धमक्यांचा प्रकाश की अंधार?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
तुम्ही खेळ सुरू केला, आम्ही अंत करू,” अशी भाषा नुकतीच प्रकाश आंबेडकरांनी केली. प्रकाशबापू नेमक्या कोणत्या खेळाची गोष्ट करत आहेत? त्यांना नेमक्या कोणत्या खेळाचा अंत करायचा आहे? कोरेगाव-भिमा येथील आगामी जयस्तंभ अभिवादन दिनाआधी अशी चिथावणीखोर वक्तव्ये करुन राज्यातले वातावरण गढूळ करण्याचा तर प्रकाश आंबेडकरांचा मनसुबा नाही ना!
 

एका समाजाला दुसऱ्या समाजापुढे उभे करून स्वतःची पोळी भाजण्याची वृत्ती अंगी बाणवलेल्या प्रकाश आंबेडकरांनी नुकतीच सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना अटक करण्याची वल्गना केली. “लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू, भागवत यांनी एके-४७ बंदूक बाळगली होती. त्यासाठी १२ वर्षांची शिक्षा आहे, हे त्यांनी विसरू नये. हा खेळ तुम्ही सुरू केला होता, त्याचा अंत आम्ही करू,” अशा शब्दांत त्यांनी आपली भाजप व संघद्वेषाची मळमळ बाहेर काढली आणि सरसंघचालकांना बेड्या ठोकण्याची धमकी दिली. मागच्या एका वर्षाच्या काळात प्रकाश आंबेडकरांचे आणि धमक्यांचे जवळचे नाते निर्माण झाल्याचे आपण सर्वांनीच पाहिले. कोरेगाव-भीमा येथे उसळलेल्या जातीय दंगलीनंतर त्यांनी हेच आरोप-प्रत्यारोपांचे नि धमक्या-इशाऱ्यांचे सत्र सुरू केले. “आमची सत्ता आली की याला आत टाकू, त्याला गप्प करू,” अशी भाषा त्यांनी वापरली. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत सूत्रसंचालन करणाऱ्या पत्रकाराला अश्लील शब्दांचा वापर करत जाहीरपणे दिलेली धमकी हा तर मोठाच चर्चेचा विषय झाला होता. संभाजीराव भिडे यांना कारागृहात डांबण्याची वटवटही प्रकाश आंबेडकरांनी केली होती. अर्थात नंतर चौकशी आयोगासमोर हाती पुरावे नसल्याने गपगुमान बसण्याचा शहाणपणाही त्यांनी दाखवला. तोंडाला येईल ते बरळत सुटायचे, पण कस लावण्याची वेळ आली की माघार घ्यायची, हाच प्रकाश आंबेडकरांचा स्वभाव असल्याचे यातून स्पष्ट होते.

 

फाळणीची भळभळती जखम घेऊन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला. २६ जानेवारी, १९५० पासून देशात राज्यघटना लागू झाली. म्हणजेच त्या दिवसापासून देशात कायद्याचे राज्य अस्तित्वात आले. तेव्हापासून कोणत्याही व्यक्तीने कोणतीही बेकायदेशीर कृती केली की, त्याविरोधात तक्रार करण्याची, दाद मागण्याची व न्याय मिळवण्याची शाश्वती झाली. प्रकाश आंबेडकरांना कदाचित याची माहिती नसावी किंवा ते सोयीस्कररित्या ही गोष्ट विसरले असावेत. कोणाहीविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी सत्तेची आवश्यकता नाही, हे प्रकाश आंबेडकरांना माहिती नाही का? की सत्ता हस्तगत केल्यावर कायद्याची हवी तशी मोडतोड करून, कायद्याचा हवा तसा अर्थ काढून प्रकाश आंबेडकरांना कोणाहीविरुद्ध खोटे गुन्हे नोंदवायचे आहेत? कोणी गुन्हा केला असेलच, तर संबंधित व्यक्तीला आताही तुरुंगात जावेच लागेल की... त्यासाठी तुमची सत्ता कशाला यायला हवी? की सत्ता आल्यानंतर जनहिताची, लोककल्याणाची कामे करायची असतात, लोकांना रोजगार देणाऱ्या, उद्योगधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या, शेतकऱ्यां सन्मानाने शेती करण्यासाठी पुरक अशा योजना आखायच्या असतात, हे प्रकाश आंबेडकरांना ठाऊक नाही? प्रकाश आंबेडकरांच्या एकूणच रागरंगावरून तर असेच दिसते की, त्यांना सत्ता मिळवायचीय ती फक्त, आपल्या मनातला विखार शांत करण्यासाठी! आपणच आपल्या मनाने ठरवलेल्या शत्रूविरुद्ध द्वेषमूलक कारवाया करण्यासाठी! एकसंध समाजातील कोणाला तरी धडा शिकवण्यासाठी! तसेच करायचे असेल तर प्रकाश आंबेडकरांची सत्ता येऊन कोणाचे भले होणार? प्रकाश आंबेडकरांच्या मागे फिरणाऱ्यांनी तरी आपल्या सुखानंदाची खात्री का बाळगावी? कारण प्रकाश आंबेडकरांकडे विकासाचा कोणताही कार्यक्रम नाही. त्यांच्या प्रत्येक भाषणात, सभेत फक्त ‘भाजप हटाव’, ‘मोदी हटाव’, ‘संघ हटाव’च्याच घोषणा दिल्याचे आढळते. अशा विखाराने ओतप्रोत भरलेल्या माणसाच्या हाती सत्ता देणे म्हणजे, हात दाखवून अवलक्षण करण्यासारखेच!

 

प्रकाश आंबेडकर हे खरेतर बुद्धिमान आणि डॉ. बाबासाहेबांसारख्या प्रज्ञासूर्याचा वारसा लाभलेले व्यक्तिमत्त्व. पण आज त्यांची अवस्था आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवत नव्हे तर एमआयएमसारख्या धर्मांध पक्षाच्या मागे फरफटत जाण्याइतकी वाईट झाल्याचे दिसते. म्हणूनच ते सध्या ज्या कोणत्या व्यासपीठावर जातील तिथे ओवेसींच्याच तोंडचे शब्द बरळण्याची कृती करतात. “देशातील पोलीस १५ मिनिटांसाठी गायब करा, मग आम्ही हिंदूंना ताकद दाखवून देऊ,” असे वक्तव्य करणारे अकबरुद्दीन ओवेसी त्यांच्या दृष्टीने दोषी नसतात. ब्रिटिश सत्तेविरोधात ‘वंदे मातरम्’ ची घोषणा देऊन असंख्य देशभक्त फासावर लटकले, ते ‘वंदे मातरम्’ प्रकाश आंबेडकरांना नकोसे वाटते. आताची त्यांची “तुम्ही खेळ सुरू केला, आम्ही अंत करू,” ही भाषा ओवेसीसारख्यांच्या चिथावणीखोर भाषेशी साधर्म्य सांगणारीच नव्हे काय? प्रकाश आंबेडकर नेमक्या कोणत्या खेळाची गोष्ट करत आहेत? त्यांना नेमक्या कोणत्या खेळाचा अंत करायचा आहे? प्रकाश आंबेडकरांचे हे वक्तव्य नेमके कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी रोजी जयस्तंभाला अभिवादन करण्याला जवळपास १५-१६ दिवसांचा कालावधी राहिला असतानाच कसे समोर आले? या वक्तव्यातून आगामी काही दिवसांत राज्यातले वातावरण गढूळ करण्याचा तर प्रकाश आंबेडकरांचा मनसुबा नाही ना? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. प्रकाश आंबेडकर या प्रश्नांची उत्तरे देतील का?

 

विजयादशमीला शस्त्रपूजन करण्याची परंपरा इथला हिंदू समाज हजारो वर्षांपासून जपत आला. दसऱ्याच्या याच परंपरेला अनुसरून आजही सर्वत्र शस्त्रपूजन केले जाते. रा. स्व. संघदेखील आपल्या संस्कृती, अस्मितेचे प्रतीक असलेले शस्त्रपूजन करत असतो. पण प्रकाश आंबेडकरांनी देशाच्या याच प्रथा-परंपरांना नाकारण्याचा चंग बांधल्याचे दिसते. म्हणूनच त्यांनी मोहनजी भागवत यांच्याविरोधात तोंड उघडले, पण मोहरमच्या मिरवणुकीत आपल्याच मित्रपक्षाच्या आमदारांनी भररस्त्यात तलवार उगारल्याचे त्यांना दिसले नाही, त्याविरोधात बोलण्यासाठी त्यांची हिंमत झाली नाही. त्यामुळे सरसंघचालकांवर भलतेसलते आरोप करण्याआधी, अटकेच्या धमक्या देण्याआधी प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या पायाखाली काय जळतेय, तेही पाहावे. याआधी प्रकाश आंबेडकरांनी स्वतःला नक्षलवादी म्हणत नक्षलवाद्यांच्या समर्थनाची भूमिका घेतली होतीच. नक्षलवाद्यांनी देशाच्या कायदा-व्यवस्थेला आव्हान देत वंचित, वनवासी, अनुसूचित जाती-जमाती समाजाचा छळ केल्याची शेकडो उदाहरणे आहेत. तरीही या देश पोखरणाऱ्या विघातक शक्तींची तळी उचलण्याचे उद्योग प्रकाश आंबेडकरांनी केले. तेव्हा ते देशाच्या एकता-अखंडतेला चूड लावत नसतात का? की आपण घेतलेली ही भूमिका कायद्याच्या राज्यात खपून जाणारी असते? एखाद्या सभेला गर्दी जमली की, तिचे रूपांतर मतांच्या लाटेत होऊन आपण मुख्यमंत्रिपदी, पंतप्रधानपदी बसू अशी स्वप्ने प्रकाश आंबेडकरांना आणि त्यांच्या समर्थकांना पडत असतात. अशा सर्वांनी या प्रश्नांची उत्तरे नक्कीच द्यावीत. पण तोपर्यंत आघाडीसाठी काँग्रेसकडे आशाळभूतपणे पाहणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी स्वतःची उरली-सुरली मते जरी सांभाळली तरी बेहत्तर. कारण मत्सर, ईर्ष्या नि वितुष्टाचे राजकारण फार काळ चालत नाही, तर असले राजकारण करणाऱ्यांनाच जमिनीला पाय टेकवावे लागतात.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@