राज्याचे माजी मुख्य सचिव बोंगीरवार यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |


 


मुंबई : राज्याचे माजी मुख्य सचिव अरूण बोंगीरवार यांचे शुक्रवारी निधन झाले. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बोंगीरवार यांनी सरकारच्या निरनिराळ्या खात्यांमध्ये सेवा बजावली होती. अरुण बोंगीरवार हे मुळचे विदर्भातील यवतमाळमधले होते. त्यांच्या पश्चात मुलगी दीप्ती, गार्गी आणि मुलगा पीयूष असा परिवार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांचे ते सासरे होते.

 

अरूण बोंगीरवार १९६६च्या आयएएस बॅचचे अधिकारी होते. प्रशासनात विविध पदांवर काम करत आपल्या कार्याचा ठसा उमटवितानाच १९९९ मध्ये राज्याचे २५ वे मुख्यसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले होते. तत्कालिन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी यांचे सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. एमएसएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक असताना त्यांनी मराठवाड्यातील अनेक उद्योजक आणि लघुद्योगांना प्रोत्साहन दिले. यापैकी अनेक उद्योग आजघडीला राज्यातील उद्योग क्षेत्रात आघाडीवर आहेत. जेएनपीटीचे अध्यक्ष असताना त्यांनी तेथे पहिल्यावहिल्या खासगी सागरी टर्मिनलची उभारणी केली. महाराष्ट्राच्या प्रशासनात माजी मुख्य सचिव अरूण बोंगीरवार यांचे महत्वाचे योगदान असून राज्य विकासाच्या प्रक्रियेत त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने राज्य विकासाची तळमळ असलेला एक कुशल प्रशासक गमावला आहे.” असे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

 

राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगिरवार यांच्या निधनाने एक द्रष्टा आणि कुशल प्रशासक आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणाले की, “श्री. अरुण बोंगिरवार यांना प्रशासकीय यंत्रणा व कार्यपद्धतीची अचूक जाण होती. या यंत्रणेचे खंबीरपणे नेतृत्त्व करतानाच तिचे लोकांप्रती असलेले उत्तरदायित्त्वही अधिकाधिक वाढावे यासाठी त्यांची धडपड होती. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळावर मात करण्यासाठी सुक्ष्म सिंचन प्रकल्पांसाठी त्यांचे प्रयत्न मोलाचे होते. राज्यात स्वतंत्र जलसंधारण विभागाच्या निर्मितीसाठीही त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला आहे. प्रशासकीय सुधारणांसोबतच राज्याच्या प्रशासनातला मराठी टक्का वाढावा यासाठीच्या त्यांच्या सुचना फलदायी ठरल्या आहेत. निवृत्तीनंतरही ते सामाजिक बांधिलकीपोटी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सक्रिय होते.”

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@