नवी मुंबई, नागपूरमध्ये गुंतवणुकीच्या संधी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |


मुंबई : नवी मुंबईतील एकात्मिक औद्योगिक परिसरात तसेच नागपूरमधील लॉजिस्टिक पार्कमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच सिंगापूरच्या कंपन्यांच्या गुंतवणुकीसाठी या भागात पोषक वातावरण असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सिंगापूरचे मुंबईतील वाणिज्य दूत गॅविन चाय यांनी शिष्टमंडळासह शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

आर्थिक सहकार्य व गुंतवणूक या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्र सिंगापूर संयुक्त समितीमधील सहकार्य तसेच सिंगापूर व महाराष्ट्रातील संबंध वाढविण्याबद्दल यावेळी सकारात्मक चर्चा झाली. नागपूरचे भौगोलिक स्थान हे लॉजिस्टिक पार्कच्या दृष्टिने महत्त्वपूर्ण असून वस्तू व सेवा कर कायद्यामुळे या स्थानाला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच या भागात होणाऱ्या जेएनपीटीच्या सॅटेलाईट पोर्टमुळेही लॉजिस्टक क्षेत्राला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. तसेच सिंगापूरमधील लॉजिस्टक क्षेत्रातील कंपन्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामुळे पुढील काळात नवी मुंबई हे राज्याच्या विकासाचे प्रमुख ठिकाण होणार आहे. त्यामुळे येथेही मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. पुण्यामध्ये सिंगापूरमधील विविध कंपन्या आहेत. पुण्याच्या मास्टर प्लॅनमध्ये या कंपन्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

गेल्या काही वर्षात पायाभूत सेवांत बदल

गेल्या तीन ते चार वर्षात राज्यातील उद्योग तसेच पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. त्यामुळे सिंगापूरमधील विविध कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणुकीस उत्सुक असल्याचे मत गॅविन चाय यांनी व्यक्त केले. पुण्यात सुमारे ८० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक होणार असून, त्यातून सुमारे दोन हजार रोजगार निर्माण होणार आहेत. त्यासाठी सिंगापूरचे मंत्री महाराष्ट्रात येणार असून यावेळी विविध सामंजस्य करार होणार आहेत. त्यामध्ये गृह निर्माण विभागाबरोबरील कराराचा समावेश आहे. कौशल्य विकास व क्षमता विकासासाठी सिंगापूर शासन महाराष्ट्राबरोबर काम करण्यास इच्छुक असल्याचे ते म्हणाले.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@