मुख्यमंत्र्यांकडून डोंबिवली-तळोजा, मीरारोड ते वसई मेट्रोची घोषणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2018
Total Views |


 नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मेट्रो ५, मेट्रो ९ व सिडको योजनांचे उद्घाटन

 

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते कल्याणमध्ये मेट्रो मार्ग ५ (ठाणे-भिवंडी-कल्याण) आणि मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मिरा-भाईंदर पूर्व) या मार्गांचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. २०२५पर्यंत सद्यस्थितीतील मुंबई मेट्रोचे जाळे २७५ किलोमीटरचे असेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महत्वपूर्ण घोषणा केली. राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मागणीवरून डोंबिवली मार्गे तळोजा, मीरा-भाईंदर ते वसई या दोन नव्या मेट्रो मार्गांचा आराखडा त्वरीत सादर करून तो मंजूर करून घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून करत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केले. ते म्हणाले, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर ते संत तुकारामांपर्यंत आणि शाहू, फुले, आंबेडकर आदींसारख्या व्यक्तिमत्त्वांमुळे पावन झाली आहे. देशाच्या नकाशावर मुंबई आणि ठाणे या दोन शहरांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असल्याचे ते म्हणाले. मुंबई आणि ठाणेकरांचे हृदय आणि मन मोठे असून इथे य़ेणारा प्रत्येक जण हा इथला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सिडकोच्या महत्वकांशी योजनेच्या ९० हजार घरांच्या प्रकल्पाचेही भूमिपूजन व उद्घाटन केले. यावेळी सिडको लॉटरीतील पाच लाभार्थ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते गौरवण्यात आले. महाराष्ट्र सरकार घरकुल योजनांमध्ये अग्रेसर असल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले. गेल्या चार वर्षांत गृहकर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय वाढले असल्याचेही ते म्हणाले.

 

विरोधकांना आदर्श टोला

 

कॉंग्रेसच्या राज्यातील सरकारने आदर्श घोटाळा केला पण राज्यातील फडणवीस सरकारने विकासाचा आदर्श निर्माण केला असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर टोला लगावला. विकासावरून टीका करताना मोदी म्हणाले, इतक्या गतीने मेट्रो कामे आणि घरकुल योजनांची कामे गेल्या चार वर्षात झालेली नाहीत. कॉंग्रेसच्या सरकारला इतका विकास करण्यासाठी दोन पीढ्या व्हाव्या लागल्या असत्या, असा टोला त्यांनी लगावला.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 

 

 
@@AUTHORINFO_V1@@