हारजितची कारणे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 
 
 
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि हारल्या-जिंकल्याची कारणे सांगणे सुरू झाले. सर्वत्र भाजपाच्या पराभवाचीच चर्चा सुरू आहे. कॉंग्रेस जिंकल्याची चर्चा म्हणा किंवा विश्लेषण फार कमी दिसत आहे. बरोबरच आहे. आपण चर्चा किंवा विश्लेषण पराभूतांचेच करतो. क्रिकेटचेच बघा ना! भारताची चमू पराभूत झाल्यावर, प्रत्येक फलंदाजाच्या/गोलंदाजाच्या चुका शोधू लागतो. निवड समितीलाही दोष देतो. कर्णधाराच्या निर्णयांची समीक्षा होते. परंतु, हीच चमू जेव्हा सामना जिंकते, तेव्हा मात्र ती चमू एकदम सर्वोत्कृष्ट ठरते. भाजपाच्या पराभवाची जी कारणे प्रकर्षाने पुढे येत आहेत ती म्हणजे- शेतकर्यांची नाराजी, एससी/एसटी कायदा पुन्हा कडक करणे, मध्यमवर्गाची नाराजी, जीएसटी व नोटबंदीमुळे नाराज व्यापारीवर्ग (जो आधी भाजपाचा कट्टर समर्थक होता), शहरांची नावे बदलणे, हनुमानाची जात काढणे, राममंदिर निर्माणाबाबत मोदी सरकारची चालढकल, मतविभाजणी योग्यप्रकारे न होणे इत्यादी.
 
 
आपण म्हणतो, प्रत्येक निवडणुकीनंतर भारतीय मतदार प्रगल्भ होत जातो. प्रत्येक निवडणुकीनंतर भारतीय लोकशाही परिपक्व होत जाते. असे आहे तर मग, पराभवाची कारणे मात्र तीच ती का राहतात? गुजरातमध्ये मोदी जिंकले; कारण, सोनिया गांधींनी त्यांना ‘मौत का सौदागर’ म्हटले. मोदी जिंकले कारण मणिशंकर अय्यर यांनी त्यांना ‘नीच’ म्हटले. अशी कारणे सांगितली होती. मोदी सरकारने पेट्रोल/डिझेलच्या किमती कमी केल्या नाहीत, हेही कारण सांगितले जाते. खरेच का, हारजितची ही कारणे असतात?
उदाहरण म्हणून आपण शेतकर्यांची नाराजी हे कारण मध्यप्रदेशच्या संदर्भात घेऊ या. कारण तिथे मंदसौर जिल्ह्यात शेतकर्यांचे आंदोलन झाले होते आणि ते हिंसक झाल्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागला होता व त्यात सहा शेतकरी मरण पावले होते. साहजिकच तिथले वातावरण भाजपाच्या विरुद्ध तापलेले असणार. अशा या जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांचे काय निकाल लागले, ते बघणे उचित ठरेल. मंदसौर जिल्ह्यात मंदसौर (एससी राखीव), मल्हारगड, सुवरसा व गरोथ हे चार विधानसभा मतदारसंघ येतात. मंदसौर हा लोकसभेचाही मतदारसंघ आहे. त्यात मंदसौर जिल्ह्यातील हे चार मतदारसंघ, बाजूच्या रतलाम जिल्ह्यातील जावरा व नीमच जिल्ह्यातील मनसा, नीमच व जावद हे मतदारसंघ येतात.
 
 
मंदसौर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 1962 सालापासून लोकसभेच्या झालेल्या 14 निवडणुकांपैकी 10 वेळा भाजपा (पैकी तीन वेळा जनसंघ) उमेदवार निवडून आला आहे. तीन वेळा कॉंग्रेस आणि एक वेळा लोकदल. भाजपाचे लक्ष्मीनारायण पांडेय आठ वेळा निवडून आले आहेत. 2009 साली कॉंग्रेसच्या उमेदवार व राहुल गांधींच्या तरुण चमूतील मीनाक्षी नटराजन् विजयी झाल्या होत्या. आता 2018 च्या विधानसभा निवडणुकीत मंदसौर जिल्ह्यातील चारपैकी तीन जागी भाजपा व एक जागी कॉंग्रेस निवडून आली. लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर आठपैकी सात जागी भाजपा व एक जागी कॉंग्रेसचा विजय झाला आहे. खरेतर, शेतकर्यांचे आंदोलन जिथे उभे झाले (की आंतरराष्ट्रीय संघटनांच्या मदतीने उभे करण्यात आले?) त्या क्षेत्रात शेतकरी नाराज असतील, तर भाजपाचा सपाटून पराभव व्हायला हवा होता. परंतु तसे झाले नाही. या उदाहरणावरून शेतकरी नाराज आहे, म्हणून भाजपाचा पराभव झाला, असा निष्कर्ष काढायचा का? म्हणून पराभवाची प्रचलित कारणमीमांसा कुठेतरी कमी पडते, असे वाटते.
 
 
 
कुठल्याही पक्षाचे सरकार जनतेच्या सर्व मागण्या मान्य करू शकत नाही. एक मागणी पूर्ण केली की दुसरी तयार होते. मध्यमवर्गाची तर वेगळीच गोष्ट आहे. कुबेरालाही अर्थमंत्री केले तरी, तो या मध्यमवर्गाचे पूर्ण समाधान करू शकणार नाही! जो पक्ष सत्तेत असतो, त्याच्या विरोधात लोकांमध्ये असंतोष निर्माण होतोच. ही अगदी स्वाभाविक प्रक्रिया आहे. जितकी अधिक वर्षे सत्तेत, तितका अधिक असंतोष. यालाच अॅण्टि इन्कम्बन्सी असे म्हणतात. मध्यप्रदेशात तर गेली 15 वर्षे भाजपाचे सरकार होते. त्यामुळे भाजपा सरकारविरुद्ध किती असंतोष असला पाहिजे? असे असतानाही, शिवराजिंसह चौहान यांच्या नेतृत्वातील भाजपाने कॉंग्रेसच्या 113 जागांच्या तुलनेत 109 जागा जिंकून दाखविल्या आहेत. हे कसे झाले, याचाही विचार झाला पाहिजे.
 
माझ्यामते सत्तारूढ पक्षाची कामगिरी, त्या पक्षाचे संघटन आणि नेते व मंत्र्यांची जनतेशी वागणूक या तीन घटकांवर निवडणुकीतील जय-पराजय ठरत असावा. नरेंद्र मोदी आले, त्यांनी सभा घेतल्या आणि वातावरण बदलले व त्यामुळे भाजपा जिंकली. असे एक कारण सांगितले जाते. हे कितपत खरे असेल? भारतीय मतदार इतका अस्थिर असतो का की, एक सभा होते आणि तो हेलकावा खातो! असे असेल तर, या निवडणुकीत नरेंद्र मोदी, राहुल गांधी, योगी आदित्यनाथ यांच्या जिथे सभा झाल्यात, तिथे काय निकाल लागला ते पाहिले पाहिजे. साधारणत: अर्धे-अर्धे प्रमाण येईल. पक्षसंघटन केवळ कागदावर न राहता, कार्यकर्त्यांचा नागरिकांशी थेट जिवंत संपर्क असेल, तर ही प्रस्थापितविरोधी लाट यशस्वीपणे थोपवून धरता येते, असे काही जणांचे मत आहे. सरकारची कामगिरी व जनतेशी नाडी जुळलेले पक्षसंघटन या दोन गोष्टी असतील, तर मग इतर कारणे तितकीशी महत्त्वाची राहात नाहीत. मध्यप्रदेशात या दोन बाजू बर्यापैकी असतील म्हणून तिथे भाजपा 109 जागांपर्यंत मजल मारू शकली, असा काहींचा निष्कर्ष आहे.
 
आजकाल एका नव्याच कारणाची खूप चर्चा सुरू आहे व ती म्हणजे नोटा (नन ऑफ द अबोव्ह). एकही उमेदवार पसंत नाही म्हणून मतदार नोटाची बटन दाबतो. कुठल्याही निवडणुकीतील प्रत्येक मतदारसंघाची सविस्तर मतदान-आकडेवारी पाहिली तर, पराभवासाठी नोटा कारणीभूत असेल असे वाटत नाही. नोटाचा फटका दोन्ही पक्षांनाही बसू शकतो. मंदसौर लोकसभा मतदारसंघात जावरा विधानसभा मतदारसंघात भाजपाचा 511 मतांनी विजय झाला. तिथे ‘नोटा’ची मते 1510 आहेत. गरोथ येथील विजयी कॉंग्रेस उमेदवार फक्त 350 मतांनी निवडून आला आहे. तिथे ‘नोटा’ची मते 2976 आहेत. असेच कमीअधिक चित्र आपल्याला सर्वत्र दिसेल. दुसरे म्हणजे, जय-पराजयाच्या कारणांबाबत जनतेची मते ठरविण्यात मीडियाचा फार मोठा भाग असतो. आपण सर्व मीडियाच्या प्रभावात वाहत जाऊन स्वत:ची मते निश्चित करत असतो. त्या त्या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे, हे आपल्याला माहीत नसते आणि तरीही आपण आपल्याला भावली ती कारणे तावातावाने मांडत असतो. कुठलीही निवडणूक घ्या, मीडियात कधीच पक्षसंघटनेची चर्चा करणार नाही. मीडिया कुठलीही निवडणूक व्यक्तिकेंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो. निवडणुकीत कुठले मुद्दे असावेत, हे मीडियाच ठरवत असल्याचे चर्चेतून तरी दिसून येते. मीडियाच्या या प्रभावापासून आपण दूर राहायला हवे. नरेंद्र मोदींच्या प्रचाराच्या भाषणात, विकासाची किती व कोणती कामे केलीत हे ते सविस्तर सांगत असतात. मीडिया ते दाखवत नाही. त्यातील निवडक काही वाक्ये दाखवून त्यावर घनघोर चर्चा घडवून आणतात. मोदी आले, त्यांनी सभा घेतल्या आणि त्यामुळे वातावरण बदलून गेले, असा प्रचार सतत करण्यात येतो. पराभव होवो अथवा विजय, दोघांनाही मोदींनाच जबाबदार ठरविण्यात येते. सोनिया किंवा राहुलच्या बाबतीत मात्र असा प्रकार घडत नाही. असे वाटते की, पक्षसंघटना महत्त्वाची नाही, एक व्यक्तीच महत्त्वाची आहे, हे मीडियाला लोकमानसात बिंबवायचे. भाजपा सोडली तर, बाकी सर्व पक्ष व्यक्तिकेंद्रित आहेत. ही खंत या मीडियावाल्यांना आहे की काय असे वाटते. कारण, त्यांचा प्रयत्न भाजपाच्या संघटनेला महत्त्व न देता, एका व्यक्तीलाच देण्याचा असतो. भाजपाही इतर पक्षांसारखीच आहे, असे दाखविण्याचा असतो, असे वाटते. म्हणजे, राजहंस बदकासारखा दिसत नाही म्हणून तो कुरूप असल्याचा भ्रम पसरविण्यासारखा हा प्रकार आहे. भाजपा कार्यकर्ते, हितिंचतक यांनी यापासून सावध राहण्याची गरज आहे.
@@AUTHORINFO_V1@@