आजीचे अंत्यदर्शन नाही...अंत्यसंस्कारालाही सुटी नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2018
Total Views |

अखेर तुरुंगातच केले 3 दिवस उपोषण : कुर्‍ह्याचे निष्ठावंत संघ कार्यकर्ते पुरणमल चौधरी यांचा लढावू बाणा

 
जळगाव : 
 
आणीबाणीच्या काळात अनेक कर्त्या पुरुषांना अनेक महिने कारागृहात डांबण्यात आले. त्या घरांची कशी परवड झाली, आजीच्या अंत्यसंस्काराला येता आले नाही...याचा संतापजनक अनुभव कुर्‍हा येथील संघ, जनसंघाचे जुनेजाणते ज्येष्ठ कार्यकर्ते पुरणमल नारायण चौधरी यांनी आणि त्यांच्या आप्तजनांना आला.
 
ते येथील माजी सरपंच, जिल्हा परिषदेचे 1995 ते 2000 या कालावधीत सदस्य आणि वर्षभर उपाध्यक्षपद भूषवणारे रा.स्व.संघ परिवारातील ज्येष्ठ कार्यकर्ते.
 
आजी धनीबाईच्या अंत्यदर्शन वा अंत्यसंस्कारासाठीही त्यांना सुटी (पॅरोल) मिळाली नाही...न्यायतत्त्वानुसार सुटीसाठी त्यांनी नाशिक कारागृहात 3 दिवस उपोषणही केले.
 
नंतर सुटी मिळालीही, जेलरने ‘लेखी माफी’ मागा, सुटका होईल, असे सुचविले...पण निष्ठावंत, तरण्याबांड पुरणमल यांनी नकार दिला.
 
जूून 1975 मध्ये इंदिरा गांधींनी स्वत:चे पंतप्रधानपद वाचविण्यासाठी राज्यघटना, त्यातील सप्तस्वातंत्र्य, लोकशाहीतील मानवी जीवनमूल्य पायदळी तुडवली.
 
सेवाभावी कार्यकर्त्यांच्या बलाढ्य संघटनेवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली. संघस्वयंसेवक व तत्कालीन जनसंघासह सर्वच विरोधी पक्षनेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांना अनिश्चित काळासाठी डांबले होते, त्यात होते पुरणमल.
 
कुर्‍हा ही त्यांची जन्म आणि कर्मभूमीही... जन्म 2 एप्रिल 1939 चा. त्यावेळेच्या शिक्षणाच्या अभावाच्या स्थितीत त्यांचे शिक्षण त्यावेळेच्या नववीपर्यंत झालेले आहे.
 
कुर्‍हा येथे अवघ्या चौथीपर्यंत आणि पुढे 20 किलोमीटरवरील मलकापूरला जावे लागले...तेव्हा खामखेडा पूल नव्हता...काही वेळेस पूर्णा नदीतून भोपळ्याच्या साह्याने पोहत शाळा गाठावी लागायची.
 
परिस्थिती अर्थातच विपरित होती, तरीही त्यांना समाजकारण आणि राजकारणाची आवड होती. भारतीय जनसंघाच्या ध्येयधोरणाने ते प्रभावित आणि सक्रियही झाले.
 
अवघ्या तिशीत 9.9.1968 ला त्यांचा उत्साह, तळमळ आणि लोकसंग्रहाच्या जोरावर त्यांनी आपले जनसंघाचे पॅनल बहुमताने निवडून आणले आणि सरपंचपद सध्याच्या हिशोबाने दीर्घकाळ 10 वर्ष भूषविले. जनसंघाने सत्ता मिळवलेली जिल्ह्यातील ही पहिली ग्रामपंचायत.
 
 
साहजिकच त्यांची परिसरात, सामाजिक, राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली. त्यांचा अनेक आंदोलने, सत्याग्रहात व जनसंघ आणि संघकार्यात लढाऊ सहभाग कायम राहिला.
 
संघप्रचारकांचे येणेजाणे असे. पुढे 26 जून 1975 ला आणीबाणी जारी झाली. काही दिवस धरपकड झाली. दुसर्‍या टप्प्यातील अटकसत्रात 17 डिसेंबर 1975 ला रात्री त्यांना राहत्या घरून पोलिसांनी अटक केली.
 
 
रात्री मुक्ताईनगरला आणि दुसर्‍या दिवशी जळगावला ठेवले. नंतर नाशिक कारागृहात रवानगी झाली. तेव्हा घरात आई जामुनीबाई, पत्नी कमलाबाई आणि मुलं सुनील, ओमप्रकाश, प्रदीप हे लहान होते.
 
 
अटकेचे घरच्यांना वा आप्त-मित्रपरिवाराला विशेष वाटले नाही. कारण त्यांचे जीवलग सहकारी कार्यकर्ते कमलकिशोरजी गोयनका आणि 1978 च्या विधानसभा निवडणुकीत प्रतिभाताई पाटील यांच्या तोंडाला फेस आणणारे खंदे कार्यकर्ते अशोक फडके यांना आधीच मिसाखाली अटक झालेली होती.
 
 
पुढे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सफाया झाला अन् संंघावरची बंदी रद्द झाली. 21 मार्च 77 ला सुटका झाली. रेल्वेने भुसावळला व तेथून बसने कुर्‍हा येथे सायंकाळी पुरणमलजी, त्यांच्यासमवेत गोयनका, अशोकराव फडके, दगडू महिपत राठोड, जगदेव शंकर सुरळकर हे बंदीजन पोहोचले.
 
 
तेव्हा संपर्क यंत्रणा जेमतेम, साधे फोनही नव्हते. पण जुलमी सत्ता उखडून फेकल्याचा जनतेला इतका अत्यानंद झाला होता की, कानोकानी ही वार्ता आधीच पसरत परिसरातून हजारो लोक आले.
 
 
प्रचंड मिरवणूक निघाली, मध्यरात्रीपर्यंत गावभर फिरली.एका अर्थाने ते मंतरलेले दिवस 4 दशकं उलटली तरीही अजूनही त्यांच्या मनात सतत रुंजी घालताहेत.
(पुरणमल लक्ष्मीनारायण चौधरी, 94239-76703)
लेखी माफीची जेलरची सूचना ठोकरली....
 
 
घराचे कर्ते पुरणमलजी कारावासात असताना घरात अस्वस्थता होती. घरच्यांची भेट होत असे...ते सोबत नाश्ता, आवडीचे खाद्यपदार्थ आणि विशेष म्हणजे पुरणमलजींच्या आवडीची विड्याची पाने आणत.
 
बहुतेकांना ती आवडत...मग कारागृहातील दुकानातून चुना, काथा, लवंग, वेलदोडा इ.आणले जात असे. मध्यंतरी आजी धनीबाईं सूरजमल चौधरी यांचे निधन झाले.
 
 
पण पॅरोल मिळाला नाही...म्हणून त्यांनी कारागृहात 3 दिवस उपोषण केले. अखेर महिन्याने पॅरोल मिळाला...जेलरने लेखी ‘माफी’ लिहून द्या, सुटका होईल, असे सांगितले. पण निष्ठावंत, रणझुंजार पुरणमल यांनी ही सूचना ठोकरली.
 
देशासाठीचे कर्तव्य पार पाडा...
 
 
मातृभूमीचे ऋण माना, सर्वांनीच देशासाठी यथाशक्ती कर्तव्य पार पाडा, असे त्यांचे आवाहन आहे. आणीबाणीत घरापासून दूर राहावे लागले, परिवाराला खूप सोसावे लागले.
 
 
पुन्हा असे होऊ नये...पण मानवी व लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आलीच तर तोही करु, अशी त्यांची भूमिका आहे. मुलांपैकी सुनील हे संघाचे द्वितीय वर्ष शिक्षित.
 
 
तिघेही शेती, कृषी सेवा केंद्र पाहतात. ओमप्रकाश हे 1997 ते 2002 असे 5 वर्ष सरपंच होते. त्यांच्या पत्नी हेमलता या ग्रा.पं.सदस्या आहेत. नातू विवेक प्रदीप हे सिव्हिल इंजिनिअर, त्यांची जिनमाता कन्स्ट्रक्शन ही फर्म ख्यातनाम आहे.
 
 
माणुसकी शिकलो...
 
 
कारागृहात त्यांचा दिनक्रम असा होता....सकाळी 5 ला उठणे, व्यायाम, संघशाखा, वाचन, दुपारी मान्यवरांची बौद्धिके, सायंकाळी संघशाखा असा दिनक्रम असे. घरची आठवण कुणाला येऊ नये, यासाठी मन रमण्याकरिता दिवसभर छान, विधायक उपक्रम असत...एकूणच सर्वसामान्य ज्ञानात खूप भर पडली, माणुसकीचेही अनेक धडे मिळत मनाचे उन्नयन झाले.
 
बाबा भिडे यांनी गीता समजावून दिली...
 
 
नाशिक कारागृहात सुमारे 1200 स्थानबद्धांमध्ये तत्कालीन जनसंघाचे आश्वासक तरणेबांड नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, रा.स्व.संघाचे तत्कालीन प्रांत संघचालक बाबाराव भिडे, प्रल्हादजी अभ्यंकर तसेच बाळासाहेब आपटे, चाळीसगावचे डॉ.वा.ग.पूर्णपात्रे, मालेगावचे नानासाहेब पुणतांबेकर, अभाविपचे यशवंतराव केळकर, ठाण्याचे सतीश मराठे, जळगावचे प्रा.म.मो.केळकर, गजानन घाणेकर, नारायण तथा दादा मराठे, धरणगावचे रमेश महाजन, साकळीचे धोंडूअण्णा माळी, वरणगावचे डॉ.नागराज, शेंदुर्णीचे दिगंबर बारी, उत्तम थोरात, कुर्‍हा-काकोड्याचे अशोकराव फडके, कमलकिशोर गोयंका आदी मान्यवर होते. बाबा भिडेंनी रोज भगवद्गीता समजावून देण्याचा परिपाठ ठेवला.
@@AUTHORINFO_V1@@