अर्थव्यवहार : परवडणारी घरे बांधण्याच्या व्यवसायात रेमंड उतरणार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |
 
 
 

 

वस्त्रोद्योग क्षेत्रातील नामांकित कंपनी रेमंड आता परवडणारी घरे बांधण्याच्या व्यवसायात उतरणार आहे! कंपनीची ठाणे येथे भरपूर जमीन असून तिच्यावर स्वस्त घरे बांधण्याची योजना आहे.
 
 
 या कंपनीची स्थापना 1925 मध्ये झालेली असून ती लोकरीच्या तंतूंपासून सुमारे 3 कोटी मीटर सूटिंग व शर्टिंग कापड तसेच ब्लँकेट वगैरे तयार करीत असते. या कंपनीचे स्वत:चे रेमंड, पार्क अ‍ॅव्हेन्यू, रेमंड प्रिमियम अ‍ॅपरेल, पार्क अ‍ॅव्हेन्यू वूमेन कलर प्लस आणि पार्क्स असे अनेक ब्रॅण्ड आहेत.
हे सर्व ब्रॅण्ड ‘द रेमंड शॉप’या शीर्षकाखालील संपूर्ण देशभरातील 200 शहरांमधील सुमारे 700 रिटेल दुकानांच्या साखळीद्वारे विक्रीसाठी उपलब्ध असतात.
 
 
त्यांचा स्वयंचलित वाहन विभागही असून त्याला चांगली किंमत आल्यास तो विकण्याचीही त्यांची तयारी आहे. ग्राहक व्यवहार (एफएमसीजी) क्षेत्रातील कारभार वाढविण्यावरही कंपनीचा भर आहे.
 
 
तसेच शेअर्सची किंमत वाढविण्याचाही त्यांचा प्रयत्न राहणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रातही प्रवेश करण्याचा त्यांचा विचार त्यांनी सखोल विचारांती रद्द केलेला आहे.
 
 
कंपनीचा अमेरिका व ब्रिटनमध्ये वेगाने व्यवसाय वाढत असून चीनशी स्पर्धा करण्याच्या बाबतीत कंपनीचे म्हणणे आहे की चीनचा माल आता महाग झालेला आहे.
 
 
त्यामुळे भारतीय मालाला मोठी मागणी येत आहे. कंपनीने इथिओपियामध्ये कारखाना सुरु केलेला आहे. मध्यपूर्वेतही शोरुम उघडलेल्या आहेत. सध्या अमेरिकेतील रिटेल ब्रॅण्डसाठी मालाचे उत्पादन कंपनी करीत आहे.
 
  
अशी ही दर्जेदार कंपनी आता गृहनिर्माण क्षेत्रात प्रवेश करु इच्छित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या 2022 पर्यंत सर्वांना परवडणारी घरे बांधण्याच्या योजनेनुसार अशी घरे निर्माण करणार्‍यांना उत्तेजन दिले जाणार आहे.
 
 
 
भारतीय रोखे विनिमय मंडळा(सेबी)च्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार म्युच्युअल फंडांना डेरिवेटिव्ह व्यवहारांसाठी परवानगी देण्याचा समावेश आहे.
 
 
 
आतापर्यंत आपण पेट्रोल व डिझेल या द्रव इंधनांवर चालणारी स्वयंचलित वाहने वापरीत आलेलो आहोत. आता एक मोटारगाडी (कार) अशी बनविण्यात आली आहे की जी चक्क पाण्यावर चालू शकते! रुरकी येथील आयआयटीच्या माजी विद्यार्थ्यांनी ही पाणी व अ‍ॅल्युमिनियम यांच्यावर चालणारी ही कार तयार केली आहे.
 
 
तिच्यामध्ये बसविलेली बॅटरी पाणी आणि अ‍ॅल्युमिनियम यांच्यातील रासायनिक क्रियेतून उर्जा निर्माण करीत असते. या उर्जेवरच ही कार चालते.
 
 
या कारमधून एका वेळी एक हजार किलोमीटरपर्यंत प्रवास करता येतो. प्रत्येक 300 किमी अंतरावर तिची बॅटरी व 1000 किमीवर अ‍ॅल्युमिनियम बदलावे लागते. विशेष म्हणजे ही कार इलेक्ट्रिक गाड्यांप्रमाणे चार्ज करण्याची गरज नाही.
 
 
 
ही बॅटरी चालू ठेवण्याचा खर्च प्रति किमीमागे 5 रुपये एवढा आहे. ही बॅटरी अगदी मजबूत असून तिला जागाही खूप लागते. या कारचे संशोधक स्वयंचलित वाहन कंपन्यांशी बोलून ती बाजारात आणण्याच्याही तयारीत आहेत.
 
  
तात्काळ पासपोर्ट बनविण्यासाठी आता आधार कार्डाची गरज राहणार नाही. विदेश मंत्रालयाकडून पासपोर्ट नियमात बदल केले जात असून त्यावर कायदा मंत्रालयाची मंजुरीही मिळविली आहे.
 
 
नवे नियम लवकरच अधिसूचित केले जाणार आहेत. नव्या नियमांनुसार पासपोर्ट तयार करण्यासाठी फक्त वाहन चालविण्याचा परवाना(ड्रायव्हिंग लायसन्स) व मतदार ओळखपत्र (व्होटर आयडी कार्ड) लागणार आहे. त्यामुळे आधारकार्डाविना पासपोर्ट मिळू शकणार आहे.
 
 
आता दूध कुठल्याही प्रकारे खराब झाले तर त्याची जबाबदारी ते पुरविणार्‍या कंपनीचीच राहणार आहे. एफएसएसएआयने दूधाच्या दर्जाशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही याची खबरदारी डेअरी कंपन्यांची असल्याचे बजावले आहे.
 
 
सरकारने पॅकबंद दूध विकणार्‍या कंपन्यांना आपल्या दूधाच्या दर्जात सुधारणा करण्यास सांगितले आहे. यादृष्टिने कंपन्यांनी आपली दर्जानियंत्रक(क्वालिटी कंट्रोल) यंत्रणा अद्ययावत ठेवण्याचे निर्देशही या अन्ननियंत्रकाने दिले आहेत.
 
 
तसेच या कंपन्यांनी गवळी व शेतकर्‍यांसह काम करावे आणि गवळ्यांकडून दूध विकत घेतेवेळी त्याच्या दर्जाकडे लक्ष देण्यावर भरही एफएसएसएआयने दिलेला आहे.
बँक निफ्टीच्या एक्स्पायरी दिनीही शेअर बाजारात तेजी, निर्देशांकांत वाढ
 
 
गुरुवारी बँक निफ्टीच्या एक्स्पायरी दिनीही शेअर बाजारात तेजी कायम राहिली. त्याच्या दोन्ही महत्वाच्या निर्देशांकातही लक्षणीय वाढ झाली. मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेंसेक्स) व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) हे आज सकाळी अनुक्रमे 35 हजार 929 बिंदू व 10 हजार 810 बिंदूंवर उघडून दिवसभरातील व्यवहारात 36 हजार 95 बिंदू व 10 हजार 752 बिंदूंच्या उच्च आणि 35 हजार 794 बिंदू व 10 हजार 838 बिंदूच्या निम्न पातळीवर जाऊन आल्यानंतर अनुक्रमे तब्बल 150 बिंदू व 53 बिंदूंनी वाढून 35 हजार 929 बिंदू व 10 हजार 791बिंदूंवर बंद झाले. बँक निफ्टीही 172 बिंदूंनी वधारुन 26 हजार 816 बिंदूंवर बंद झाला. इकडे भारतीय रुपया 34 पैशांनी वाढून प्रति डॉलरमागे 71 रुपये 67 पैसे इतका वाढला होता.
@@AUTHORINFO_V1@@