गावाच्या वाटेवर दाटून आलेलं धुकं...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

जमिनीच्या आत-आत ओल दाटून आली असते. पाऊसझडीत उनाड झालेला वारा आता थिजू लागलेला असतो. भल्या पहाटे वारा गारठतो. नि:शब्द गावाभोवती मूक धुक्याचे आवरण चढत जाते. गावाची नजर चुकवून जमिनीतली ओल हळूच बाहेर येते. गवतावर दवथेंब तरारून येतात. मग पायवाटेवरून चालताना पावलांचे तळवेही हळवे होतात. अनवाणी पावलांची जमिनीशी सलगी होते. थंडी मग शरीरभर निनादू लागते. गावाची पायवाट मात्र स्तब्ध असते, बरीचशी अलिप्त असते. सगळ्याच ऋतूंच्या पालख्या याच गाववाटेवरून गावात शिरतात. ऋतूंची वर्दळ गाववाटेवर सततच असते म्हणून तरारून येणार्या दवथेंबांनी गाववाट हरखून जात नाही अन् धुक्यात ती हरवतदेखील नाही. पावलं निश्चयानं पडू लागली की, वाट धुक्यातूनही वाट काढते. विझलेल्या शेकोटीपाशी एक अनाहूत पांथस्थ उगाच उभा असतो. अंगोपांग लपेटून, डोळेच तेवढे दिसतात. थंडी तरीही कुठूनतरी पांघरुणाआत शिरते. शिरशिरी दाटून येते. पहाटेचं दव तसं गारठलेलं. ते बराच वेळ वितळत नाही. रात्री बराच वेळ थंडीशी झगडत असलेली शेकोटी, उत्तररात्री दव ओथंबू लागलं की हळुवार विझत जाते. पेटवून ऊब घेणारे अशा वेळी आपल्या उबदार घरट्यात आपल्या पिलांसह सुखासीन असतात. शेकोटी आपली एकटीच धगधगत राहते. शेकोटीचं असं नेमक्या वेळी एकट्याने जळत राहणं कातर करणारं असतं. काळजी घेणारे हात सोबतीला असले, तरच शेकोटी धगधगती राहू शकते. शेकोटीलाही माणुसकी शिल्लक असणार्या माणसांची सोबत हवी असते. गावाने शेकोट्यांसोबतच माणुसकीही धगधगती ठेवायला हवी. नाहीतर काही शेकोट्या गाव पेटवून देतात. गावातले निखारेही अदबशीर आणि सुसंस्कृत असायला हवेत. त्यासाठी गावाकडे मायमाउलीची सशक्त ओंजळ हवी. मगच एक ऋतू दुसर्याला देणं देऊन जातो. पावसाळ्यात झाडं वाढतात, गावात आणि गावाबाहेरदेखील. हिवाळ्यात पाखरं त्यावर घरटी उभी करतात. एकमेकांच्या सहवासाने ती उबदारही करतात. अशी उबदार घरटी झाडाचं वैभव असते आणि अशी घरट्यांनी डवरलेली झाडं असणं, हे गावाच्या संपन्नतेचं प्रतीक असतं. त्यासाठी गावाला पावसाळा अंगावर झेलावा लागतो, तसाच हिवाळादेखील श्वासात उबवावा लागतो.
 
गावाला हिवाळा असा श्वासात आणि नसानसांत भिनवता आला की, धुकं सुगंधी होतं. ऋतूंची नाळ गावखारीत गाडली असायला हवी. मग सुगी रुसत नाही. सुगीतल्या सुखावरच हेमंताची उतरंड रचली असते. हिवाळ्यातली उन्हं भुकेली असतात, पण वखवखलेली नसतात. हळुवार, सौम्य असतात. आजीबाईने नातवाला मांडीवर बसवून खाऊ देत गोष्टी सांगाव्या, तितक्या ऋजुतेने ही उन्हंही माणसांशी वागतात. सुगीचं सुख ही उन्हं हळुवार उबवतात. सुख आणि समृद्धी याच उन्हात निरोगी होते. हिवाळ्यात सौम्य सकाळी आणि सौंध्या दुपारी अंगणात वाळत घातलेल्या वाळणावर चिमण्या उतरतात व दुपारी हातावर पाणी पडलं की, अंगात भरलेली हुडहुडी काढण्यासाठी वाळण टाकलेल्या तुरीजवळ बसलेल्या आयाबायांच्या गप्पा चिमण्यांना कळत असाव्या. चिमण्या हिवाळ्यात कमी बोलतात. हिवाळ्यात त्यांचे चिवचिवणेही लयबद्ध झाले असते. आयाबायांनाही ते कळत असावे, म्हणूनच त्या दुपारी तुळशीवृंदावनापाशी वाडग्यात पाणी ठेवतात. सुगीने जनावरांचं शेणही तुकतुकीत होतं नि मग अंगणही चोपडं, चकचकीत होतं. वृंदावनापाशी काढलेल्या रांगोळीवर एक थोराड चिमणा उगाच नाचत असतो. लांबलेल्या उन्हात अंमळ मोठ्या झालेल्या आपल्याच सावलीकडे बघून शेपटी नाचवितो.
 
 
चिमण्या मग त्याच्याभोवती पिंगा घालतात. घरातल्या सुरक्षित कोपर्यांमध्ये चिमण्यांच्या घरट्यांची संख्या वाढत असते. हिवाळ्यात चिमण्या माणसांच्या घरातच का घरटी बांधतात, ते कळत नाही. माणसाच्या उबदार, सुरक्षित घरात घरटी बांधण्याची काव्यमय कल्पना त्यांना सुचते, ही थंडीची किमया असते. हिवाळ्याच्या सार्याच खाणाखुणा त्यांच्या घरट्यात असतात. दिवाळीत लक्ष्मीसाठी केलेली कापसाची-हळदकुंकू लावलेली वस्त्रं त्यांच्या घरट्यात असतात. जिवतीचा कागद, तोरणात लावलेली वाळलेली झेंडूची फुले आणि सुकलेल्या तुळसमंजिर्या चिमण्यांना घरट्यात ठेवायला नेमक्या कशा सापडतात, हा प्रश्न घरातल्या बायांना मात्र पडत नाही. काडीकाडी करून दोघीही संसार उभा करतात, म्हणून चिमण्यांच्या कुठल्याच वागण्याबद्दल घरच्या बायांना प्रश्न पडत नाही. पिलं उडून गेली की, त्यांना एकमेकींची सोबत असते. मुलासाठी त्याच्या बाळपणी विणलेला अन् अजूनही जपून ठेवलेला लोकरीचा इवलासा मोजा; म्हातारी, चिमण्यांना त्यांच्या घरट्यात नेऊ देते. तिच्या उबेतून लेकरू केव्हाच निघून गेलेलं. हक्काच्या हिरव्या चुड्यात हरविलेलं... अशा आठवणी नेमक्या हिवाळ्यातल्या आळसावलेल्या दुपारीच का सतावतात? पेंगलेल्या डोळ्यांवर त्यांचा अंमल हळूहळू चढू लागतो अन् दिवस सरून जातो...
 
 
रात्री मग बराच वेळ झोप येत नाही. अशा वेळी चिमण्याही नेमक्या दुष्टासारख्या चिडिचूप असतात. दूर कुठेतरी देवळात सुरू असलेल्या भजनाचा ठेका ऐकू येतो. तालासुरात शब्द शोधताना मन तरंगू लागतं, हलकं-हलकं होतं अन् मग खोल दरीच्या काठावरील पांगर्याला पानगळीनं झपाटलं की, त्याची पानं दरीत हेलकावत, तरंगत उतरतात, तसं मन खोल खोल अंधारात शिरतं. दरीतलं धुकं गावात शिरतं. खिडकीच्या फटीतून घरात शिरतं. धुक्याला दरीचा तळ गाठता येतो तसंच ते घराचादेखील तळ गाठण्याचा प्रयत्न करतं. अशा वेळी गावानं सावध असावं. गावच्या डोंगरावरची अंबाबाई अन् दरीतल्या दर्ग्यातला पीरबाबा जागृत असला, तरी गावानेही जागं असण्याची गरज असते. दरीत वाघोबाच्या घळीजवळ पीरबाबाची वसती होती. धुनी पेटलेली असायची. आता बाबा नाही, पण त्यांचा वास आहे. वास म्हणजे वास्तव्य असल्याचा आभास, बाबांची धुनी गुराख्याची पोरं हिवाळ्यात तरी पेटती ठेवतात. पानगे भाजून त्याचा नैवेद्य दाखवितात. म्हणजे वाघ गावावर हल्ले करत नाही. बाबा त्याला वर चढूच देत नाही.
 
 
श्रद्धेचं हे धुकं दाट आहे म्हणून गाव सुरक्षित आहे. दरीत सागाची झाडं ताठ उभी आहेत. हळवी आहेत. ऋतुभान त्यांना आहे. हेमंत गारठून गेला की, ते शिशिराचंही स्वागत करतात. शहाण्यासारखी पानं गाळून बसतात. पानगळीनं एक होतं- झाडे ओकीबोकी होतात अन् घरटी उघडी पडतात. पौष आणि माघातल्या बोचर्या वार्यांचे मग फावते. झाडं थंडीने काकडत असताना वारे घरट्यातल्या पिलांना छळतात. घरट्यातली ऊब संपली की, मग पाखरांची पिलं पंखांत बळ शोधू लागतात. दरीत खोलवर असलेल्या झाडांवरच्या घरट्यांतून पिलं वर उडून आली की समजावं, माघ-वारे वाहू लागलेत. शिशिरातल्या पानगळीत मात्र दरीच्या तळाशी पाचोळा साचलेला असतो. सापांची सावध सळसळही पाचोळ्याने जाणवते. पीरबाबाच्या दर्ग्यापर्यंत उन्हं दुपारची कशीबशी दरीत उतरतात. तळाशी मात्र गारठाच असतो. मग भड्या बंदरांची टोळी दर्ग्याजवळच्या वडावर येऊन बसते. उंबराच्या पानांवर आलेल्या गुठळ्या खाताना, पाठ उन्हाने शेकून घेत माकडं बसली असतात. सय संध्याकाळी हुऽऽप्प करीत भड्या उसळला की, टोळीतली चिलीपिलीदेखील सराईतपणे तळाकडे चालू लागतात. रात्री दरीवर धुक्याचं अन् दिवसा भड्याच्या टोळीचं साम्राज्य असतं. दरीत काही रानफुलं फुलतात. त्यांचा दर्प वेडावतो. माकडांपासून वाचलेली चारं-बोरं गुराख्याची पोरं गावात आणतात. हिवाळा असा अंगोपांगी गोंदवून जात असताना पोटातही शिरतो. हिरडा-ब्याहड्याच्या बिया शाळेतली पोरं फोडून खातात. गाववाटेच्या दुतर्फा असलेले दगड त्यामुळे हिरव्या रंगाचे होतात. उनाड मुलांसोबत काही रंगीत पाखरंही गावात शिरतात. चिमण्यांची माणसांशी असलेली सलगी बघून त्यांना असूया वाटते. गाववाटेवर तरारलेले दवओथंब चोचीत घेऊन पाखरं आपल्या देशात निघण्याची तयारी करतात, तेव्हाही दरी धुक्याने दाटून आलेलीच असते...
@@AUTHORINFO_V1@@