कुर्ला भूखंड प्रकरण - शिवसेनेवर भूखंड खरेदी करण्याचा प्रस्ताव मांडण्याची नामुष्की

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |

 

मुंबई : कुर्ल्यातील आरक्षित भूखंडप्रकरण शिवसेनेवर शेकल्यानंतर आता हा भूखंड खरेदी करण्याबाबतचा प्रस्ताव पुन्हा सभागृहात मांडून शिवसेनेने यू टर्न घेतला आहे. मात्र याप्रकरणी सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी तयारीने आलेल्या विरोधकांचा हिरमोड झाला. चर्चा करू देता प्रस्ताव मांडून सत्ताधार्यांनी कुरघोडी केल्याने संतापलेल्या विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत सभागृह दणाणून सोडले.

 

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नगरसेवक माजी सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी कुर्ला येथील उद्यानासाठी आरक्षित असलेला भूखंड खरेदी करण्याबाबतच्या प्रस्तावावर सभागृहात उपसूचना मांडली. या उपसूचनेला विरोधी पक्षाने तीव्र विरोध केला. मात्र बहुमताच्या जोरावर शिवसेनेने ही उपसूचना मंजूर करून घेतली होती. त्यामुळे या विरोधात आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाने शिवसेनेला कोंडीत पकडत उपसूचना मांडणारे बाळा नर सुधार समिती अध्यक्ष दिलीप लांडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. भूखंड खरेदी करण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजूर झाला असताना सभागृहात मात्र शिवसेनेचे नगरसेवक बाळा नर यांनी भूखंड खरेदी करू नये, अशी उपसूचना मांडल्याने नर लांडे टीकेचे लक्ष्य बनले होते. विरोधकांनी लांडे यांनी राजीनामा द्यावा, ही मागणी लावून धरली. गुरुवारी सभागृहात सुधार समिती दिलीप लांडे यांनी राजीनामा द्यावा, याचे फलक झळकवत जोरदार घोषणाबाजी केली. सभागृहातले वातावरण त्यामुळे चांगलेच तापले होते. सभागृहनेत्या विशाखा राऊत प्रस्ताव पुन्हा सभागृहात मांडण्यासाठी उभ्या राहिल्या. त्यांनी उपसूचना मांडताच यावर चर्चा होऊ द्या, असे म्हणत विरोधकही उभे राहिले. मात्र महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी विरोधकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून प्रस्ताव चर्चेविना मंजूर केला.

 

विरोधकांकडून राजकारण

 

कुर्ला येथील भूखंड हरितक्षेत्र म्हणून आरक्षित होता. त्या भागात मोठ्या प्रमाणावर झोपड्या होत्या परंतु येथे आरक्षण असल्यामुळे या भागाचा पुनर्विकास होत नव्हता. नगरसेवक दिलीप लांडे यांच्या सूचनेनुसार २०१७ मध्ये येथील आरक्षण उठविण्यात आले होते.त्यावेळी त्याला विरोधी पक्षनेता रविराजा यांनी पाठिंबा दिला होता. परंतु आता ते राजकारण करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुंबईतील मोकळी ठिकाणे कायम राहावीत, ही शिवसेनेची भूमिका असून त्यानुसार हा प्रस्ताव पुन्हा मांडून मंजूर करण्यात आला आहे.

 

- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@