बंटी ठाकूरला तीन दिवस पोलीस कोठडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

वाघळी माध्यमिक विद्यालयातील प्रकरण

 
 
वाघळी, ता. चाळीसगाव :
 
येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनीस अश्लील चित्रफीत दाखविणारा शिक्षक तथा राष्ट्रवादीचा नगरसेवक बंटी उर्फ सूर्यकांत ठाकूर गेल्या 50 दिवसांपासून फरार होता.
 
 
मात्र, अटकपूर्व जामिनासाठी त्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम पर्याय होता. दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाने 11 डिसेंबर रोजी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
 
 
त्यामुळे त्याला पोलिसांना शरण येण्याशियाय दुसरा पर्याय नव्हता. बुधवारी रात्री तो पोलिसांच्या शरण आला. त्याला गुरुवारी पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात हजार केले असता, त्याला 15 डिसेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
 
 
या प्रकरणातील संशयित आरोपी दीड महिन्यांपासून फरार होता. अटकपूर्व जामिनासाठी त्याने प्रथम जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता, तोही फेटाळण्यात आला होता.
 
 
त्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, तो उच्च न्यायालयानेही फेटाळला होता.
 
 
त्यानंतर त्याने दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी 11 रोजी अर्ज केला होता. त्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने अर्ज फेटाळत ताशेरे ओढले होते. अटकपूर्वच काय? संशयित आरोपीला रेग्यूलरचा जामीनही देण्यात येऊ नये, अशी टिपणी न्यायाधीशांनी नोंदविली होती.
 
 
संशयित आरोपीचे अटकपूर्व जामिनाचे सर्व पर्याय संपल्याने त्याने बुधवारी रात्री पोलिसांपुढे शरणागती पत्करली. पोलिसांना शरण आल्यानंतर त्याने पोलिसांना पत्र दिले आहे.
 
 
त्यात पुन्हा मला राजकीय हेतूने गोवण्यात आल्याचे म्हटले आहे. मात्र, यापूर्वी औरंगाबाद खंडपीठाच्या सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणीत न्यायालयाने म्हटले होते की, कुठल्याही राजकीय हेतूसाठी कोणत्याही मुलींचा बाप अशी तक्रार करूच शकत नाही.
 
 
मात्र, स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी संशयित आरोपी राजकीय आधार घेत असल्याचे त्याने दिलेल्या पत्राच्या माध्यमातून दिसून येते.
 
 
माध्यमिक विद्यालयात वाघळी येथे घडलेल्या या प्रकाराने गावकर्‍यांमध्ये अद्यापही रोष कायम आहे. संबंधित संस्थाचालकांनी संशयित आरोपीवर गुन्हा दाखल झाल्यानंतरही तब्बल 50 दिवस पाठिशी घातले.
 
 
अटक होण्याची वाट संस्थाचालक पाहत होते. परिणामी गावकर्‍यांमधून संताप व्यक्त करण्यात आला होता. वाघळी माध्यमिक विद्यालयात घडलेल्या या प्रकारानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल महिन्याभरानंतर संस्थाचालकांनी त्याच्या निलंबनासाठी शिक्षणाधिकार्‍याकडे परवानगी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.
अ‍ॅड.अहिरराव यांचे सामाजिक भान
 
 
अ‍ॅड. योगेश अहिरराव यांनी सामाजिक भान जपत पिडीत मुलीची बाजू सर्वोच्च न्यायालयात मांडली. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यासाठी त्यांनी कुठलीही फि घेतली नाही.
 
 
 
संशयित आरोपीने अटकपूर्व जामीनसाठी दिल्लीच्या सर्वाच् न्यायालयात अर्ज केला होता. मुलीची बाजू अ‍ॅड.अहिरराव यांनी प्रभावी मांडत अटकपूर्व जामीन अर्ज रद्द करण्यासाठी बाजू मांडली.
 
पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवर्‍यात?
 
 
संस्थाचालकासह पोलिसांनी आरोपीला अभय दिल्याची चर्चा आहे. पोलिसांनी न्यायालयात संशयिताचा जामीन होऊ नये, यासाठी भूमिका वेळोवळी मांडली. मात्र, त्याला अटक करण्यात फारसे स्वारस्यही दाखविले नाही.
 
 
परिणामी या घटनेतील संशयित दीड महिना मोकाटच फिरत राहिला. त्याचे सर्व अटकपूर्व जामिनाचे पर्याय संपल्यानंतर तो पोलिसात स्वत:हून हजर झाला.
 
 
पोलिसांनी एवढे दिवस संशयिताला अटक न केल्याने पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक न करण्यामागे काय गौडबंगाल होते, याबाबत आता चर्चा होऊ लागली आहे.
 
 
संस्थाचाकांची दिरंगाई
 
 
वाघळी माध्यमिक विद्यालयात घडलेल्या या प्रकारानंतर संस्थाचालकांनी त्वरीत कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र संस्थाचालकांनी तब्बल महिनाभरानंतर संशयित आरोपी बंटी ठाकूरच्या निलंबनाचा प्रस्ताव केला. त्यांच्या निलंबनाची परवानगी शिक्षणाधिकार्‍यांकडे महिन्याभरानंतर मागविण्यात आली आहे.
@@AUTHORINFO_V1@@