वरणगाव पालिकेची सभा पाच मिनिटांत आटोपली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2018
Total Views |

सभा रद्द करण्याची मागणी, सीओंच्या दालनात नगरसेवकांचा अर्धा तास ठिय्या

 
वरणगाव : 
 
येथील पालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. 11 वाजता सुरू झालेली सभा अवघ्या पाच मिनिटात आटोपली. त्यामुळे पाच मिनिटे उशिराने पोहोचलेल्या नऊ नगरसेवकांना नगराध्यक्ष व मुख्याधिकार्‍यांनी सभा संपली असून आपण सभागृहाबाहेर जावे, अशी सूचना केली.
 
त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मुख्याधिकार्‍यांच्या दालनात अर्धा तास ठिय्या मांडला. जाणीवपूर्वक सभा लवकर आटोपल्याचा आरोप करत संतप्त नगरसेवकांनी सभा रद्द करण्याची मागणी केली.
 
 
हनुमान व्यायामशाळेचे नूतनीकरण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गटारींचे बांधकाम यासह एकूण 42 विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.
 
 
विकासासाठी आवश्यक विषय असल्याने सर्वांना मंजुरी द्यावी, अशी सूचना नगरसेविका शशी कोलते यांनी मांडली. त्याला उपस्थित नगरसेवकांनी अनुमोदन दिल्याने सर्व विषय मंजूर करण्यात आले. मात्र, पाच मिनिटे उशिरा पोहोचलेल्या नगरसेवकांनी यावर आक्षेप घेऊन ठिय्या मांडला.

सर्वानुमते मंजुरी
 
पालिकेची सभा 11 वाजता सुरू झाली, त्यात मागील इतिवृत्त कायम केले. उर्वरित सर्व विषय शहराच्या विकासासाठी महत्त्वाचे असल्याने सर्वानुमते त्यांना मंजुरी मिळाली. उर्वरित नगरसेवक उशिरा आले, तोपर्यंत सभा संपली होती
सुनील काळे, नगराध्यक्ष

लोकशाहीची गळचेपी
 
सभा स. 11 वाजता सुरू होणार होती, मात्र 11.05 वा.सभागृहात पोहोचल्यानंतर सभा संपल्याचे नगराध्यक्ष आणि मुख्याधिकार्‍यांनी सांगितले. लोकशाही पद्धतीने प्रत्येक विषयावर चर्चा होणे गरजेचे होते.
अरुणा इंगळे, माजी नगराध्यक्षा
पालिकेतील सध्याचे विरोधक मागील काळात सत्तेत असताना त्यांनीदेखील अशाच प्रकारे अवघ्या पाच मिनिटांमध्ये सभा संपवली होती. ही घटना लोकशाहीसाठी बाधक आहे. परंतु, त्यांनी पेरलेले आज उगवले आहे. -राजेंद्र चौधरी, गटनेते राष्ट्रवादी
@@AUTHORINFO_V1@@