र, कायद्याचे पालन करण्यासाठी शांततेने राहण्यासाठी जी मूल्ये आत्मसात करावी लागतात, त्या मूल्यांची निर्मिती साहित्य व कलेच्या माध्यमातून होते. ही मूल्ये शाश्वत राहावी, यासाठी त्याचा पुन्हा पुन्हा पुनरुच्चारही कला माध्यमातूनच होतो. कलाकार नेतृत्व करू शकतात, परिवर्तन घडवून आणू शकतात आणि समाजाला चेतवूही शकतात. सिनेमासारख्या आधुनिक माध्यमातून पुढे आलेल्या कलाकारांनी काँग्रेसची मक्तेदारी मोडून काढून दक्षिणेतल्या राज्यात मारलेली मुसंडी आजही अनेकांसाठी कुतूहल, अभ्यास आणि कौतुकाचा विषय आहे. भारतावर झालेल्या चिनी आक्रमणाच्यावेळी चित्रकार मुळगावकरांनी सैनिकांच्या पार्श्वभूमीवर तांडव करणाऱ्या शिवाची चित्रे साकारली होती. अनेकांना आजही त्या चित्राचे स्मरण होते. संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या युरोपमध्ये ज्या ज्ञानशाखा निर्माण झाल्या, त्यांच्या मुळाशी सर्जनशील व्यक्तिमत्त्वेच आहेत. कला, साहित्य यांचा बहर असलेला हा काळ पुढे ‘युरोपियन रेनेसान्स’ म्हणून ओळखला जातो.

 

आता मुद्दा येतो आपल्याकडल्या ढोंग्यांचा. विचारांनी डावी असलेली ही मंडळी सध्या सरकारात असलेल्या मंडळींना ‘अश्मयुगीन’ वगैरे मानतात. कारण, धर्माबाबतच्या यांच्या कल्पना विचारवंतांनी ज्यांच्याशी संघर्ष केला त्या धर्माबाबतच्याच आहेत. भारतीय विचारपरंपरा एकसुरी नसून त्यांचे सपाटीकरण करण्याचा आरोप या ढोंग्यांकडून केला जात आहे. वस्तुत: या विचारात कुठल्याही प्रकारचे दुमत असण्याचे कारण नाही. ज्यांना समाजवादी विचारांच्या ठोकळ्यात हा देश बसवायचा आहे, त्यांना अशा विकृत कल्पना सुचू शकतात. ‘मॉब लिंचिंग’च्या नावाखाली आता पुन्हा शिळ्या कढीला पुन्हा ऊत आणण्याचे काम सुरू आहे. कलाकरांनी याविषयी अभिव्यक्त झालेच पाहिजे. हत्या किंवा हिंसा मग ती वैचारिक असो किंवा वास्तवातील, त्याला लोकशाही व्यवस्थेत स्थान नाही. देशभरात ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या, त्या त्या ठिकाणी सरकारने कठोर कारवाया करण्याचे धोरणच अवलंबले आहे. मात्र, या देशातल्या अत्यंत नृशंस हत्याकांडाबाबतचा निकाल कालच आला आहे. शिखांच्या हत्येबाबत काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. साक्ष देणाऱ्या शीख महिलेचे शब्द ऐकले तर अंगावर काटा येतो. ज्या प्रकारे तिला आमिषे दाखविली गेली, ती ऐकली तर घृणा यायला लागते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांचे झालेले शिरकाण, गांधीहत्येनंतर ब्राह्मणांची जाळण्यात आलेली घरे हेदेखील ‘मॉब लिंचिंग’चेच प्रकार होते. मात्र, आजतागायत त्यावर अभिव्यक्तीवाल्या कुणीही फारसे बोललेले ऐकिवात नाही. भालजी पेंढारकरांसारख्या चित्रपट महर्षीचा स्टुडिओे कोल्हापुरात जाळला गेला होता. ज्यांनी शिखांचे शिरकाण केले, त्यांना आता शिक्षा होत आहे. कारण, इतकी वर्षे या गुन्हेगारांना काँग्रेसने केवळ सुरक्षा पुरविली नाही, तर त्यांना विविध राजकीय पदांनी अलंकृतदेखील करून ठेवले. याबाबत अभिव्यक्तीवाले एक चकार शब्दही काढणार नाहीत. सगळ्यांच्या स्वप्नात एक भारत आहे, कलाकारांच्याही आहे. कलामांसारख्या वैज्ञानिकाच्या मनातही एक भारत होता. जोपर्यंत अशी दुटप्पी भूमिका बाळगणारी कलाकार मंडळी आपल्या देशात असतील, तोपर्यंत हा स्वप्नातला भारत वास्तवात येऊ शकेल का, हा प्रश्नच आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@