चीनच्या कला-कलाने.?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 


 
 
 
आता यापुढे नेपाळमध्ये फिरायला जाताना नेपाळच्या बॉर्डरवर भारतीय रुपयाचे नेपाळी रुपयांत परिवर्तन करणे बंधनकारक असणार आहे. पर्यटनाचा एक भाग असला तरी, नेपाळच्या या निर्णयामुळे भारत आणि नेपाळच्या सीमावर्ती शहरांना याचा फटका बसणार आहे.
 

नेपाळ हा भारताचा शेजारी देश, खरं तर अगदी सख्या भावासारखा. कारण अगदी प्राचीन काळापासून भारत आणि नेपाळ यांच्यात पौराणिक, सांस्कृतिक आणि भाषिक साम्य आहे. त्यामुळे एका आईची दोन पोरं असे काहीसे संबंध भारत आणि नेपाळचे आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या एका बैठकीत पाकिस्तानने भारत आणि नेपाळची ‘रोटी आणि बेटी’ अशी ओळख करून दिली होती. कारण भारताच्या स्वातंत्र्यानंतर जेव्हा १९५० साली भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले, त्याच वर्षी नेपाळसोबत एक मैत्री करार करण्यात आला. त्यामुळे या दोन देशांमधली ही मैत्री काहीशा अडचणी आणि इतर शेजाऱ्यांचा हस्तक्षेप वगळता सुरळीत चालली होती. पण दोन्ही देशातील या नात्याला नेपाळच्या एका निर्णयाने तडा गेला आहे. नेपाळच्या वतीने भारतीय चलनातील १०० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या सर्व नोटांवर नेपाळमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

 

१९५० च्या मैत्रीपूर्ण करारानुसार नेपाळी नागरिकांना भारतात आणि भारतीय नागरिकांना नेपाळमध्ये व्हिसाशिवाय कुठेही फिरण्याची आणि काम करण्याची मुभा आहे आणि अर्थातच आपल्या इथे कित्येक ठिकाणी आपण नेपाळी लोक काम करायला आलेले पाहतोच. एवढंच नाही तर, नेपाळचे आर्थिक चलन नेपाळी रुपया हे आहे. पण भारतीय रुपये हेदेखील सर्व छोट्यामोठ्या दुकानांत स्वीकारले जातात. मात्र, आता नेपाळने घेतलेल्या या निर्णयामुळे याचा फटका नेपाळच्या पर्यटनाबरोबरच भारत आणि नेपाळ यांच्या व्यावसायिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांवरही होणार आहेत. याचे खरंतर संकेत काही वर्षांपूर्वी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिले होते. संयुक्त राष्ट्राच्या एका बैठकीत त्यांनी मान्य केले होते की, नेपाळची चीनशी वाढत चाललेली जवळीक, जरी भारतासाठी चिंतेची बाब असली तरी शतकांपासून चालत आलेली भारत-नेपाळची ही मैत्री यात भरडली जातेय. असे असले तरी, या निर्णयात चीनचा हात नसल्याचे काही राजकीय तज्ज्ञांनी सांगितले असले तरी, नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळे सख्खा भाऊ वैरी झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी नेपाळच्या माहिती व तंत्रज्ञान मंत्र्यांनी या संबंधित विस्तृत माहिती देत, १०० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या भारतीय नोटा जवळ बाळगू नका किंवा व्यवहारासाठी वापरू नका, असे जाहीर केले. तर, १०० रुपयांच्या पुढच्या नोटांना कायदेशीर मान्यता नाही, असेही सांगितले आणि याउपर कोणत्याही भारतीय पर्यटकाकडे १०० रुपयांपेक्षा जास्त नोटा आढळल्यास त्याला शिक्षाही केली जाऊ शकते.

 
नोव्हेंबर २०१६ मध्ये भारताने ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, ५००, दोन हजार आणि दोनशे रुपयांच्या नव्या नोटा आणल्या. मात्र, नोटाबंदी जाहीर केल्यानंतर काही दिवसांतच भारतात ५०० आणि १ हजार रुपयाच्या बनावट नोटा सापडल्या होत्या. नेपाळमधूनच या नोटा भारतात आणल्या जात आहेत, असे तपासात उघडही झाले होते, त्यामुळे भारतीय नोटांवर नेपाळने बंदी घातली असल्याचे नेपाळच्या एक वृत्तपत्रातून सांगण्यात आले. तर नेपाळ सरकारने त्यांच्या २०२० साली साजरा केल्या जाणाऱ्या ‘व्हिजीट नेपाळ ईयर’च्या अनुषंगाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. ‘व्हिजीट नेपाळ ईयर’ अंतर्गत अंदाजे ५० कोटी लोक नेपाळमध्ये पर्यटनासाठी येतील, असा अंदाज बांधण्यात आला आहे, त्यामुळे त्या आधी ही नोटाबंदी करणे फायदेशीर आहे, असे नेपाळ सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता यापुढे नेपाळमध्ये फिरायला जाताना नेपाळच्या बॉर्डरवर भारतीय रुपयाचे नेपाळी रुपयांत परिवर्तन करणे बंधनकारक असणार आहे. पर्यटनाचा एक भाग असला तरी, नेपाळच्या या निर्णयामुळे भारत आणि नेपाळच्या सीमावर्ती शहरांना याचा फटका बसणार आहे. कारण, बिहारमधले किशनगंज, अररिया, सुपौल, मधुबनी, सीतामढी, पूर्व आणि पश्चिम चंपारण हे सात जिल्हे असे आहेत की, ज्यांचा नेपाळशी थेट व्यापारीक संबंध आहे. यामुळे नेपाळ ते बिहार अशी ट्रेन सेवाही चालूही करण्यात आली आहे. मात्र, या नोटाबंदीमुळे या व्यापारावर त्याचा परिणाम होणार आहे. या निर्णयामुळे इतर देशांतून नेपाळमध्ये येणाऱ्या पर्यटकांवर विशेष परिणाम होणार नसला तरी, या सख्या शेजाऱ्यांमध्ये काही प्रमाणात कटुता वाढण्याची शक्यता नाकारता येता नाही.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@