जळगावच्या अमेय देशमुखला आंतरराष्ट्रीय सायन्स ऑलिम्पियाडमध्ये ‘सुवर्णपदक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Dec-2018
Total Views |

 
जळगाव : 
 
 
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातर्फे आंतरराष्ट्रीय ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाडसाठी गेलेल्या चमूमधील जळगाव येथील अमेय प्रशांत देशमुख याने सुवर्णपदक प्राप्त करून देशाची मान उंचावली आहे.
 
 
बोस्तवाना देशातील गॅबरोन येथे 2 ते 10 डिसेंबर दरम्यान यावर्षीच्या ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते. त्यात 50 देशातील 15 वर्षाखालील विज्ञान शाखेतील अत्यंत बुध्दिमान विद्यार्थी सहभागी झाले होते.
 
 
त्यात भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी गुणवत्तेच्या निकषावर देशभरातून केवळ 6 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात अमेय देशमुख हा एक होता.
 
 
त्याच्या या निवडीने जळगावचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले. या संधीचे सोने करीत अमेयने या ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावत भल्याभल्यांना अचंबित केले.
 
 
या चमूमध्ये अमेहसह धनंजय रमण (नवी दिल्ली), मोहित गुप्ता (कोटा), नमणसिंग राणा (कोटा) आणि वैभव राज इशापोरे (कोलकत्ता) यांनीदेखील सुवर्णपदक मिळविले तर बरूण परुअ (कोटा) रौप्यपदकाचा मानकरी ठरला.
 
 
या स्पर्धेत जगभरातील चीनच्या सहाही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदकाची कमाई केल्याने चीन प्रथम तर भारताने दुसरे स्थान पटकावले. भारतीय चमूने सहापैकी 5 सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक मिळवले.
 
 
जगभरातील सुमारे 300 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यापैकी केवळ 24 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके मिळाली. भारतीय चमूतील या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा 22 डिसेंबर रोजी होमीभाभा रिसर्च सेंटर, मानखुर्द, मुंबई येथे भारत सरकारतर्फे सन्मान करण्यात येणार आहे.
 
 
अमेय देशमुख हा जळगावातील डॉ.प्रशांत देशमुख व डॉ. कीर्ती देशमुख यांचा मुलगा आहे. अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखल्या जाणार्‍या अमेयच्या या देदिप्यमान यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
प्रज्ञावंत अमेय
शालेय जीवनापासूनच आपल्या बुध्दीची चमक दाखविण्यार्‍या अमेयने चौथीत आणि आठवीत असतांना शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता.
 
त्याचप्रमाणे सहावी आणि नववनीत होमी भाभा परीक्षेत तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला होता. तसेच बुध्दिमत्ता परीक्षेतही देशभरातील सर्वश्रेष्ठ 10 विद्यार्थ्यांमध्ये तो एक होता.
 
 
सिल्व्हर झोन सायन्स ऑलिम्पियाडमध्ये तो अ.भा.स्तरावर दुसरा आला आहे. तो आता लवकरच ‘नासा’मध्ये भेट देणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@