आता ‘एमएमआरडीए’ चालवणार मोनोरेल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |



मुंबई : मोनोच्या दुसऱ्या टप्प्याकरिता आवश्यक असलेल्या मोनो गाड्या आणण्यास होणारा विलंब आणि मोनोरेल प्रकल्पाच्या अपूर्ण कामामुळे ‘एमएमआरडीए’ने मोनोचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘स्कोमी’चे कंत्राट रद्द केल्याची घोषणा केली आहे. एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी आज पत्रकार परीषदेत ही माहिती दिली. एमएमआरडीएने एलटीएसईला ७ वेळा मुदतवाढ देऊनही होणाऱ्या हलगर्जीपणामुळे हे कंत्राट रद्द करण्यात आले आहे.

 

मोनोकडे दुर्लक्ष केल्याबद्दल डिपॉझिट का जप्त केले जाऊ नये, अशी विचारणा एलटीएसईला करण्यात आली होती. एलटीएसईने या नोटिशीला उत्तर दिले नव्हते. प्रकल्पाच्या कामासाठी एमएमआरडीएकडून निधी मिळत नसल्याने कामात अडथळा येत आहे, असे एलटीएसईने म्हटले आहे. मात्र, मोनो प्रकल्पासाठी एलटीएसईला २०१५ मध्ये ६७ कोटी रुपये आणि फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०१७ दरम्यान १६.३४ कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

 

भारतातील पहिल्या मोनो प्रकल्पाचा चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा लोकांच्या सेवेत आहे. मात्र, वडाळा ते सातरस्ता या दुसऱ्या टप्प्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या मिळवूनही या मार्गिकेवरील सेवा अजूनही ‘एमएमआरडीए’ला कार्यान्वित करता आलेली नाही. ‘स्कोमी’ने या मार्गासाठी आवश्यक असणाऱ्या मोनो गाड्या न आणल्याने ही सेवा खंडित होती. सध्या प्रशासनाकडे १० मोनो गाडय़ा असून त्यापैकी ६ गाड्या पहिल्या टप्प्यात चालविल्या जातात.

 

दुसऱ्या टप्प्यातील सेवा सुरू करण्यासाठी प्रशासनाला आणखी ५ गाडय़ांची आवश्यकता आहे. या गाडय़ा जानेवारी महिन्यापर्यंत सेवेत दाखल करण्याची सूचना ‘एमएमआरडीए’ने नोटीस देऊन ‘स्कोमी’ला केली होती. मात्र, नव्या गाडय़ा दाखल करण्यासंदर्भात त्यांच्याकडून कोणत्याच हालचाली सुरू नसल्याने त्यांना प्रकल्पामधून बाहेर काढत कंत्राट रद्द केल्याचे आर.ए. राजीव म्हणाले. शिवाय गाडय़ा न आणल्यास त्यांची बँकेमध्ये असलेली हमी रक्कम जप्त केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@