हेर इतिहासकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 

 
इराकमधल्या आणि अफगाणिस्तानातल्या त्या धगधगत्या रणभूमीवर, जीव धोक्यात घालून ब्रायन ग्लीन विल्यम्स स्वत: हिंडला. त्याने फार मोलाची माहिती मिळवली. सीआयएच्या दहशतवादविरोधी ‘डेटाबेस’ला त्याची खरी मदत झाली.
 

“काय? हरले ना शेवटी?” रेल्वेच्या दैनंदिन प्रवासी मित्रांच्या गटात, ऑफिसमध्ये, ऑफिसच्या कँटीनमध्ये चहा पिताना, जेवताना कुणीतरी वाक्य उच्चारतो. मधमाशांचं मोहोळ उठावं तसे सगळे जण एकदम बोलायला लागतात. कुणी एका बाजूने, कुणी विरुद्ध बाजूने, कुणी आणखीच तिसऱ्या बाजूने. आपल्याकडे प्रत्येक माणूस हा स्वयंघोषित राजकीय पंडित असतो. आपल्याला राजकारणातले सगळे बारकावे कळतात, असं त्याचं स्वतःविषयीचं लाडकं मत असतं. प्रत्यक्षात त्याला काहीही कळत नसतं. तो जे वर्तमानपत्र वाचतो, त्याचा संपादक, बातमीदार यांची मतं त्याला आपली वाटत असतात. तो विविध वाहिन्यांवर ज्या राजकीय चर्चा पाहात नि ऐकत असतो, त्यातल्या सर्वात आक्रस्ताळ्या वक्त्याचं मत त्याला स्वतःचं वाटत असतं. तुम्हीच स्वतःशी विचार करून पाहा ना. आताच्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, त्या राज्यांचं अंतर्गत राजकारण, त्या राज्यांचा राजकीय पोत, त्या राज्यांमधल्या माणसाचा एकंदर स्वभाव याबद्दल आपल्याला खरोखरच ‘फर्स्टहँड’ माहिती आहे का? तर नाही. वृत्तपत्रांमधली राजकीय वार्तापत्रं आणि दूरदर्शन वाहिन्यांवरच्या चर्चा या ‘सेकंडहँड’ माहितीवरूनच आपल्याला तिथल्या बातम्या थोड्याफार कळत असतात आणि राजनीतीशास्त्र, जे एक परिपूर्ण शास्त्र आहे, याबद्दल तर आपलं ज्ञान शून्य असतं. जर खरंच एखादा माहीतगार माणूस आपल्याला भेटला आणि तो आपल्याला अशी बारकाव्यांची माहिती सांगायला लागला तर? तर आपण ती माहिती पाच मिनिटांच्या वर ऐकून घेणार नाही. कारण, आपल्याला वेळ नसतो. आपल्याला गाडी पकडायची असते, ऑफिसात मस्टरची वेळ पकडायची असते. शाळा, कॉलेज, शिकवणी क्लास यांच्या वेळा सांभाळायच्या असतात. झालंच तर, उतारवयाला लागलेला छबकडा नायक आणि त्याच्या अर्ध्या वयाची बाल नायिका यांची शेंबडी प्रेमकहाणी पाहायची असते. जीवनातल्या या सर्व महान गोष्टी करत असताना राजनीतिशास्त्र (पॉलिटी) आणि राजकारण (पॉलिटिक्स) याची माहिती कशाला करून घ्यायची? दोन घटका तावातावाने गप्पा मारून अमुक नेता कसा मूर्ख आहे नि तमुक नेताच कसा बरोबर आहे, हे एकमेकांना ऐकवता आलं की पुरे!

 

आपणा सर्वसामान्य हिंदू माणसाची ही शोकांतिका आहे. कोणताही अभ्यास त्याला नको आहे. ब्रायन ग्लीन विल्यम्स या माणसाचं मात्र असं नाही, कारण तो अमेरिकन आहे. मेकॉले शिक्षणपद्धतीने त्याचं मन संवेदनाहीन करून टाकलेलं नाही. त्यामुळे जगाच्या उघड्या शाळेत शिक्षण घ्यायला तो उत्सुक होता नि अमेरिकेसारख्या समृद्ध देशात जन्मल्यामुळे त्याच्या खिशात पैसा होता. १९७८ साली सोव्हिएत रशियाने, अफगाणिस्तानातल्या साम्यवादी राजवटीचं रक्षण करण्याच्या बहाण्याने तिथे आपल्या फौजा घुसवल्या. अमेरिकेने आपलं सगळं बळ बंडखोर पठाण टोळ्यांमागे लावलं. अपार शस्त्रसामग्री आणि अफाट पैसा पठाणांना पुरवण्यात येऊ लागला. १९८० साली खुद्द अमेरिकेतच सत्ताबदल झाला. मुळमुळीत जिनी कार्टर गेले आणि कणखर रोनाल्ड रीगन आले. १९८१ सालची गोष्ट. अमेरिकेच्या इंडियाना राज्यातल्या नोत्र दाम विद्यापीठात राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांचं भाषण होतं. “आम्ही साम्यवादी तत्त्वज्ञानाला नुसती वेसण घालण्यावर थांबणार नाही,” ते म्हणाले. “आम्ही त्या तत्त्वज्ञानावर मात करू. कारण अमेरिका लोकांच्या भल्यासाठी कार्यरत आहे, तर सोव्हिएत संघाची लोकांच्या कल्याणाची धारणाच वाईट, चुकीची आहे.” राष्ट्राध्यक्ष रिगन यांचं हे भाषण ऐकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांमध्येच एक होता ब्रायन ग्लीन विल्यम्स. त्याने निश्चय केला की, सोव्हिएत संघाच्या तत्त्वज्ञानातच चूक आहे, तर ती आहे तरी काय? आणि हे अफगाण युद्ध काय प्रकार आहे? हे आपण अभ्यासायचं. मग त्याने याविषयीचे असंख्य लेख आणि असंख्य वार्तापत्र वाचून काढली. अचानक त्याच्या लक्षात आलं, “अरे, ही सगळी माहिती म्हणजे त्या-त्या बातमीदाराची, लेखकाची, संपादकांची ‘इंप्रेशन्स’ आहेत. मला तर ‘फर्स्ट हँड’ माहिती हवीय. मग त्यासाठी प्रत्यक्ष अफगाणिस्तानात, सोव्हिएत रशियात जायला हवं. रशियात जाणं तुलनेनं सोपं होतं. विल्यम्स रशियाला गेला. ब्रेझनेव्ह यांची पोलादी राजवट सुरू होती. कोणत्याही गोष्टीची माहिती सरळपणे मिळणं अशक्यच होतं, पण डोळे, कान आणि मन उघडं ठेवणाऱ्या माणसाला आपोआपच अनेक गोष्टी समजतात. तशा विल्यम्सलाही त्या कळत होत्या.

 

मॉस्कोच्या भुयारी रेल्वेच्या स्थानकावर विल्यम्सला एक असं दृश्य दिसलं, ज्यातून त्याचा डॉक्टरेटचा विषय नक्की झाला. कडकडीत काळ्या सुटा-बुटातल्या रशियन स्त्री-पुरुषांच्या गर्दीत लख्ख हिरवा रेशमी झगा घातलेला नि रुबाबदार दाढी राखलेला एक म्हातारा आणि त्याच्यासोबत तशीच लख्ख जाकिटं घातलेल्या नि लाल बुरख्यांनी डोकं, केस झाकून घेतलेल्या काही स्त्रिया त्याने पाहिल्या. ते एक उझबेक कुटुंब होतं. आजूबाजूच्या काळ्या कोटवाल्यांमध्ये ते कुटुंब भलतंच रुबाबदार दिसत होतं. विल्यम्सचा विषय ठरला - ‘सेंट्रल एशियन इस्लामी हिस्ट्री.’ अमेरिकेत परतल्यावर त्याने या विषयाचा अभ्यास करून पीएच.डी तर मिळवलीच, पण मध्य आशियातल्या उझबेकिस्तान आदी इस्लामी देशांना अनेकदा भेटी दिल्या. तिथल्या माणसांना भेटला. तिथे मित्र निर्माण केले.त्यांची राहणी, वेशभूषा, खानपान, भाषा जवळून पाहिली, ऐकली म्हणजेच नुसता पुस्तकी अभ्यास न करता त्याने जिवंत माणसांचा अभ्यास केला. मग तो या विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ‘स्टडी टूर्स’ घेऊन जाऊ लागला. मॅसेच्युसेट्स विद्यापीठात त्याची इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. हे सगळं होत असताना एकीकडे, अफगाणिस्तानातून रशियन फौजा माघारी गेल्या. पुढे सोव्हिएत रशिया कोसळला. विल्यम्सच्या अभ्यासाचा विषय असलेले मध्य आशियाई इस्लामी देश सोव्हिएत संघातून बाजूला होऊन स्वतंत्र देश बनले. पण, अफगाणिस्तानात स्थिर राजवट येईना. तालिबान या दहशतवादी संघटनेने हातपाय पसरायला सुरुवात केली. या विरुद्ध उभ्या ठाकलेल्या अहमदशाह मसूद याचा ९ सप्टेंबर, २००१ या दिवशी खून झाला. आणखी दोनच दिवसांनी संपूर्ण जग हादरलं. ११ सप्टेंबर २००१ या दिवशी अल कायदाने खुद्द अमेरिकेतच भीषण विध्वंस घडवला.

 

७ ऑक्टोबर २००१ या दिवशी अमेरिकेने या इस्लामी दहशतवादाविरुद्ध प्रचंड मोहीम सुरू केली. तिचं लष्करी नाव होतं ‘ऑपरेशन एन्ड्युअरिंग फ्रीडम.’ अमेरिकन सैन्य तालिबानच्या आणि अल कायदाच्या नि:पातासाठी अफगाणिस्तानात नि इराकमध्ये घुसलं. जनरल डेव्हिड पेत्रॉ आणि जनरल स्टॅनले मॅक्क्रिस्टल यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू झाली. या दोन्ही सेनापतींच्या लक्षात आलं की, ज्या भूमीवर आपल्याला लढायचंय, तिथल्या भूगोलाइतकीच तिथल्या इतिहासाची, माणसांची, त्यांच्या राहणीची, भाषेची, विचारपद्धतीची माहिती आपल्याला असायला हवी. अमेरिकन हेरखात्याने म्हणजेच सीआयएने मॅसेच्युसेट्स विद्यापीठाकडून ब्रायन ग्लीन विल्यम्सला उचललं आणि आपल्या कामाला लावलं. असेच इतरही अभ्यासक समाजशास्त्रज्ञ, भाषातज्ज्ञ ठिकठिकाणाहून उचलण्यात आले. त्यांच्या माहितीचा एक ‘डेटाबेस’ बनविण्यात येऊ लागला. पण, यापैकी बहुसंख्य लोक हे विद्यापीठातल्या बंद खोलीत बसून पुस्तकी अभ्यास करणारे होते. विल्यम्स हा प्रत्यक्ष भूमीवर जाऊन अभ्यास करणारा होता. मग काय? विल्यम्सला आवडीचंच काम मिळालं. इराकमधल्या आणि अफगाणिस्तानातल्या त्या धगधगत्या रणभूमीवर, जीव धोक्यात घालून तो स्वत: हिंडला. तिथल्या लोकांना भेटला. चतुरपणे प्रश्न विचारून त्यांना विश्वासात घेऊन त्याने फार मोलाची माहिती मिळवली. सीआयएच्या दहशतवादविरोधी ‘डेटाबेस’ला त्याची खरी मदत झाली.

 

इस्लामी अतिरेक्यांच्या कार्यपद्धतीबाबतची त्याची काही निरीक्षणं, मतं फार मौल्यवान ठरली. उदा. त्याच्या मते पठाण अतिरेकी हे लष्करी लोकांवर, लष्करी छावण्यांवर हल्ले जरूर करतील, पण नागरी लोकांवर करणार नाहीत. या उलट इराकी, पॅलेस्टिनी, हेजबोल्ला आदी अरबी अतिरेक्यांना लष्करी लोकांप्रमाणेच निरपराध नागरी लोकांना उगीच ठार मारण्यात कसलीही दिक्कत वाटत नाही. आपल्याकडच्याप्रमाणे आचरट उदारमतवादी लोक अमेरिकेतही आहेतच. ते अगदी नाक फुगवून- फुगवून सांगत असतात की, “छे, छे ! धर्माचा आणि अतिरेकी कुत्र्यांचा काही संबंध नाही.” विल्यम्स म्हणतो, “संबंध नक्कीच आहे. बहुसंख्य अतिरेकी धार्मिक शिक्षण घेतलेले असतात. मुल्ला, इमाम, मौलवी यांच्या तालमीत तयार झालेले हे लोक अगदी सहजपणे कंबरपट्ट्यात स्फोटकं लपवून आत्मघाती हल्ल्याला तयार होतात. मात्र, सगळेच मुसलमान असे नाहीत.” तो पुढे म्हणतो, “दहशतवाताच्या नि:पातासाठी जिवाची बाजी लावणारे, आतून लढणारेही पुष्कळ आहेत नि जगभर सर्वत्र आहेत. अहमदशाह मसूदच घ्या ना.” तालिबानविरुद्ध लढताना आपल्याच लोकांकडून ठार झालेल्या, पंजशीरचा सिंह म्हणून प्रसिद्ध असलेल्या मसूदला विल्यम्स फार मानतो, तर अशा या हेरगिरी करणाऱ्या म्हणजे शत्रूची महत्त्वाची माहिती पुरवणाऱ्या ब्रायन ग्लीन विल्यम्सची आतापर्यंत पाच पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@