नैसर्गिक चित्रांकनाची 'पाटीलकी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |


भारतीय चित्रकला ही अत्यंत प्राचीन असून वात्सायनाने चित्रकलेच्या षडांगांची माहिती दिलेली आहे. कुठलीही कलाकृती सौंदर्याभिरुचिपूर्ण तेव्हाच बनते, जेव्हा वात्सायनाने वर्णिलेली षडांगे त्या कलाकृतीत असतातच. रूपभेद, प्रमाण, भाव, लावण्य योजनम्, सादृश्यं आणि वर्णिका भंग ही सहा अंगे एकाच कलाकृतीत जेव्हा अंतभूर्त होतात, तेव्हा ती कलाकृती समृद्ध होते. स्मृतिप्रवण ठरते आणि रसिकमनाचा ठाव घेते.

 

ज्येष्ठ चित्रकार मारुती पाटील यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन जहांगिर कलादालनाच्या तिसर्‍या गॅलरीत सुरू आहे. निसर्गातील घटकांचं सौंदर्य शोधत त्याला आपल्या नजरेतून बघण्याचा मारुती पाटील यांचा आगळावेगळा कलाप्रवास अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या कलाकृतीबद्दल सार्थ विश्वास, प्रेम आणि जिव्हाळा बाळगणारे पाटील सर कलारसिक म्हणून मान्य ठरले आहेत. कॅन्व्हासचा पोत, रंगलेपनातील कौशल्य, रंगसाहित्य जसे गोल ब्रश वा फ्लॅट ब्रश, नाईफ किंवा आणखी समांतर साहित्य यांचा रंगांबरोबर सुसंवाद साधण्याचं सुवर्णमध्यस्थाचं काम चित्रकार करीत असतो. जेव्हा हा रंगसंवाद सुदृढ आणि नितळ-निरागस होतो, तेव्हा ती कलाकृती सुंदर दिसते. एकदा ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते कलाकृतीबद्दल बोलताना म्हणाले होते की,“एखादे चित्र वा कलाकृती आपल्याला का आवडते, तर ती कलाकृती आपल्याबरोबर सुसंवाद साधत असते, आपल्याकडे ती पाहत असते. म्हणून ती आपल्याला आवडत असणे अगदी साहजिक आहे.”

 

चित्रकार मारुती पाटील यांची प्रत्येक प्रदर्शित कलाकृती ही सौंदर्याचं कोंदण ल्यायलेली असते, म्हणून तिच्याकडे अगदी एकटक पाहत राहावेसे वाटते. मग एखादे रानफुलांचे गवत असो की, निसर्गाचा जादुई चमत्कार दाखवून सजलेले जलाशय असो. एका निसर्गचित्रात तर त्या पाण्यातील ओलेपण इतके हुबेहूब टिपलेले आहे की, वर्णनास शब्द अपुरे पडतात. कला अध्यापनात ३५ वर्षे रममाण झालेले पाटील सर यांनी कलाध्ययनाबरोबरच स्वत:ची चित्रनिमिर्ती सातत्याने राखली. त्यामुळे त्यांच्या चित्रणातील घटक हे दैनंदिनीतील घटकच बनले. मानवाकृती, प्राणी, निसर्गातील झाडे, पाने, फुले, फळे, पक्षी . हे त्यांचे चित्र विषय ठराविक जरी असले तरी, त्यात वैविध्य आहे. प्रत्यक्ष चित्रणातील निसर्ग आणि मानवाकृती यांची अभ्यासचित्रे साकारताना पेन्सिल, रंगीत पेन्सिल, पेन, पेस्टल, जलरंग अशा अनेक रंगमाध्यामांचा तैलरंगांच्या वापराबरोबरच सुसंवाद साधण्याचे कसब हे मारुती पाटील यांच्या कलाकृतींमध्ये स्पष्टपणे दिसते

 

अभिनव कला महाविद्यालयातून प्राचार्यपदावरून निवृत्त झाल्यावर पाच वर्षे ते डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्ट या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून कार्यरत होते. कला अध्यापकाची नोकरीआणि व्यावसायिक कला कार्य करताना त्यांच्या पत्नी नीला पाटील यांच्या लाखमोलाच्या साथीचा उल्लेख ते आवर्जून करतात. ११ डिसेंबरपासून सुरु झालेले हे प्रदर्शन १७ डिसेंबरपर्यंत सकाळील ११ ते संध्याकाळी या वेळेत सुरु राहणार आहे.

 - प्रा. गजानन शेपाळ 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@