अतिक्रमित जागेवरील मलबा मनपाने हटवला, आजही कारवाई

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2018
Total Views |

कोर्ट, अशोक टॉकीज परिसर आणि टॉवर चौकातील उचलली घाण

जळगाव : 
 
महापालिकेतर्फे शहरात तीन दिवसांपासून सुरु करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेतील निरूपयोगी मलबा रविवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटविला. शहरातील कोर्ट चौक, अशोक टॉकीज परिसर आणि टॉवर चौकातील घाण उचलण्यात येवून ती नेरीनाका शेजारील खुल्या दफनभूमीजवळ टाकण्यात आली.
 
 
महापालिकेतर्फे शहरातील पाच मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण निर्मूलन मोहीम गुरुवारपासून हाती घेण्यात आली. पहिल्या दिवशी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या सहा पथकांद्वारे पाच रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याला सुरुवात झाली.
 
 
तीन दिवसात कोर्ट चौकातील 31 तसेच तहसील कार्यालयाजवळील 25 अतिक्रमित दुकाने पाडून हे रस्ते मोकळे करण्यात आले. अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक एच. एम. खान यांच्यासह कर्मचार्‍यांनी ही मोहीम राबविली. तिसर्‍या दिवशी अशोक टॉकीज गल्लीतील अतिक्रमण काढण्यात आले. येथे सुमारे 56 दुकानांचे अतिक्रमण होते.
 
 
मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसांपासून शहरातील विविध रस्ते मोकळे करण्यात आले. त्यामुळे शहरातील रस्ते मोकळा श्वास घेत आहेत. ही कारवाई अशीच सुरु राहावी, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.
 
 
सुमारे 64 ट्रॉलीद्वारे संकलन
 
 
शहरात तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईत ठिकठिकाणी निरूपयोगी मलबा झाला होता. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी रविवारी काम सुरु होते. दरम्यान, अशोक टॉकीज परिरातून 45 तसेच टॉवर ते कोर्ट चौकातून 20 ट्रॉली मलबा उचलून घेण्यात आला.
 
 
महापालिका प्रशासनातर्फे शहरातील वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून शहरातील विविध भागात अतिक्रमणे काढण्यात येत आहेत. त्या ठिकाणचे साहित्य जेसीबीने ट्रॅक्टरमध्ये भरून ते नेरीनाका शेजारील खुल्या दफनभूमीजवळ टाकण्यात आले.
दुकानदारांना नोटीस
 
 
शहरातील सराफ बाजार, इस्लामपुरा, बोहरा गल्ली, रथ चौक या भागातील दुकानदारांना तीन- चार दिवसांपासून मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून नोटीस देण्यात आल्या आहेत. सोमवारी सकाळी अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरु होईल, असे अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक एच. एम. खान यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@